काळा राम मंदिर ते अयोध्या राम मंदिर हा प्रवास हिंदू समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. काळा राम मंदिर सत्याग्रहात अस्पृश्य समाजाने मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला होता. अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास कामेश्वर चौपाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कामेश्वर चौपाल हे अनुसूचित जातीचे आहेत. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे हिंदू पुनरुत्थानाची नांदी आहे. अयोध्येतील राम मंदिर हिंदू ऐक्याचे चैतन्यमयी शिल्प आहे. या हिंदू ऐक्यामधे जातिभेदाला कोणतेही स्थान नाही.
या वर्षीच्या रामनवमीचे विशेष औचित्य आहे. शतकानुशतकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू रामचंद्र आपल्या जन्मस्थानी विराजमान झाले आहेत. समस्त हिंदू समाजासाठी हा अत्युच्च आनंदाचा प्रसंग आहे. मात्र अयोध्येतील राम मंदिर सहजासहजी झालेले नाही. अयोध्येचा संघर्ष सात शतके चालू होता तरी त्याला गेल्या शतकात ऐंशीच्या दशकात खऱ्या अर्थाने वेग आला. हा संघर्ष सुफळ होण्यासाठीसुद्धा तब्बल चार दशकांचा कालावधी लागला.
अयोध्या विषयाकडे दुर्दैवाने केवळ राजकीय दृष्टिकोनातून बघितले जाते. हिंदुत्वाचे टीकाकार असा युक्तिवाद करतात की, अयोध्या आंदोलन म्हणजे भाजपसाठी `launching pad’ होते. अयोध्या आंदोलनाला पाठिंबा देणारा भाजप हा एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. साहजिकच भाजपला याचा फायदा झाला. मात्र, अयोध्या आंदोलनाच्या सामाजिक पैलूबाबत दुर्दैवाने लक्ष दिले गेले नाही. अयोध्या आंदोलन म्हणजे हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व विजय होता. हिंदू ऐक्याशिवाय अयोध्येत राम मंदिर उभे राहूच शकले नसते. याचाच दुसरा अर्थ असा की, ऐक्यासाठी किंवा प्रभू रामचंद्रांसाठी समस्त हिंदू समाजाने आपले जातिभेद संपूर्णपणे बाजूला सारले होते. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे हिंदू ऐक्याचे फार मोठे ऐतिहासिक प्रतीक आहे. अयोध्या राम मंदिर म्हणजे जातीविरहीत हिंदू समाजाचे जिवंत आणि चैतन्यमय शिल्प आहे.
भारतात प्रदीर्घ काळ जातिभेदाविरुद्ध लढा चालू आहे. जातिभेदाविरुद्धच्या लढ्याला मोठा इतिहास आहे. समाज सुधारणेची चळवळ ब्रिटिश शिक्षणाची देणगी आहे, हा एक भ्रम आहे. हिंदू समाजाची सुधारणा ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अयोध्या राम मंदिर म्हणजे या चळवळीचा परिपाक आहे.
एका ऐतिहासिक घटनेचे स्मरण या निमित्ताने अपरिहार्य आहे. मार्च १९३० मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे काळा राम मंदिरात सत्याग्रह केला होता. हा सत्याग्रह अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी होता. सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब स्वतः सहभागी झाले होते. त्या काळात अस्पृश्य बंधु-भगिनिना मंदिर प्रवेश मिळत नसे. काळा राम मंदिर सत्याग्रहाद्वारे बाबासाहेब जणू हिंदू धर्मावरील आपला हक्कच अधोरेखित करीत होते. हे आंदोलन प्रदीर्घ काळ चालू होते परंतु अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश मिळत नव्हता. काळा राम मंदिराबाहेर भजने गात अस्पृश्य समाज आपली मागणी मांडत होता. तथापि, कर्मठ समाजाकडून त्याला विरोधच होता. तब्बल पाच वर्षानंतर काळा राम मंदिराचे दरवाजे अस्पृश्य समाजाला खुले झाले होते.
काळा राम मंदिर सत्याग्रहानंतर तब्बल ९१ वर्षानंतर शुभसूचक घटना घडली. ऑगस्ट २०२१ मधे अयोध्या येथे प्रभू रामचंद्र मंदिराचा शिलान्यास पार पडला. हा शिलान्यास विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पार पडला. विशेष म्हणजे चौपाल हे अनुसूचित जातीचे आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळयालासुद्धा अनुसूचित जाती आणि जनजाती समाजातील जोडप्याना आवर्जून निमंत्रित केले होते. कामेश्वर चौपाल हे सध्या श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र या न्यासाचे विश्वस्त आहेत.
काळा राम मंदिर सत्याग्रह ते अयोध्या राम मंदिर हा हिंदू समाजाने केलेला दैदीप्यमान प्रवास आहे. नऊ दशकांपूर्वी अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेशासाठी झगडावे लागले होते. आज हिंदू समाजाच्या गौरवस्थानी असलेल्या अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास एका उपेक्षित समाज बांधवाच्या शुभ हस्ते संपन्न झाला होता. अयोध्या राम मंदिर म्हणजे संघटित आणि जातीविरहित हिंदू समाजाचे प्रतीक आहे. अयोध्या राम मंदिरात महर्षि वाल्मिकी, माता शबरी, जटायु, राजा निषाद यांची मंदिरे आहेत. हे केवळ प्रतीकात्मक नसून हिंदू समाजाच्या गतिशीलतेचे उदाहरण आहे.
अयोध्या आंदोलनात प्रारंभापासून सर्व समाज घटकांचा उस्फूर्त सहभाग होता. हिंदुत्वाची खरी सर्वसमावेशक कल्पना वास्तवात आणण्यासाठी राम मंदिर आंदोलनाचे फार मोठे योगदान आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमालासुद्धा सर्व समाज घटकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. विशेष बाब म्हणजे, या सर्व काळात महिलांचा फार मोठा सहभाग होता. २००५ साली सामाजिक समरसता मंचच्यावतीने समरसता यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा प्रारंभ काळा राम मंदिरांपासूनच झाला होता आणि समरसतेचा संदेश घेऊन ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात गेली होती. विशेष बाब म्हणजे काळा राम मंदिराचे एक विश्वस्त सुधीर दास यांनी आपल्या पूर्वजांच्या चुकीची प्रांजळ कबुली दिली होती.
पन्नास वर्षांपूर्वी सर्व उपाहारगृहात एक फलक दिसत असे. या फलकावर लिहिले जायचे की, सर्व जाती, धर्म, वंशाच्या लोकाना मुक्त प्रवेश आहे. असा फलक लावणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक होते. आज असे फलक दिसत नाहीत. कारण त्याची आता आवश्यकता नाही. याचाच अर्थ असा की, हिंदू समाजाने या कालबाह्य कल्पनांचा त्याग केला आहे. आंतरजातीय विवाहाला आज उत्साहवर्धक समाजमान्यता मिळाली आहे.
तथापि, संपूर्ण समस्या अद्याप मिटलेली नाही. आजही ग्रामीण भागात अप्रिय घटना घडत असतात. मंदिर, पाणवठा, लग्नाची वरात यात सर्वांना सहभाग हे विषय अजूनही संपूर्ण समाप्त झालेले नाहीत. आजही दुर्दैवाने honour killing च्या घटना घडत आहेत. याचाच अर्थ असा की हिंदू समाजाला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. अयोध्येचे राम मंदिर विषयात सर्व समाज घटकांकडून समजूतदारपणा आणि परिपक्वतेचे दर्शन झाले होते. हीच भावना कायम ठेवली तर समरसता प्रस्थापित होण्यासाठी वेग मिळेल. अयोध्येचे राम मंदिर या अर्थाने हिंदू समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. हिंदू समाजाने स्वतःवरील दोषांवर मिळवलेला विजय म्हणजे अयोध्येचे राम मंदिर. रामनवमीनिमित्त याचे सदैव स्मरण करणे आवश्यक.
सत्यजित जोशी
(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.)