Wednesday, July 16, 2025

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

Share

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन वर्ष झाली. आता ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान यांनी चौकशी समितीचे सर्व मुद्दे तेथील लोकसभेमध्ये सविस्तर मांडले आणि गरज पडल्यास कायदाही करावा लागला तरी करण्याची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही असेही अधोरेखित केले.)

मुलांशी गैरवर्तन व लैंगिक शोषणाचे संशयित असलेल्या सर्व व्यक्तींची वांशिक आणि राष्ट्रीयत्वाची माहिती नोंद करणे ही गोष्ट ब्रिटनमध्ये अनिवार्य करण्यात आली आहे. १६ जूनला पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या या घोषणेला श्रीमती केसी यांच्या चौकशी समितीचा संदर्भ आहे. त्यांनी या संदर्भातील आपला अहवाल सरकारला सुपुर्त केला.

गेली काही वर्षे या गोष्टीवर कारवाई अपेक्षित

जेव्हा सुएला ब्रेवरमन होम सेक्रेटरी होत्या तेव्हा त्यांनी या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी एक लेख लिहिला आणि आपल्या मुलाखतींमध्येही या ग्रूमिंग गँग संबंधित अनेक मुद्द्यांचा पुनरुच्चार करत. ( सुएला ब्रेवरमन या ब्रिटिश राजकारणी असून काँझरवेटिव पक्षाच्या सदस्या आहेत. त्यांनी दोन वेळा इंग्लंड आणि वेल्सच्या ॲटर्नी जनरल म्हणूनही काम केले. तसेच होम सेक्रेटरी म्हणून देखील दोन वेळा जबाबदारी सांभाळली. पहिल्यांदा ५० दिवसांसाठी, नंतर वर्षापेक्षा थोडा अधिक काळ) वस्तुस्थिती मांडताना त्या म्हणाल्या, ” प्रौढ व्यक्तींनी पद्धतशीरपणे मुलींचे लैंगिक शोषण, बलात्कार व गैरवर्तनही केले”. ” हा आपल्या देशावर एकप्रकारचा डागच आहे, ” असेही त्या म्हणाल्या. ” हे सर्वजण ब्रिटिश व पाकिस्तानी पार्श्वभूमी असलेला आहेत, त्यांचा सांस्कृतिक दृष्टिकोन ब्रिटिश मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे “. ” गुन्हेगारांमध्ये याच लोकांचे प्राबल्य आहे. एक उघड सत्य हेही आहे की, यांना कधीही त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी किंवा समाजाने जाब विचारला नाही. बहुतेकांना अर्थातच शिक्षाही झाली नाही. सत्य कधीही वर्ण द्वेषी नसते, पण या समस्येला भिडायला जबाबदार व्यक्ती कचरल्या, त्यांनी त्याकडे काणाडोळा केलं हेही खरेच.”

“या सगळ्या ग्रूमिंग गँगमधे प्रामुख्याने ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषच आढळतात. त्यांनी या अस्वस्थ कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व त्यामुळे असुरक्षित असलेल्या गोऱ्या मुलींना बळजबरीने ड्रग्स दिले, बलात्कार केले, त्यांचे लैंगिक शोषण केले आणि शिवाय वारंवार गैरवर्तन केले. ” हे असे बोलणे अप्रिय आणि अप्रचलित आहे, पण त्यांनी त्यांचे निरीक्षण, वारंवार आणि सातत्याने मांडले.  त्यांना वाटते या मुलींना न्याय मिळायला हवा,तो टाळता येणार नाही.

सुएला ब्रेवरमन यांना यासाठी त्यांना कठोर टीकेला सामोरे जावे लागले, शिवाय राजकीय हल्ल्यांना देखील तोंड द्यावे लागले. आपली भूमिका बदलावी यासाठी त्यांच्यावर दडपण आणले गेले. पण त्या बधल्या नाहीत, आता १६ जून रोजी झालेल्या निर्णयाने आपली भूमिका योग्य असल्याचा निर्वळाच मिळाला असल्याचे त्यांना वाटते.

तेव्हाही तत्कालीन पंतप्रधान यांनी या प्रकरणामध्ये मदतीसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना केली होती. मात्र नंतरच्या काळात सांस्कृतिक संवेदनशीलता व राजकीय सोय पाहण्याच्या नादात पिडीत मुलींकडे नेहेमी दुर्लक्ष केले गेले.

या समस्येच्या इतिहासावर नजर टाकली असता लक्षात येते की, साधारणतः १९९० पासून हा मुद्दा लक्षात येऊ लागला होता. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या व्यक्ती आधारगृहातून रात्री मुले उचलून नेत असल्याचे निदर्शनास आले होते. २००१ पासून अनेक रिपोर्ट आले, काही नावेही लक्षात आली.

२००० ते २००६ या काळात रोचडेल (Rochdale ) या गावाच्या ७ व्यक्ती या भीषण गुन्ह्यात सहभागी असल्याचे निदर्शनास आले. (रोथरहाम – Rotherham, टेलफोर्ड -Telford  या गावांची नावेही या संदर्भात समोर आली.)

२०१० मध्ये ५ ब्रिटिश – पाकिस्तानी व्यक्ती या गुन्ह्यात दोषी ठरल्या. मात्र पीडित मुलींचे वय १२ ते १६ या दरम्यान होते. २०११ या वर्षी The Times  ने या संबंधी माहिती गोळा केली, तेव्हा स्थानिक व्यक्तींना ही वस्तुस्थिती किमान दहा वर्षे लक्षात आले असल्याचे म्हणले होते. २०१२ ला रोचडेल या गावाच्या लैंगिक शोषणाबद्दल केस उभी राहिली. शिवाय संसदेने देखील या संबंधात सुनावणी घेऊन (चर्चाही करून) त्यावर काही सूचना प्रसिद्ध केल्या.

अलेक्सिस जे (Alexis Jay) यांनी स्वतंत्रपणे एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी नोंद होती की, मुलींना टॅक्सी बाहेर घेऊन जातात, त्यांच्यावर अत्याचार होतात, बलात्कार होतात. शिवाय त्यांना अन्य गावातही नेले जाते. हा जे (jay) अहवाल म्हणून ओळखला जातो. ब्रिटिश आणि आशियाई असलेल्या मुलींना लक्ष केले जाते. मात्र यावर योग्य कारवाई झाली नसल्याचेही अहवाल सांगतो.

सुएला ब्रेवरमन यांनी पीडितांच्या बाजूने जो आवाज उठवला, त्यावर आता वांशिक माहिती गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील वातावरण मानसिकदृष्ट्या संतुलित नसल्याने मुलींची असुरक्षितता वाढते. या गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि या मुलींना काय सोसावे लागले याचे तपशील मनाला अतिशय अस्वस्थ करणारे आहेत.

अनेक पीडित मुलींनी चौकशी समिती समोर येऊन पुरावे दिले, साक्षी दिल्या. सर्व गुन्हेगार मोठ्या वयाचे होते, तर मुली अल्पवयीन. या मुलींनी दिलेली माहिती हादरवून टाकणारी आहे. या मुलींशी अक्षरशः कसेही वागायचा परवानाच असल्यासारखे हे गुन्हेगार त्यांना वागवत. या साऱ्याचे घाव त्यांना जन्मभर विसरता येत नाहीत. मात्र अनेकजणी पुन्हा उभारी धरायचा प्रयत्न करत आहे हे विशेष. (या मुलींचे तपशील उपलब्ध असून दिले नाहीत कारण त्यांची साक्ष आणि भोगाव्या लागलेल्या यातना यालाच महत्व आहे.)

अत्याचार रोज होत, बलात्कार तर अनेक वेळा होत तेही अनेकांकडून. काही मुली हेरल्या जायच्या, त्यांची तस्करी होऊन आणि सरते शेवटी हे सारे अत्याचार.

एका पीडितेनी साक्ष दिली की ती २६ वर्षांची होईपर्यंत १५० पेक्षा अधिक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केले. या मुलींना उपभोग्य वस्तूसारखे किंवा शरीर सुखासाठी गुलामांसारखे वागवले जाई. त्यासाठी अत्यंत अस्वच्छ जागा, गल्लीबोळ किंवा गोदामासारख्या जागांचाही वापर होत असे. तेव्हा यातील काहींचे वय तर फक्त १० होते.

काही पीडित मुलींना शिकून आयुष्य पुन्हा उभे करण्याची इच्छा आहे. काहींनी सांगितले की मुलांच्या शाळेत पालक सभांना जाणे म्हणजे एक भयंकर संकट वाटते. अनेक महिलांना समाजाला सामोरे जाणे फार अवघड वाटते.

अनेक जणींची कौटुंबिक पार्श्वभूमी त्या बळी पडण्याला कारणीभूत ठरली. अतिशयोक्त कौतुक करणे हा विश्वास मिळवण्याचा मार्ग होता. शरीर सुखाला विरोध करू नये, त्यात वावगे वाटू नये म्हणून एक भावनिक नात्याचा गुंता निर्माण केला जायचा. विशेषतः मुलगी अगदी अल्पवयीन असेल तर अनेक वयस्क माणसांचे त्यांच्यावर लक्ष असायचे व त्याचे रूपांतर अत्याचारात होणे हाच शेवट असे.

सोशल मीडिया, टेक्स्ट मेसेज व अनेक ऍप यांचा वापर त्यांना आकर्षित करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर केला गेला. हे एक संघटित जाळे असल्याचेही निरीक्षण आहे. अनेक वेळा दारू व ड्रग यांचा वापर करून फसवणूक केली गेली. अनोळखी माणसांनी अतिशय हिंसकपणे अत्याचार केल्याची उदाहरणे समोर आली. अपहरण करणे, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, बळजबरी ही अस्त्रे देखील वापरली गेली.

बॉयफ्रेंड किंवा प्रेमी असल्याचे सोंग वापरले जायचे, पीडितेची फार काळजी असल्याचेही भासवले जायचे. मात्र नकार देणे वा विरोध करण्याने परिस्थिती अधिकच बिकट होत असे. काही मुलींची तर यामुळे जीव गमवावा लागला आहे.

संपर्काचे साधन म्हणून अनेक सेवा संघटनांमध्ये या पुरुषांनी शिरकावही केल्याचे आढळून आले. त्यातून या मुलींशी संपर्क साधता येणे सोपे होत असे. बहुतांशी या व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर, समान ने-आण करणारे, ड्रग्स विक्रेते म्हणजे रात्रीच्या अर्थव्यवस्थेचे भाग असल्याचे निरीक्षण आहे. रात्री उशिरा बाहेर असणाऱ्या मुलींशी यांचा सहज संबंध येऊ शकला.

यात पोलिस यंत्रणा, सामाजिक कार्यकर्ते तसेच समुपदेशक यांचेही अपयश नाकारता येत नाही. मात्र या मुलीच बेदरकारीने आयुष्य जगतात, वाईट मुलांच्या संगतीत असतात, ड्रग्सशी त्यांचा संबंध असतो असेच मानले गेले व दोष त्यांनाच दिला गेला. विश्वासार्ह नसणारी आणि अभावग्रस्त परिस्थिती हा एक दोषच ठरला.

लोकांचेही प्राधान्य देखील वैयक्तिक किंवा संस्थेच्या लौकिकालाच होते. सर्व जबाबदार लोकांना या बाल यौन शोषणाची माहिती होतीच, पण वर्णद्वेषी असा शिक्का बसण्याच्या भीतीने याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांना ते संरक्षण मिळण्याच्या योग्यतेचे नसल्यासारखे वागवले गेले, त्यांचाच तिरस्कार केला गेला, अनेकदा नशेत असल्याचे ठरवून त्यांनाच अटक झाली आहे. बालवेश्या असल्याचा ठपका ठेवला गेला, म्हणजे पीडितांनाच दोषी ठरवले गेले. साक्षीदारांना संरक्षण नाही, पुरेसा आधार आणि समुपदेशनाची सुविधा नाही अशी परिस्थिती आहे. मात्र या उदासीनतेवर आणि भीतीवर साऱ्यांना मात करावी लागेल.

सहज लक्षात येणारे वर्तनातील बदल आणि मानसिक आरोग्याकडे पहिले गेले नाही, याची नोंदच नाही ही वस्तुस्थिती आहे. मुलाच्या सुरक्षेविषयी संस्थांमध्ये खोलवर रुजलेले अपयश असेच याचे वर्णन करावे लागेल. नाहीतर मुलांना याचे ओझे आयुष्यभर वागवावे लागते.

मात्र आता मुलांना मुलांसारखे वागवण्याचा त्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार ब्रिटनच्या संसदेने केला आहे. तो नक्कीच स्वागतार्ह आहे.

  • विद्या माधव देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख