नागपूर : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची ग्वाही दिली. शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधून स्पष्ट केले की, त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय घेतला जाईल, तो त्यांना मान्य आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी शिंदे यांचे आभार मानले. बावनकुळे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो. विरोधी पक्ष शिंदे यांच्याबद्दल नाराजी पसरवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, शिंदे यांनी महायुतीचे खरे नेतृत्व दाखवले आहे आणि त्यांच्या भूमिकेवर विरोधकांनी केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले आहे.”
बावनकुळे पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या विकासातील योगदान मोठे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती. महायुती नेहमीच विकासासाठी लढली, तर महाविकास आघाडी केवळ मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नासाठी लढत होती. त्यामुळेच जनतेने महायुतीला स्वीकारले.”
शेवटी बावनकुळे म्हणाले, “महाविकास आघाडीत आठ मुख्यमंत्री होण्याची स्पर्धा होती, पण महायुतीचे तीन नेते स्पष्टपणे सांगत होते की, ही लढाई विकासासाठी आहे, मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास दिला आहे.”