नवी दिल्ली: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी भारतीय उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. ते भारताचे 15 वे उपराष्ट्रपती (Vice President) ठरले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे.
या निवडणुकीत एकूण 781 मतदारांपैकी 767 सदस्यांनी मतदान केले. त्यापैकी 15 मते अवैध ठरली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर विरोधी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले.
सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी पाहता, ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून या सभागृहाची प्रतिष्ठा आणि मर्यादा अधिक वाढवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सी.पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी झारखंड येथेही राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी.राधाकृष्णन यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.