बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करणार आहात? असा प्रश्न भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जून पुजारी नामक एका व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती. यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या कि, “तुमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या बाता मारल्या पण आज राज्यातील महिलांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तुमचे नेते हाड हाड यांच्यावर एका बलात्कार प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक आडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यात हे स्पष्टपणे ऐकायला येतंय की आव्हाड आरोपीला मदत करत होते.. तुमच्याकडून महाराष्ट्रातील जनता आता उत्तराची अपेक्षा करते. या प्रकरणात पीडित महिलेची बाजू घेण्यासाठी तुम्ही पुढे येणार आहात का..?”
“आजपर्यंत महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा दावा करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपली सुरक्षा परत करण्याची घोषणा करणाऱ्या सुप्रियाताई, आता आपल्या नेत्याचा, जो एका बलात्काराच्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं सुरक्षा कवच काढून घेणार आहात का..? तुमच्या पक्षाच्या धोरणांत महिलांच्या सुरक्षेसाठी आश्वासन दिलं जात असताना, तुम्ही अश्रू ढाळले होते. पण आता या गंभीर प्रकरणावर तुम्ही पक्षांतर्गत तरी कारवाई करणार आहात का..? किंवा हे प्रकरण अडीच वर्षांपूर्वीच आहे म्हणून तुम्ही त्यावर पांघरूण घालणार आहात..?” असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
“प्रकरण जुनं असले तरी आता ते समोर आलं आहे, त्यामुळे तुम्ही यातून पळ काढू शकत नाहीत. हे लक्षात घ्या की गुन्हा करणारा जितका दोषी असतो, तितकाच त्याला वाचवणारा दोषी असतो. महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, तुमच्या लाडक्या आव्हाडांवर तुम्ही काय कारवाई करणार आहात..? सुप्रियाताई, आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केवळ भाषणांपुरता, आंदोलनापुरता मर्यादित ठेवणार आहात की खरंच आव्हाडांवर कारवाई करून महिलांना न्याय देणार आहात..? असा सवाल त्यांनी केलाय.