दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः।
सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे॥
—चाणक्य नीती: 3.4 [1]
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ठोस प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचा दहशतवाद पोसणारा खरा चेहरा जगासमोर आणला.
याच पार्श्वभूमीवर भारतातील अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार असलेला सैफुल्ला खालिद याची हत्या झाली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटली परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना रविवारी, १८ मे रोजी घडली. हल्लेखोरांनी अचूक लक्ष्य साधत केलेल्या गोळीबारात खालिदचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.
खालिदच्या मृत्यूने पाकिस्तानमधील दहशतवादी गटांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सैफुल्ला खालिद हा पाकिस्तानात उघड-उघड कार्यरत असलेल्या ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ‘कमांडर’ होता. तो हाफिज सईदच्या थेट संपर्कात असलेल्या निवडक प्रमुखांपैकी एक मानला जात होता. भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा सहभाग होता.
कोण होता सैफुल्ला खालिद? त्याचा भारतातील कारवायांमध्ये नेमका काय सहभाग होता? याचा तपशील पुढील अहवालात पाहूया.
सैफुल्ला खालिद, ज्याला सैफुल्ला कसुरी आणि रजा-उल्ला निजामानी या नावांनीही ओळखले जात असे, हा ‘लष्कर-ए-तोयबा’ या संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेतील एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली नेता मानला जात असे.
भारतविरोधी अतिरेकी कारवायांमध्ये खालिदने गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय भूमिका बजावली होती. त्याचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर नेपाळ आणि पाकिस्तान (अंतर्गत दहशतवाद) सारख्या शेजारी देशांमध्ये विस्तारले होते. या भागांमध्ये त्याने हिंसाचार आणि अतिरेकी विचारसरणीचा प्रसार करण्याचे काम केले, अशी माहिती आहे.
ओळख, टोपणनावे आणि पार्श्वभूमी
खालिदने आपल्या दहशतवादी कारवायांदरम्यान आणि आपली ओळख लपवण्यासाठी अनेक नावांचा वापर केला. या टोपण नावांमध्ये रजा-उल्ला निजामानी खालिद, गाझी अबू सैफुल्ला, विनोद कुमार, मोहम्मद सलीम, रजा-उल्ला आणि सैफुल्ला कसुरी यांचा समावेश होता.
त्याने घेतलेली टोपणनावे ही वेगवेगळ्या भाषा, प्रदेश आणि धार्मिक पार्श्वभूमीशी संबंधित असल्याने त्याला विविध सामाजिक वातावरणात सहज मिसळता येत असे. विशेषतः “विनोद कुमार”सारखे हिंदू नाव वापरणे हे भारतातील हिंदूबहुल भागात मुक्तपणे वावरणे आणि कोणताही संशय न येऊ देता गुप्त जाळे उभे करणे, यासाठी उपयुक्त ठरले. अशा नावांच्या माध्यमातून तो भारतातील विविध भागांत गुप्त संपर्क प्रस्थापित करत होता. हे त्याच्या योजनाबद्ध आणि रणनीतीनिष्ठ वर्तनाचे स्पष्ट उदाहरण आहे.
खालिदने वर्षानुवर्षे खोट्या ओळखी, बनावट कागदपत्रे आणि बोगस पासपोर्टच्या सहाय्याने गुप्तपणे विविध देशांमध्ये प्रवास केला. यामागे केवळ त्याचे वैयक्तिक नियोजन कौशल्य नव्हते, तर संस्थात्मक पाठबळही होते. त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय.एस.आयकडून समर्थन मिळत असल्याचा संशय अनेक आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सतत ओळख बदलत राहणे आणि नवनवीन टोपणनावांचा वापर करून त्याने भारतातील सुरक्षा यंत्रणांना दीर्घकाळ चकवले.

लष्कर-ए-तैयबा संघटनेतील पदोन्नती आणि अनेक कारवायांचे नेतृत्व
२००० च्या दशकात सैफुल्ला खालिद (त्या काळात रजाउल्ला निजामानी म्हणून ओळखला जात होता) नेपाळमधून लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व करत होता. भारतासोबत असलेल्या खुल्या सीमेमुळे नेपाळ लष्कर-ए-तैयबासाठी महत्त्वाचा तळ ठरला होता. खालिदच्या नेतृत्वाखाली या केंद्राने अनेक दहशतवादी कारवायांना पाठबळ पुरवले.
त्याच्या मुख्य जबाबदाऱ्यांमध्ये नवीन कार्यकर्त्यांची भरती करणे, दहशतवादी कारवायांसाठी निधीची व्यवस्था करणे, आवश्यक सामग्री व साधनांचा पुरवठा करणे, आणि भारत-नेपाळ सीमेवरून दहशतवादी घुसखोरीस मदत करणे यांचा समावेश होता.
आपली खरी ओळख लपवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मिसळून जाण्यासाठी खालिदने अत्यंत चलाखीने डावपेच आखले होते. त्याने ‘विनोद कुमार’ आणि ‘मोहम्मद सलीम’ अशी बनावट नावे वापरली. इतकेच नव्हे, तर त्याने नगमा बानो नावाच्या एका नेपाळी महिलेशी विवाह केला, जेणेकरून त्याची ओळख गुप्त राहील आणि तो स्थानिक समाजात सहजपणे मिसळू शकेल. या काळात तो लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ ‘लाँचिंग कमांडर’ आझम चीमा (उर्फ बाबाजी) आणि लष्करचा मुख्य लेखापाल याकूब यांच्याशी नियमितपणे संपर्कात होता. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेपाळमधील या नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर खालिदला पाकिस्तानात पळ काढावा लागला.
नेपाळमधील लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कचे नेतृत्व करत असताना सैफुल्ला खालिदवर अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्याचे कार्य केवळ भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यापुरते मर्यादित नव्हते. या उद्देशासाठी तो एक पूर्ण साखळी (नेटवर्क) चालवत होता, ज्यामध्ये तीन प्रमुख बाबींचा समावेश होता:
१. भारतीय मुस्लिम युवकांची भरती – खालिद धार्मिक कट्टरतेचा प्रचार करत असे आणि ‘जिहाद’च्या नावाखाली भारतीय मुस्लिम तरुणांना प्रेरित करून त्यांना गुप्त प्रशिक्षण शिबिरांमध्ये पाठवत असे. हे युवक प्रामुख्याने उत्तर भारत, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सीमावर्ती भागांतील होते.
२. बनावट कागदपत्रे आणि ओळखी – प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या युवकांना बनावट भारतीय मतदार ओळखपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, आणि पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून दिले जात. नेपाळमधील काही भ्रष्ट यंत्रणांशी संगनमत करून खालिदने ही प्रक्रिया अधिक सुलभ केली होती. यामध्ये हवालामार्गे आर्थिक व्यवहार, साखळी पद्धतीने स्थलांतर आणि ओळख लपवण्यासाठी बनावट ओळखींचा (‘डमी आयडेंटिटी’) वापर केला जात असे.
३. तयारीनंतर भारतात घुसखोरी – भरती करण्यात आलेले आणि बनावट ओळखपत्र असलेले हे तरुण पूर्वनियोजित मार्गांनी भारतात पाठवले जात. यासाठी बिहार-नेपाळ सीमेवरील फाटे, लहान गावांतील गुप्त चोरमार्ग आणि रहदारीसाठी वापरले जाणारे लपवलेले रस्ते वापरले जात असत. हे घुसखोर दहशतवादी धार्मिक पर्यटक, मजूर किंवा विद्यार्थी अशा सामान्य व्यक्तींच्या वेशात भारतात प्रवेश करत आणि दिलेल्या आदेशांनुसार विशिष्ट ठिकाणी सक्रिय होण्यासाठी प्रतीक्षेत राहत.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळमधील मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर खालिद पाकिस्तानात पळून गेला होता. नेपाळ मॉड्यूलद्वारे भारताविरोधी कारवायांमध्ये स्वतःचं महत्त्वाचं स्थान निर्माण केल्यानंतर, खालिदच्या जबाबदाऱ्या थेट पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा (एल.ई.टी) च्या मध्यवर्ती यंत्रणांकडे हस्तांतरित करण्यात आल्या. विविध गुप्तचर अहवालांनुसार, त्याची नियुक्ती पेशावर येथील एल.ई.टी. मुख्यालयाचा प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. पेशावर हे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील एक महत्त्वाचं दहशतवादी तळ मानलं जातं, जिथे एल.ई.टी.च्या धोरणात्मक हल्ल्यांचं नियोजन आणि प्रशिक्षणाची आखणी केली जाते.
याच दरम्यान, खालिद जमात-उद-दवा (जे.यू.डी.) या लष्कर-ए-तैयबाच्या सार्वजनिक मुखवटा संस्थेच्या मध्य पंजाबमधील समन्वय समितीवर कार्यरत होता. ही समिती वरकरणी धर्मप्रसार आणि समाजसेवा करणारी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती नव्या भरती, निधी संकलन आणि कट्टरपंथी प्रचारासाठी वापरली जात होती. जमात-उद-दवा ही संस्था लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांना वैचारिक पाठबळ आणि आर्थिक आधार पुरवणारी छुपी संघटना होती.”
पाकिस्तानात त्याने लष्कर-ए-तैयबाचा जम्मू-काश्मीरचा ‘कमांडर’ युसूफ मुझम्मिल, मुझम्मिल इकबाल हाश्मी व मुहम्मद युसूफ तैयबी यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर काम केले होते. खालिदकडे पाकिस्तानच्या सिंधमधील बदिन व हैदराबाद या जिल्ह्यांमधून कॅडर भरती करण्याचे काम, तसेच दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे कामदेखील सोपविण्यात आले होते.
- भारतविरोधातील कारवायांचा सूत्रधार
भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सतत हादरे देणाऱ्या आणि धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीत सैफुल्ला खालिद याचं नाव काळ्या अक्षरात नोंदवले गेले आहे. पाकिस्तानातील सुरक्षित आश्रयस्थळी लपून, दोन दशके त्याने भारतातील विविध संवेदनशील, प्रतीकात्मक आणि सामरिक केंद्रांवर हल्ल्यांचे नियोजन केले. लष्कर-ए-तैयबाचा तो केवळ एक कार्यकर्ता नव्हता, तर ‘मास्टरमाइंड’ म्हणून ओळखला जात होता. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांमध्ये त्याचं नाव नेहमी ‘हाय-वॅल्यू टार्गेट’ म्हणून नमूद केलं जातं.”
कधी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, कधी बंगलोरमधील भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), तर कधी उत्तर प्रदेशातील केंद्रीय राखीव पोलीस दलाची छावणी — हे हल्ले फक्त जीवितहानी करणारे नव्हते, तर देशाच्या विचारसरणीला, विकासाला आणि सुरक्षेला धक्का देण्याचा उद्देश होता.
सैफुल्ला खालिदच्या दहशतवादी कारवाया
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ला, नागपूर – १ जून २००६
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यामागे सैफुल्ला खालिद मुख्य सूत्रधार असल्याचे सातत्याने समोर आले आहे. या हल्ल्यात तीन लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी पोलिसांनी ठार केले, जे मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
२. राष्ट्रीय विज्ञान संस्थेवरील हल्ला, बंगलोर – २८ डिसेंबर २००५
बंगलोर येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर झालेल्या हल्ल्यातही खालिदचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात प्राध्यापक मुनीश चंद्र पुरी यांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणात दहशतवादी पलायन करण्यात यशस्वी ठरले होते.
३. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर हल्ला, रामपूर (उत्तर प्रदेश) – २००८
रामपूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर २००८ मध्ये झालेल्या घातक हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिदच होता. या हल्ल्यात सात जवान आणि एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. विज्ञान संस्थेवरील हल्ल्याप्रमाणे येथेही दोन दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
- मिल्ली मुस्लिम लीग
सैफुल्ला खालिदने (सैफुल्ला कसुरी या नावाने) मिली मुस्लिम लीग या राजकीय पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडली. ऑगस्ट २०१७ मध्ये त्याला या पक्षाचा अध्यक्ष करण्यात आले. मिली मुस्लिम लीगला हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि त्याच्या पर्याय म्हणून लष्कर-ए-तैयबाची राजकीय आघाडी म्हणून ओळखले जाते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मिली मुस्लिम लीगला लष्कर-ए-तैयबाचा एक भाग मानून सैफुल्ला खालिदचे या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिली मुस्लिम लीगचा खरा उद्देश हा पाकिस्तानला “एक खरा इस्लामी आणि कल्याणकारी देश” बनवणे हा होता. समाजाला कुराण आणि सुन्नत यांच्या आधारे घडवणे, देशांतर्गत सुरक्षा वाढवणे, तसेच काश्मीर संघर्षाला नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देणे हेही त्याच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये होते. मिली मुस्लिम लीगने २०१७ मध्ये एन ए -१२० (NA-120; लाहोर शहरातील एक मतदारसंघ) आणि एनए-४ (NA-4 – पेशावर मधील मतदारसंघ) येथे पोटनिवडणुका लढवण्यासाठी उमेदवार उभे केले, ज्यांना जमात-उद-दावा आणि हाफिज सईद यांचा पाठिंबा होता. मात्र, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मिली मुस्लिम लीगला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मिली मुस्लिम लीगच्या उमेदवारांनी ‘अल्लाह-ओ-अकबर तहरीक’ या दुसऱ्या पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढवली, परंतु त्यांना कोणतीही जागा मिळाली नाही.
नेपाळमधील दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश झाल्यानंतर सैफुल्ला खालिदने पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मतली, बदीन जिल्ह्यात आपला तळ हलवला. येथे त्याने लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावासाठी आपले काम सुरू ठेवले. बदीन आणि हैदराबाद जिल्ह्यांमधून नवीन कार्यकर्त्यांची भरती करणे आणि संघटनेसाठी निधी गोळा करणे यावर त्याने लक्ष केंद्रित केले. तो बदीनमध्ये आपली नेपाळी पत्नी नगमा बानू सोबत राहत होता.
१८ किंवा १९ मे २०२५ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी खालिदची हत्या केली. सिंध प्रांतातील मतली शहराजवळील बदनी येथे, तो आपल्या घरातून बाहेर पडला असता एका चौकात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. काही वृत्तांनुसार, हल्ला तीन हल्लेखोरांनी केला होता. रुग्णालयात पोहोचण्याअगोदरच त्याला मृत घोषित करण्यात आले.
वृत्तांनुसार, “ऑपरेशन सिंदूर” नंतर लष्कर-ए-तैयबाने अबू सैफुल्लाला (खालिद) आपल्या हालचाली मर्यादित ठेवण्याचे आणि त्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते या घटनेचा तपशील उपलब्ध नाही, पण यावरून पूर्वीची कोणती तरी सुरक्षा संबंधित घटना किंवा वाढलेला धोका लक्षात येतो. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी बदनी, सिंध येथे अनेक लष्कर-ए-तैयबाचे सदस्य उपस्थित होते.