Thursday, August 14, 2025

राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे

Share

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
– बा. भ. बोरकर

राष्ट्रभक्ती, त्याग आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या वंदनीय प्रमिलाताई मेढे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आणि एका तेजस्विनीचा अस्त झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्र सेविका समितीच्या कार्यासाठी समर्पित केले. नि:स्वार्थ भावनेने काम करत त्यांनी जगभर समितीची पताका फडकवली, संस्कारांचा दीप प्रज्वलित केला आणि स्त्रीशक्तीमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवली. मृत्यूनंतरही त्यांनी आपले अवयवदान करून परहितकारक जीवनमूल्यांना मूर्त रूप दिले. राष्ट्रासाठी जगलेल्या या तेजस्वी ज्योतीचा प्रकाश आता प्रत्येक सेविकेच्या हृदयात सदैव प्रज्वलित राहणार आहे.

८ जून १९२९ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात प्रमिलाताईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजे रोवली गेली होती. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी बी.ए. आणि बी.टी. या पदव्या मिळवल्या. शिक्षणानंतर नागपूर येथील सी.पी. आणि बेरार विद्यालयात त्या अध्यापिका म्हणून रुजू झाल्या. ज्ञानदानाच्या या कार्यातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रकाश पसरवला.

यानंतर त्या डीएजीपीटी कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत झाल्या. मात्र त्यांच्या अंत:करणातील राष्ट्रसेवेची ओढ सतत जागी होती. बाल्यावस्थेतच ‘राष्ट्र सेविका समिती’शी जुळलेली त्यांची नाळ अधिकाधिक घट्ट झाली आणि अखेरीस त्यांनी स्वैच्छा निवृत्ती घेऊन संपूर्ण जीवन समितीच्या कार्यासाठी समर्पित केले.

प्रमिलाताईंच्या नेतृत्वामुळे समितीच्या कार्याचा अभूतपूर्व विस्तार झाला. १९७८ ते २००३ या कालावधीत त्या समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका म्हणून कार्यरत राहिल्या. या काळात त्यांनी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सेविकांचे जाळे निर्माण केले. त्यानंतर २००३ ते २००६ या काळात त्यांनी सह-प्रमुख संचालिका म्हणून जबाबदारी सांभाळली. २००६ साली त्या समितीच्या प्रमुख संचालिका बनल्या आणि २०१२ पर्यंत या पदावर कार्यरत राहून त्यांनी सेवाभाव, संघटनबळ आणि मातृत्वाचे विलक्षण एकत्रीकरण घडवून दाखवले.

त्यांच्या कार्यकाळात समितीचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये जाऊन त्यांनी समितीचे कार्य जागतिक पातळीवर नेले. सेविकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी असंख्य प्रवास केले. हजारो महिलांमध्ये आत्मविश्वास जागवला, संघटनशक्ती रुजवली आणि स्त्रीशक्तीला राष्ट्रनिर्मितीच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून अमेरिकेतील न्यू जर्सी महानगरपालिकेने त्यांना मानद नागरिकत्व बहाल केले. तर मुंबईतील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही मानद उपाधी प्रदान केली.

प्रमिलाताई नेहमी सांगत असत, “कोणतेही काम करताना एक ध्येय, एक साध्य, एक आदर्श आणि एक दैवत असावे.” त्यांच्या मते राष्ट्राची उपासना करताना भारतमातेलाच उपास्यदैवत मानावे. त्यांनी स्त्रीला अष्टावधानी मानले आणि महिलांना काळानुरूप बदल स्वीकारण्याचा सल्ला दिला. स्त्रिया जर आत्मविश्वासाने संघटित झाल्या तर समाजाच्या प्रत्येक घटकात परिवर्तन घडू शकते, हा त्यांचा ठाम विश्वास होता.

प्रमिलाताई मेढे यांचे जीवन हे राष्ट्रभक्ती, त्याग आणि मातृत्वाचा अनुपम संगम आहे. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेची ज्योत प्रज्वलित ठेवली आणि हजारो महिलांच्या अंत:करणात संघटनशक्तीची वटवृक्षासारखी रुजवात केली. त्यांचे कार्य हे फक्त समितीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरले आहे. राष्ट्रसेवेची अखंड ज्योत म्हणून प्रमिला ताईंचे स्मरण सदैव प्रेरणादायी राहील.

अन्य लेख

संबंधित लेख