सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे.
राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्याच्या आणि त्यांना समाजातून समर्थन, सहकार्य मिळवून देण्याच्या उद्देशातून नागपुरातील ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे यंदाही अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून १२, १३ आणि १४ सप्टेंबर दरम्यान हे सेवा प्रदर्शन होत आहे. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन नि:शुल्क केले जाते.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे काम प्रदर्शनातील ५६ स्टॉलवर मांडण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या प्रदर्शनात सहभागी झालेल्या २४ संस्था या प्रदर्शनात यंदाही सहभागी झाल्या आहेत. नागपूर, ठाणे, बदलापूर, पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार, अमरावती, धारणी, मेळघाट, तिवसा, जळका, यवतमाळ, वरोरा, चंद्रपूर, भंडारा, वर्धा आदी ठिकाणच्या संस्थांचा तसेच राजस्थानातील एका संस्थेचाही सहभागी प्रदर्शनात आहे.
पितृपक्षात दानाचे फार महत्त्व आहे. या पंधरवड्यात केलेल्या दानाने पितरांना संतुष्टी मिळते, अशी मान्यता आहे. अभ्युदय सेवा प्रदर्शनाच्या माध्यमातून नागपुरातील नागरिकांना सत्पात्री दान करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे. पितृपंधरवाड्यात नागरिकांच्या दातृत्वाचा ओघ सेवा संस्थाकडे वळावा या दृष्टीने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, आपल्या दातृत्वाने संस्थांना बळकटी प्रदान करावी असे आवाहन संस्थेने केले आहे.
समाजकार्य विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर, विदर्भातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी (एमएसडब्ल्यू) आणि प्राध्यापकांनी सेवा संस्थांचे काम पहावे म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देतील. येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थांचे कार्य पाहून तेथेच रील बनवणे आणि मला आवडलेली एनजीओ या विषयावर लेख लिहिणे अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एमएसडब्ल्यू झालेले विद्यार्थी आपल्या रिझ्युम घेऊन येतील. त्यांच्यासाठी जॉब फेअर सारखी व्यवस्था करण्यात आली आहे.
एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आणि संस्था यांच्यात संवाद घडवण्याचाही उपक्रम केला जाणार आहे. प्रदर्शनात समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वयंसेवी संस्थाबरोबर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे, तसेच स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांना आपल्या संस्थेत नियुक्तही करू शकतील
उद्योजकांचा सहभाग
नागपूर, विदर्भातील नामवंत उद्योगांचे प्रमुख, सीएसआर हेड आणि एचआर हेड १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शनाला भेट देतील आणि संस्थांच्या कामाची माहिती घेऊन संस्थांचा विचार करतील. नागपुरातील व्यापारी वर्गाने १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शनाला भेट द्यावी अशी योजना आहे. तसेच १२ सप्टेंबर रोजी उद्योजक, व्यावसायिक प्रदर्शनाला भेट देतील.
तज्ञांशी संवादाचे दालन
संस्थांचा तज्ज्ञांशी संवाद व्हावा यासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ वेगवेगळ्या वेळी तीनही दिवस प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहेत. व्यवस्थापन, दस्तावेजीकरण, अकाउंटिंग, संघटन, सीएसआर, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, लघुउद्योगतून रोजगार निर्मिती, शेती आदि विषयाचे तज्ज्ञ येणार आहेत.
शासकीय योजनांची माहिती
अनेक शासकीय योजना स्वयंसेवी संस्थांनी राबवाव्या अशी अपेक्षा असते, पण त्यांना याची माहिती नसते. यासाठी सेवाभावी संस्थांना शासकीय योजनांची माहिती देण्याचीही व्यवस्था प्रदर्शनात आहे.
नागरिकांना सकाळी १२ ते रात्री ९ या वेळेत नागपूरमध्ये तात्या टोपे हॉल, तात्या टोपे नगर, वेस्ट हायकोर्ट रोड येथे हे सेवा प्रदर्शन पाहता येईल. सर्वांसाठी ते निःशुल्क खुले आहे. फ्रेंड्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजिले जाते.
थोडे ग्रामायणविषयी...
२०१२ मध्ये ग्रामायण प्रतिष्ठानने कामाला सुरूवात केली. समाजात कार्य करणाऱ्या सेवा संस्थांना भेटी देणे हा उपक्रम सुरू होता. नागरिकांना सेवा कार्याशी जोडून देणारा देणाऱ्या या उपक्रमातून अनेक गोष्टी समोर आल्या. सेवा संस्थांमध्ये उत्पादित होणाऱ्या मालाची विक्री व्हावी या दृष्टीने ग्रामायण सेवा प्रदर्शन सुरू करण्यात आले. सेवा प्रदर्शनाच्या माध्यमातून सेवा संस्था आणि उद्यम संस्था यांच्या सहभागाने ग्रामायण प्रदर्शने सुरू झाली. मागील वर्षी पासून सेवा कार्याचे वेगळे प्रदर्शन आयोजिण्याला सुरुवात करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला बळकटी मिळावी हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी सांगितले. विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विदर्भातील दीडशेपेक्षा जास्त सेवासंस्थांशी ग्रामायण प्रतिष्ठान जोडले आहे.