
जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे.

ज्या “ठाकरे ब्रँड” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे ब्रँडला आजपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कधीही ३ अंकी जागा मिळाल्या नाहीत. शिवसेनेला जास्तीत जास्त जागा या १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाल्या त्या होत्या ७३. त्यासुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना. एकट्याने लढून त्यांना जास्तीत जास्त जागा २०१४ मिळाल्या होत्या. त्या होत्या ६३…
ज्या ठाकरे ब्रँडच्या जोरावर आदित्य ठाकरे दिल्लीचे तख्त हलवण्याच्या बाता मारत आहेत तो ठाकरे ब्रँड त्यांच्या हातून ज्या क्षणी त्यांनी हिंदुत्व सोडलं त्याच क्षणी निसटला होता. कारण ठाकरे ब्रॅण्डची ओळख होती ज्वलंत हिंदुत्वामुळे. आज ना त्यांच्याकडे ती ज्वलंत हिंदुत्वाची विचारधारा आहे. आज त्यांच्या पक्षाचा ब्रँड हा रशीद मामू आहे. अजान स्पर्धा आयोजित करणारा. काँग्रेसचा मंत्री अस्लम शेखला मुंबईचा पालकमंत्री करणारा. उर्दू कॅलेंडर छापून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब असा करणारा. आणि कदाचित संधी मिळाली तर मुंबईचा महापौर एखादा मुसलमान करणारा असा मुस्लिम लांगुलचालनाची परिसीमा गाठणारा ठाकरे ब्रँड अशीच आज त्यांची ओळख आहे.
भारताच्या लोकसभेमध्ये आज आदित्य ठाकरे यांच्या पक्षाचे १ आकडी म्हणजे अवघे ९ खासदार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मोजून २० आमदार आहेत. म्हणजे ना विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवण्याएवढे आमदार आहेत ना पुढच्या निवडणुकीत आपल्या बळावर राज्यसभेत आपला एकही खासदार पाठवण्याचे त्राण.
त्यामुळे आज त्यांच्याकडे काय उरलं आहे…? फाटाफुटीने पक्ष उभा चिरला गेला आहे. ना पक्षाचे नाव ना निशाणी ना नेते ना तळमळीने झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते ना हिंदुत्वावर प्रेम करणारा मतदार. हिंदुरुदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडचा आणि आजच्या शिवसेना (उबाठा)चा काहीही संबंध नाही असेच अवघा महाराष्ट्र समजतो आहे. राजकीयदृष्ट्या आदित्य ठाकरे यांचा पक्ष पुरता कंगाल झाला आहे.

कायम युतीची सवय असल्यामुळे शिवसेना (उबाठा)ला नेहमी कोणाचा ना कोणाचा तरी आधार लागतोच. मग निवडणुका लढवण्यासाठी असो किंवा दिल्लीचे तख्त हलवण्यासाठी. एकट्याने काही करण्याची सवयही नाही आणि हिम्मतही नाही. मग कधी भाजपची सोबत… तर कधी काँग्रेस राष्ट्रवादी… मग मनसे… पण कुबड्या पाहिजेतच. ज्या पवार ब्रँडला घेऊन आदित्य ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड दिल्लीचे तख्त हलवायला निघाला आहे त्यात पवार ब्रँडच्या शिल्पकार शरद पवार यांना ३ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन एकदाही ५ वर्षांची कारकीर्द पुरी करता आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कधी ३ आकडी आमदार निवडून गेलेले नाहीत. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ आमदार ही त्यांची सगळ्यात मोठी गरुड भरारी. अन्यथा शरद पवार यांनी स्वबळावर कायम ५०-५५ आमदार निवडून आणले आहेत.
आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिरफळ्या उडाल्या आहेत. भारताच्या लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ८ खासदार आहेत तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जेमतेम १० आमदार.

साडेतीन जिल्ह्यांचे नेते आणि कायम भावी पंतप्रधान अशीच त्यांची आजपर्यंतच्या राजकारणात ओळख आहे. शरद पवार यांचा खरा ब्रँड हा कधीही पाठीत खंजीर खुपसणारा असा “विश्वासघातकी” ब्रँड आहे. याला साक्ष आदित्य ठाकरे यांचे आजोबा आहेत.
“शरद पवार जरी मित्र असला तरी ती नीच प्रवृत्ती आहे – इति बाळासाहेब” असे ट्विट खुद्द आदित्य ठाकरे यांच्या पक्षाने १८ मार्च २०१२ रोजी केलेले आहे.
अशा नीच प्रवृत्तीला सोबत घेऊन आदित्य ठाकरेचे दिल्लीचे तख्त हलवायला निघाले आहेत. त्या दिल्लीच्या तख्ताची ताकद काय आहे हेही बघणे आवश्यक ठरते.

दिल्लीच्या तख्तावर विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली २४ वर्षे सत्ता स्थानी आहेत. आमदार नसताना ते मुख्यमंत्री झाले आणि खासदार नसताना पंतप्रधान झाले. ३ वेळा गुजरातची विधानसभा आणि ३ वेळा भारताची लोकसभा त्यांनी निर्विवादपणे मारली आहे. २०१४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीत केवळ निर्विवाद बहुमतच मिळवले नाही तर काँग्रेसला ४४ जागांवर आणून ठेवले होते. त्याच वेळी भारताचे पंतप्रधानपद हे कोणा एका घराण्याची वडिलोपार्जित संपत्ती अथवा वारसा हक्काने मिळालेली गादी नसून एक सामान्य चहावाला देखील या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असा विश्वास जनतेला दिला.
आज लोकसभेत भाजपचे २४० खासदार आहेत. २१ राज्य व केंद्रशासित प्रदेशात एकतर भाजपचे सरकार आहे किंवा आपल्या सहयोगी पक्षांबरोबर भाजप सत्तेत सामील आहे. देशभरात भाजपचे १,६५६ आमदार आहेत.
त्यांना लक्ष्मणासारखी साथ देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोडीने नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाचा पोत (texture) बदलून टाकला आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद अर्थात हिंदुत्व आणि विकास या दोन्ही आघाड्यांवर आमुलाग्र परिवर्तन करून मोदी शहा जोडगोळीने देशात अभूतपूर्व परिवर्तन आणले आहे. “मेरा देश बदल रहा है” भारताची जनता अनुभव घेते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर “मै देश नहीं झुकने दूंगा” या तत्त्वानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वाभिमानी आणि कणखर परराष्ट्र धोरणाने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाखाणण्याजोगी वाढलेली आहे.
अटलजींच्या काळात पंतप्रधानपदामुळे अटल बिहारी वाजपेयी भाजप आणि कमळ हे देशाच्या घराघरात पोहोचले होते. पण त्या प्रमाणात मतदार उभा राहिला नव्हता. मात्र मोदी-शहा जोडगोळीने साधारण ३७% मतदार भाजपच्या मागे उभा केला आहे. तोही स्वकर्तृत्वाने आणि कोणताही कौटुंबिक राजकीय वारसा नसताना आणि तो ही “राष्ट्र सर्वोपरी”शी कोणताही समझोता न करता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या राजकारणातील “घराणेशाही” च्या मुळावर मोदी-शहा जोडगोळीने कुठाराघात केला आहे. निव्वळ भावनिक राजकारण करून निवडणुकांमध्ये मर्यादित यश मिळाले तरी सत्ता प्राप्तीसाठी राजकीय सौदेबाजी करायची ही या घराणेशाहीवर आधारलेल्या राजकीय पक्षांची लोकशाहीला भयंकर घातक अशी कार्यशैली (modus operandi) होती. हा एक प्रकारचा राजकीय भ्रष्टाचारच होता. “ना खाऊंगा ना खाने दूंगा” अशी प्रतिज्ञा घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा भ्रष्टाचार कसा सहन व्हावा…? भारतीय संसदीय लोकशाहीला मिळालेला हा शाप. राजकीय भ्रष्टाचार मोदी-शहा जोडगोळीने देशभरात जवळपास संपवत आणला आहे.
देशभरातील घराणेशाहीचे ब्रँड्स पुरते मोडीत निघत आहेत आणि मोदी शहा या जोडगोळीशी राजकीय लढाई जिंकण्याची बात तर दूर पण ती कशी करायची हेच या ब्रँडेड विरोधकांना कळेनासे झाले आहे.

आणि मोदी-शहा यांच्या या युगप्रवर्तक राजकारणाचे महाराष्ट्रातले बळी आहेत आदित्य ठाकरे यांचा हिरवागार “ठाकरे ब्रँड” आणि शरद पवार यांचा विश्वासघातकी “पवार ब्रँड”. दिल्लीचे तख्त हलवण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या ज्या बाता आहेत त्या याच वैफल्यातून आल्या आहेत. सबंध देशातील घराणेशाहीचे ब्रँड्स पार मोडकळीला येत असताना आपले अंध:कारमय राजकीय भवितव्य त्यांना छळते आहे. त्यामुळे दिल्लीचे तख्त हलवण्याचे त्यांनी उसने अवसान आणले आहे आणि त्यातून पवार ब्रँड आदित्य ठाकरे यांच्या “ठाकरे ब्रँड”चा कधी विश्वासघात करेल हे देखील सांगता येणार नाही.
अर्थात् बेडूक फुगला म्हणून त्याचा बैल होत नाही. आदित्य ठाकरे बैल होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. १६ जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी झाली की हा फुगलेला बेडूक फटकन फुटेल… तीच त्याची अटळ नियती आहे…
– मालवणी खवट्या