नवी दिल्ली : मराठ्यांनी राष्ट्राच्या संरक्षणासाठी पानिपतच्या युद्धात (Panipat War) प्राणाची बाजी लावून शौर्य दाखवले. या ऐतिहासिक युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पानिपत येथे दिले. पानिपत युद्धाला २६४ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कालाआम परिसरात मराठा शौर्य दिन साजरा करण्यात आला. पानिपत शौर्य समितीने गेल्या १९ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करून मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन केले आहे.
यावेळी, याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पानिपतच्या युद्धातून त्याकाळात अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती-पातीच्या पलीकडे जाऊन देशासाठी लढण्याची शिकवण दिली, ज्याचा प्रभाव मावळ्यांनी पुरेपूर पाळला. त्यामुळे मराठ्यांनी दिल्लीच्या तख्ताची राखण केली. ही एकीची शिकवण कायम राखून, आपण एक अधिक समृद्ध महाराष्ट्र आणि भारत घडवू, असे ते म्हणाले. या शौर्य स्मारकासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे, आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील राज्य सरकारच्या वतीने उभारला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या कामासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून कार्यरत राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धानक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळ, यांनी प्रयत्न केले.