मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आता ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी एक सविस्तर ट्विट करत, “मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल” हा दिलेला शब्द भाजपने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका करत त्यांनी मुंबईकरांच्या निकालाचा दाखला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर अमराठी होणार असा प्रचार विरोधकांकडून केला जात होता. मात्र, भाजपने रितू तावडे या मराठी चेहऱ्याची निवड केल्यावर अमीत साटम यांनी ट्विटच्या माध्यमातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अमीत साटम यांचे ट्विट जसेच्या तसे:
“आम्ही शब्द दिला होता… आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला!
मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार, आणि महायुतीचाच होणार… हे आम्ही केवळ बोलून दाखवले नाही, तर करून दाखवले!
आज सौ. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड होऊन मुंबईकरांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीने मुंबईची अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि हिंदुत्वाशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुंबईकरांनीच त्यांचा डाव उधळून लावला.
मुंबई कोणाच्या राजकीय प्रयोगशाळेसाठी नाही, मुंबई कोणाच्या अहंकारासाठी नाही, मुंबई ही मराठी माणसाची, हिंदुत्वाची आणि विकासाची राजधानी आहे आणि ती तशीच राहणार!
महायुतीने दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मुंबईकरांचा कौल स्पष्ट आहे दुहेरी भूमिका, दुटप्पी हिंदुत्व आणि संधीसाधू राजकारणाला मुंबईत स्थान नाही.
महापौर सौ. रितू तावडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मुंबईच्या विकासाचे नवे पर्व आता सुरू झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय श्रीराम!”
उद्धव ठाकरेंवर निशाणा
अमीत साटम यांनी आपल्या ट्विटमध्ये अत्यंत कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीने मुंबईची अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड केली,” असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई ही कोणाच्या ‘अहंकारासाठी’ नसून ती विकास आणि हिंदुत्वाची राजधानी असल्याचे सांगत साटम यांनी महायुतीच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने रितू तावडे यांचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साटम यांच्या या विधानामुळे मुंबई महापालिकेत आता खऱ्या अर्थाने भाजप आणि शिंदे गटाच्या वर्चस्वाचे नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे.