भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या.
२३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती आणि परंपरांशी जोडली जात असल्याचा आनंद झाला. हा अनुभव केवळ कलात्मक नव्हता, तर भक्ती आणि पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व शिकवणाराही होता.
या कार्यक्रमात अनेक स्थानिक हंगेरियन नागरिकांनीही सहभाग घेतला. त्यांनी हिंदू संस्कृतीबद्दल आदर व्यक्त केला आणि स्वतःच्या हातांनी गणेश चतुर्थीसाठी मूर्ती तयार केली. भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
गणेश चतुर्थी हा विघ्नहर्ता, बुद्धीचा देव आणि शुभ कार्याची सुरुवात दर्शवणारा सण आहे. या कार्यशाळेतील सहभागींना मूर्ती बनवताना खरी भक्ती केवळ विधींमध्ये नसून, त्यात असलेले प्रेम आणि परिश्रम यात असल्याचे जाणवले.
हिंदू स्वयंसेवक संघ हंगेरीच्या स्वयंसेवकांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. अशा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांद्वारे HSS हंगेरी समाजात एकता आणि आपुलकीची भावना वाढवत आहे.