Thursday, August 14, 2025

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा

Share

नुकतीच आर्मीचे डॉ रोहित बचेला यांनी एका महिलेला झाशी रेल्वे स्टेशनवर प्रसूतीसाठी मदत केल्याची बातमी वाचली. (माता आणि नवजात शिशु सुखरूप आहेत) डॉ. बचेला स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते. अचानक त्यांच्यासमोर पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची केस आली. व्हील चेअरवर बसवून या महिलेला रुग्णालयात नेले जात असताना तिची  परिस्थिती बिघडली. तिची प्रसूती जवळ आली होती व ती अजून स्टेशनवर होती. डॉ रोहित यांना क्षणात परिस्थितीचा अंदाज आला.

त्यांनी लोकांच्या मदतीने तात्पुरता आडोसा स्टेशनवरच तयार केला आणि महिला तिथेच प्रसुत झाली. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यावर केसाला लावण्याच्या क्लिपचा चिमट्यासारखा वापर करून आणि चाकूने नाळ कापली. शिवाय वेळेवर आपल्या ठरलेल्या गाडीने ते रवाना देखील झाले. या प्रसंगावरून डॉक्टर हा कायम आल्या परिस्थितीला तोंड द्यायला तयारच असतो याची प्रचिती येते. एकदा डॉक्टर झालं की कायम (२४/७) तो/ती व्यक्ती डॉक्टर असते.

ही बातमी वाचल्यावर माझं मनं कोरोना काळात गेले. आणि पूजा भोसलेची आठवण करून दिली. एक वर्षाचा नर्सिंगचा कोर्स करून तिने पुढच्या प्रगत कोर्ससाठी महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. कोरोनाचा प्रभाव दिसू लागला होता. त्यातला तो लॉकडाउनचा काळ मोठा कसोटीचा होता. पूजा सुतारवाडीला राहत असे. तिच्या शेजारी एक गर्भवती तरुण स्त्री राहत होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, घरचे रुग्णवाहिका शोधत होते, फोन करत होते, पण कुठुनच प्रतिसाद मिळत नव्हता. पूजाला हे कळल्यावर ती तात्काळ शेजारच्या घरी गेली, तिने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तिच्या लक्षात आले की, बाळाचा जन्म जवळ आलाय. हॉस्पिटल पर्यंत जायला वेळ नव्हता. मात्र केस देखील अवघड होती, त्या महिलेचा या आधी दोनदा गर्भपात झालेला होता, ती तिसरी वेळ,  सारेच काळजी करण्यासारखे होते.

पूजाने या आधी पाचगणीला वर्षाचा कोर्स करत असताना प्रसूतीसाठी आपल्या सिनिअरना वा डॉक्टरना अनेकवेळा मदत केली होती, पण स्वतंत्रपणे एकटीने प्रसूती करण्याचा प्रसंग मात्र आला नव्हता. पण न डगमगता शांतपणे ती तयारीला लागली, आजूबाजूच्या लोकांची मदत घेतली, नवीन दाढीचे ब्लेड नाळ कापायला आणि दोरा नाळ बांधायला या दोन्ही वस्तू निर्जंतुक करून घेतल्या. बाळाच्या आईला सूचना देत व धीर देत तिने तिची सुरक्षितपणे प्रसूती घडवून आणली. बाळ व आई दोघेही सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यावर, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितले. पूर्ण लक्ष केंद्रित करून सगळे केले. तिचा बाळासह फोटो काढल्याचे देखील तिच्या लक्षात आले नव्हते. तेंव्हाही तिच्याशी बोलले होते. नंतर तिला कर्वे संस्थेने  “अण्णांची लेक” हा पुरस्कार प्रदान केला. अनेक संस्थांनी तिचा सत्कार केला,  पुरस्कार दिले. तिच्या समयसूचकतेचे अतिशय कौतुक झाले. आता ही बातमी वाचल्यावर तिला परत फोन केला आणि विचारलं, “तुला अजून आठवते ती वेळ?” ती म्हणाली, “अर्थातच”. तिच्या बोलण्यात कमालीचे समाधान होते. शिवाय म्हणाली, ” नुकतेच त्या बाळाचे वडील भेटून गेले. तो आता जवळ जवळ ६ वर्षांचा आहे. फार छान वाटले त्याला पाहून. “अण्णांची लेक” शोभली खरी पूजा. आई आणि मुलाची सुखरूप सुटका करताना तिने दाखविलेले धैर्य आणि आत्मविश्वास खरंच वाखाणण्यासारखा होता. एकटीने तिने सर्व तयारी करून बाळाच्या आईला धीर व सूचना देत तिने त्यावेळी जे केले त्याला तोड नाही. या प्रसंगानंतर एक वर्षात तिचा कोर्स पूर्ण झाला. तिची आईही नर्स आहे. तेंव्हा ती सुतारवाडीला राहत होती व आता सुसला राहते हाच काय तो फरक. आताही ती एका हॉस्पिटलमध्ये काम करतेच आहे. आपला अनुभव योग्य वेळी कामाला आला, एक जीव सुरक्षितपणे या जगात आला, याचे तिला कायम समाधान आहे. शिक्षण कधी वाया जातच नाही नाही का?

योगायोग असा की, बाया (अण्णांची द्वितीय पत्नी) सुद्धा एक प्रशिक्षित नर्स होती. तिने नागपूरला डफरिन हॉस्पिटलमध्ये हा कोर्स केला. तेंव्हा हिंदी व इंग्रजी माध्यमात शिकवत असत. मातृभाषेखेरीज अन्य भाषेशी ओळख होणे तेंव्हा अजिबात सोपे नव्हते. शिवाय इंग्रजी अगदी परकी भाषा. मुलगा एक वर्षांचा. १८९० सालच्या आसपासची ही घटना आहे. पण तिने शांतपणे आणि निर्धाराने ते निभावले. कोर्स पूर्ण केला. आयुष्यभर अनेक स्त्रियांना तिने मदत केली.

ती बाल विधवा होती, (वय वर्षे ८ असताना पहिले पती वारले) अण्णांशी झालेला विधवा विवाह (वयाच्या जवळ जवळ २८ व्या वर्षी) समाजाला तो मान्य नव्हता. पण तिने शांतपणे अनेकांना मदत करून आपले समाजात स्थान निर्माण केले. अर्थात हे सारे सोपे नव्हते. हा तिच्या आयुष्याचा एक दुस्तर घाट होता.

योगायोगाने पूजाही निघाली तिचीच लेक. न बिचकता काम करणारी. अशी अनेक उदाहरणे कर्वे संस्थेत सापडतात. अनेक कर्तबगार मुली संस्थेतून शिकून बाहेर पडल्या व आपापल्या कर्तृत्वाने समाजाला आधारभूत ठरल्या.

आयुष्यात दुसऱ्याला उपयोगी पडण्याचे प्रसंग वारंवार येत नाहीत. जीव वाचवण्याचे तर अगदी क्वचित. या क्षणांची साथ व स्मृती कायम राहते आणि प्रेरणाही.

  • विद्या माधव देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख