Wednesday, January 15, 2025

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती

Share

आज “विमुक्तदिन” भटके विमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि. ३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे.समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू”या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून एकत्र नांदतो आहे.काळाच्या ओघात या समाजव्यवस्थेला वैगुण्याची कीड लागली. जातीतून अस्पृश्यता जन्माला आली. व्यवसाय, सामाजिक व्यवहार यांच्याऐवजी जात जन्मानुसार ठरू लागली. बहुसंख्य समाज या अस्पृश्यतेच्या, विषमतेच्या रोगाचा बळी ठरला.

याच समाजात असणारा एक घटक म्हणजे भटके-विमुक्त होय. 51 प्रमुख व 200 उपजातींत विखुरलेला हा समाज कायमचा समाजव्यवस्थेबाहेर फेकला गेला. आधी येथील समाजव्यवस्थेने आणि नंतर परकीय आक्रमकांनी या भटके-विमुक्तांना देशोधडीला लावले. सांगायला गाव नाही, राहायला घर नाही, अशी दैन्यावस्था या समाजावर आली. मुळात हा भटके-विमुक्त समाज म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. आपल्या देशाला प्राचीन काळापासून एक समृध्द वारसा लाभला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांत अग्रस्थानावर होता.

जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश होता. एकेकाळी भारतीय गावगाड्याशी आणि वैभव संपन्न समाजाशी जोडले गेलेले,भव्य मंदिरे अजिंठा वेरूळची लेणी, अशोकस्तंभ सारखी शिल्पे ,कृषी,गो विज्ञान वैद्यक शास्त्र शस्त्र निर्मीती,भविष्य शास्त्रात मनोरंजन इ.विषयात पारंगत होते.एका चिरंतन संस्कृतीचा वारसा आपल्या समाजाला लाभला आहे आणि या संस्कृतिकचे वाहक होते.आज ज्यांना भटके-विमुक्त म्हटले जाते ते समाजबांधव कधी मुस्लिम तर कधी इंग्रजांशी कडवी झुंज देत राहिले.राजस्थानात महाराणा प्रताप असो की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य निर्मीती गडकोट किल्ल्यांचे बांधकाम असो की यांचे रक्षण भटके-विमुक्त जाती जमाती कायम देव दैश धर्मा साठी बलीदान संघर्ष करीत राहिल्या. मुळात लढवय्ये वीर असणारे हे बांधव आपल्या परंपरागत व्यवसायातून संस्कृतिचे वहन करीत असत.

या समाजबांधवांमध्ये भिल्ल, पारधी, वैदू, वडार, बहुरूपी, वासुदेव, नाथजोगी, नंदीबैलवाले, मरिआईवाले, मेंडगी-जोशी, सरोदे, शिकलकार, धनगर, कोल्हाटी, बंजारा इत्यादी प्रमुख समाजघटक होते. छत्रपतींच्या स्वराज्यात हे सर्व समाजबांधव समाजाच्या मुख्य प्रवाहाशी नाळ बांधून आपला उदरनिर्वाह करीत असत. बहिर्जी नाईकांसारखा वीरपुरूष याच समाजातून स्वराज्याला प्राप्त झाला. बारा बलुतेदारांबरोबर पसाभर धान्य शेतकरी या समाजबांधवांच्या झोळीत आनंदाने घालत.

इंग्रजांचा अंमल सुरू झाला. 1857 च्या स्वातंत्र्यसमरानंतर मराठा सत्तेचा अस्त झाला आणि भारतावर इंग्रजांची सर्वंकष सत्ता आली.या 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य समरात भटकेविमुक्त जाती जमातींचे मोठे योगदान होते.त्यानंतरही इंग्रजांना ही सत्ता सुखासुखी भोगता येत नव्हती. कधी राजे उमाजी नाईकांचे बंड, तर कधी तंटया भिल्लाचे बंड असे प्रसंग वारंवार घडत होते. वासुदेव बळवंत फडक्यांनी उभ्या केलेल्या सैन्यात या भटके व विमुक्त समाजबांधवांचे योगदान मोठे होते. भारतभर ठिकठिकाणी भटके-विमुक्त बांधव इंग्रजांशी लढून त्यांना जेरीस आणत होते. भटके विमुक्तांनी इंग्रजांचे राज्य नाकारले स्वराजासाठी संघर्ष उभा केला.याचा बंदोबस्त करण्यासाठी 1871 साली इंग्रजांनी “ जन्मजात गुन्हेगारी ” चा कायदा Criminal Tribes Act आणला.या जाचक कायदयापासून वाचण्यासाठी सुरू झाली भटकंती.

आज येथे तर उदया तिथे. स्वातंत्र्याच्या पहाटेनंतरही त्यांची ही परवड कायम राहिली. या समाजाचा एक अविभाज्य घटक असूनही भटका समाज परका ठरला. घृणित जीवन जगू लागला. शौर्याचा वारसा लाभलेला हा सारा समाज पोटातील आगीपुढे हतबल झाला. भटके जीवन नशीबी आले. भटकेविमुक्तांना उत्पन्नाचे निश्चित साधन राहिले नाही.ते देशोधडीला आगले रानोमाळ… वनाजंगलातून लपून राहायचे, पोलीस, कायदा यापासून स्वत:चा बचाव करायचा, पण पोटाचे काय? पोटाच आग शांत कशी होणारं ? या बांधवाकडे एकच उपाय होता… चोरी …स्थिर समाजाच्या स्पर्धेत अवहेलना आणि ससेहोलपट चालु झाली ती आजतागायत कमी अधीक प्रमाणात कायम आहे.उपजीविकेसाठी चोरीसारख्या घृणित गोष्टीचा आसरा घ्यावा लागला. हे त्या बांधवांचे दुर्भाग्यच! पण चोरीचा कायमचा आणि जन्मजात शिक्का त्यांच्यावर बसला. हे साऱ्याच समाजाचे दुर्वर्तन होते. स्वांतंत्र्यानंतरही त्याच हीनदीन,वंचित अवस्थेत जीवन कंठण्याची मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर जवळजवळ दहा वर्षाचा काळ जावा लागला.

यातून मुक्त होवून सन्मानाचे जीवन जगण्याचे भाग्य काही या बांधवांच्या नशिबी आले नाही. सततच्या भटकंतीमुळे यापैकी अनेकांची कोठेही शासकीय पातळीवर नोंद नाही.जनगणनेत, मतदान यादीत स्थान नाही.जातीचे प्रमाणपत्र नाही.80टक्क्यांपेक्षा अधिक निरक्षर आहेत. भटके व विमुक्तांना घटनात्मक संरक्षण नाही. काही राज्यात त्याचा “एस.सी.” मध्ये काही ठिकाणी “एस.टी.” मध्ये समावेश् आहे.केंद्र शासनाच्या सूचीत भटके-विमुक्तांचा समावेश ”ओ.बी.सी.”मध्ये केला आहे.काही जमातींचा कशातच समावेश नाही.लोक देतील ते अन्न,भिकेतून मिळेल ते वस्त्र आणि चार बांबूचे पाल हीच यांची “मालमत्ता” “जी गावाची हागणदारी तीच यांची वतनदारी”.

खर म्हणजे भटके विमुक्त समाज हा समाजाचा महत्वाचा घटक होता.यातील काही जातींची भटकंती ही व्यवसायानिमित्त स्वतःहुन स्विकारलेली.स्वातंत्र्यांनंतर या समाजापर्यंत ज्ञानगंगेचे चार थेंब पोहोचले नाहीत. आरोग्याच्या सुविधा काय असतात यांचे त्यांना ज्ञान नाही. यांची उपचारपध्दती आदिम काळापासून चालत आलेली. लोखंड गरम करून डाग देण्याची. कसरती, मनोरंजन, कारागिरी यांच्या सहाय्याने जीवनाचे रहाटगाडगे चालविणारे हे बांधव कायम उपेक्षित राहिले. वंचित राहिले. शासनाने विकासाच्या घोषणा केल्या, आयोग नेमले, पण सारेच कागदावर राहिले. भटके-विमुक्तांच्या नशिबी आला फक्त पोलिसी ससेमिरा आणि स्वत:चा, परिवाराचा बचाव करण्यासाठी जिवाच्या आकांताने केलेला भटकेपणा… गुन्हेगारीचा शिक्का भाळी मिरवत…गुन्हेगार ठरवून दगडाने ठेचून मारण्याचे प्रकार आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडले आहेत. न केलेल्या गुन्हांची कबुली देण्यासाठी कितीतरी पारधी महिलांचा युवकांचा अमानुष छळ झाला आहे. ही साऱ्या आयुष्याची परवड आणि गळूसारखा चिकटलेला गुन्हेगाराचा शिक्का.

स्वातंत्र्य पुर्व काळात व स्वातंत्र्य नंतरही भटकेविमुक्त समाजातील अनेक संस्था संघटना कार्यरत आहेत.तसेच जाती जमातीं च्या जिल्हास्तरीय ते राज्य स्तरावरील अनेक संस्था आहेत.पण भटके विमुक्त विकास परीषदेने २ ऑक्टोबर १९९१ पासुन “ बंधुभाव हाच धर्म ” हे सामाजिक सुत्र आधारभूत मानुन दिशा निश्चित केली. शिक्षण,स्वावलंबन सन्मान व सुरक्षा या चतुसुत्रीवर काम सुरू झाले.भटकेविमुक्तांचा वैभवशाली गौरवपूर्ण इतिहास,परंपरा,आणि त्यांच्या समस्या सकारात्मक पध्दतीने मांडत परीषदेचे कार्यकर्ते समाजात फिरु लागले.भटके विमुक्त विकास परिषद हे महाराष्ट्रातील असे पहिले संघटन आहे जे पालापालावर,तांड्यातांड्या पर्यंत पोहचले. समन्वय संवाद यांच्यावर भर दिला.गरज पडली तर संघर्षांचा पवित्रा पण घेतला.
निवेदने,मोर्चा,धरणे आंदोलने यातुन जागृती केली.परंतु यातुन अपेक्षित समाज पुनर्रचना साध्य होणार नाही याची जाणीव कार्यकर्त्यांना होती म्हणून प्रबोधनाबरोबर रचनात्मक कार्य पण सुरु झाले त्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान ची स्थापना झाली.चतुसुत्रीवर काम सुरू झाले व यमगरवाडी सेवा प्रकल्प सुरू झाला.

भटके विमुक्त समाज गावकुसाबाहेर पाले टाकून राहतो. भटके विमुक्तातील अनेक समाज जसे डोंबारी, नंदीबैलवाले,मरिआईवाले,मसनजोगी,बहुरूपी या समाजात कुटुंबाचा प्रमुख आधार मुलेच असतात.कुटुंबाला जगविण्यासाठी भिक्षा मागून, कसरती करून, भविष्य सांगून,अभिनय करून,कुटुंबाचे पालनपोषण करतात. यामुळे नियमित शाळेची वेळ, शाळेची शिस्त,शाळेचा दिलेला अभ्यासक्रम पाळणे अतिशय कठीण बाब आहे.यामुळे भटके विमुक्त समाजात शाळाबाहय मुलांची संख्या अधिक दिसून येते.
भटके विमुक्त समाजातील मुले पुर्व प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ते राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे पालावरती शाळापुर्व शिक्षण व पुर्व प्राथमिक शिक्षण मिळण्याची योजना करण्यात आली. यालाच “पालावरची शाळा / अभ्यासिका” म्हणतात.

मुलांच्या आरोग्य समस्या दुर करण्यासाठी आरोग्य आयामाची सुरवात करण्यात आली. याच्या अंतर्गत मुलांना पोषण आहार,लसीकरण तसेच वस्तीला डॉक्टर जोडणे, आरोग्य शिबीर,आरोग्य मार्गदर्शन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचबरोबर वस्ती स्वास्थ्य नीट रहावे म्हणून आरोग्य पेटीचेही वाटप करण्यात येते.या आयामाअंतर्गत वस्तीतल्या लोकांना एकत्रित आणण्याचे कार्यक्रम घेण्यात येतात.मुख्य उददेश वस्तीतल्या लोकांचे संघटन वाढवणे असून त्याअंतर्गत वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. वस्तीमध्ये रक्षाबंधन,योगदिन, स्वातंत्र्यदिन, गणेशउत्सव,मकरसंक्रांत,प्रजासत्ताकदिन साजरे केले जातात. यात जास्तीतजास्त पालकांचा सहभाग घेतला जातो.

वस्ती विकासासाठी स्वावलंबन या आयामाअंतर्गत भटक्या विमुक्त समाजाच्या महिलांचे बचतगट तयार करण्यात आले. महिलांना सबलीकरण करणे व आर्थिक बचत करणे हे या प्रकल्पाचे उददेश.
सब समाज को लिए साथ आगे है बढते जाना.भटकेविमुक्त समाजाला त्याचे पुर्वी चे मानाचे सन्मानाचे स्थान, त्यांचे हक्क त्यांना मिळवुन देणे यासाठी भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश कटिबद्ध आहे.

श्री. उध्दवराव काळे,नाशिक

अन्य लेख

संबंधित लेख