जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल बोलताना म्हणाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. “राहुल गांधींनी देशात आरक्षण संपवण्याची गोष्ट सांगून पुन्हा एकदा काँग्रेसचा (Congress) आरक्षणविरोधी (Anti-reservation) चेहरा देशासमोर आणला आहे. मनातले विचार आणि विचारसरणी काही ना काही मार्गाने बाहेर येतातच” अशी घणाघाती टीका भाजपा (BJP) नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे.
अमित शाह यांनी “एक्स” वर पोस्ट करत राहुल गांधी आणि काँग्रेसला चांगलच सुनावलं आहे, “देशविरोधी भूमिका घेणे आणि देश तोडणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे जणू काही स्वभावच बनले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणे असो किंवा परदेशी मंचांवर भारतविरोधी वक्तव्ये करणे, राहुल गांधींनी नेहमीच देशाच्या सुरक्षिततेला आणि भावना दुखावण्याचे काम केले आहे,” असल्याचं ते म्हणाले.
“भाषा, प्रदेश, आणि धर्माच्या नावाखाली भेदभाव निर्माण करणे हे राहुल गांधींच्या विभाजनवादी विचारांचे प्रतीक आहे. मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत आरक्षणाला कुणी हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसह कुठलाही खेळ करू शकत नाही,” असे आव्हान अमित शाह यांनी राहुल गांधींना दिले.