Wednesday, January 8, 2025

महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू; नवीन आमदारांचा शपथविधी आजपासून

Share

मुंबई: आजपासून तीन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन (Special Session In Maharashtra Legislative Assembly) होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल. ९ डिसेंबरला नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. आजच्या शपथविधीची क्रमवारी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये कोणत्या आमदाराला प्रथम शपथ दिली जाणार याची माहिती उपलब्ध झाली आहे. विधिमंडळ सचिवालयाने शपथविधीचा क्रम जाहीर केला आहे. भाजपच्या चैनसुख संचेती यांना प्रथम शपथ दिली जाणार आहे, त्यानंतर जयकुमार रावळ आणि तिसऱ्या क्रमांकावर माणिकराव कोकाटे असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाचव्या क्रमांकावर, एकनाथ शिंदे सहाव्या आणि अजित पवार सातव्या क्रमांकावर शपथ घेणार आहेत.

पंधराव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात आज (शनिवार) पासून होत आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवसांत सर्व २८८ सदस्यांचा शपथविधी पार पडेल. सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि नंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या आणि विधेयके सादर केली जातील.

विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आलेल्या ७८ नवीन आमदारांचा आज प्रथम शपथविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे ३३, शिवसेना (एकनाथ शिंदे) १४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ८, शिवसेना (उद्धव ठाकरे) १०, काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ४ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय तीन अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.

कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेल्या कोळंबकर यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी राजभवनात शपथ दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख