इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानहून प्रसिद्ध होणाऱ्या नवाईवक्त या वृत्तपत्राच्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ ई-आवृत्तीत शिर्षकात “इरान पर हजारों कुर्दों का हमला” अशी बातमी देऊन हे अमरिकी शाह म्हणजे अमेरिकेचे कारस्थान म्हटले आहे.

कुर्दांना इराणविरुद्ध भडकवून अमेरिकेची CIA आणि इस्त्राएल यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचे षडयंत्र रचले आहे. असा इराणचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याला हे अमरिकी शाह अमेरिकेचे कारस्थान म्हणत आहेत.
इराणवर हजारो कुर्दांचा हल्ला. हा इराणचा अंतर्गत मामला असला तरी त्यानिमित्ताने “कुर्द” समाजाची चाललेली ससेहोलपट आणि “इस्लामी उम्मा”च्या उडालेल्या चिंधड्या समजवून घेणे समयोचित ठरेल.
कुर्द (Kurds)…

कुर्द हे पश्चिम आशियातील एक स्थानिक वांशिक गट आहे. हे प्रामुख्याने तुर्कीए, इराक, इराण आणि सीरियाच्या डोंगराळ प्रदेशात राहतात. या ४ देशांमध्ये मिळूनच सुमारे ३ कोटी कुर्द राहतात.
या प्रदेशाच्या बाहेर कुर्दांची सर्वात जास्त लोकसंख्या जर्मनीमध्ये आहे. सुमारे १२.५० लाखांपेक्षा जास्त त्याशिवाय अझरबैजान फ्रान्स स्वीडन नेदरलँड या देशांमध्ये देखील प्रत्येकी १/१.५ लाख खुर्द रहिवासी आहेत. जगात वेगवेगळ्या देशांमध्ये विखुरलेले खुर्द मिळून त्यांची लोकसंख्या सुमारे ३.५ ते ४ कोटी होते.
कुर्द हा एक स्वतंत्र आणि वेगळा वांशिक गट (Ethnic Group) आहे. ते अरब, तुर्क किंवा पर्शियन यापैकी कोणत्याही वांशिक गटाचे नसून कुर्द हे हजारों वर्षांपासून मेसोपोटेमियाच्या मैदानी आणि डोंगराळ प्रदेशाचे रहिवासी आहेत. त्यांची स्वतःची संस्कृती, इतिहास, चालीरीती आणि कुर्दिश भाषा आहे. कुर्दिश भाषा ही इंडो-इराणी भाषा गटात मोडते. शिवाय कुर्दांच्या सर्वात जास्त बोलली जाणारी कुरमनजी आणि त्याच्या खालोखाल सोरानी यासारख्या अनेक प्रादेशिक बोलीभाषा आहेत. पण मजेदार गोष्ट अशी की, कुरमनजी लिहिण्यासाठी प्रामुख्याने लॅटिन (Latin) लिपीचा वापर केला जातो. याउलट सोरानी ही दुसरी मुख्य बोली अरबी लिपीत लिहिली जाते.
बहुतेक कुर्द हे सुन्नी मुस्लिम आहेत. परंतु त्यांच्यात शिया, ख्रिश्चन, याझिदी आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकदेखील आहेत.
हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार – याझिदी कुर्द

कुर्द समाजातील काही गट आणि त्यांच्या प्राचीन परंपरांचा हिंदू संस्कृतीशी संबंध असल्याचे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ मिळतात. विशेषतः यझिदी (Yezidi) हा अल्पसंख्याक कुर्द गट हिंदू संस्कृतीशी अधिक साधर्म्य दाखवतो. कुर्द समाजाचा भाग असलेल्या यझिदी लोकांच्या परंपरा हिंदू संस्कृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. हिंदू धर्माप्रमाणेच यझिदी लोकही ‘पुनर्जन्म’ आणि ‘आत्म्याचे चक्र’ (Samsara) या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. यझिदी धर्मात अग्नी, प्रकाश आणि निसर्गाला पवित्र मानले जाते आणि ते प्राचीन वैदिक हिंदू परंपरेशी साधर्म्य दर्शवते.

इराक मधील ललीश येथील यझिदी मंदिरे आणि तेथील विधी, तसेच मंदिरांचा आकार आणि हिंदू मंदिरांच्या स्थापत्य शैलीत साम्य दिसून येते.
कुर्द: आपल्याकडचे भटके व विमुक्त (nomadic)

कुर्द समाज म्हणजे आपल्याकडचे भटके व विमुक्त (nomadic). कुर्द लोक प्रामुख्याने शेळ्या आणि मेंढ्यांचे पालन करत. त्यांच्या जीवनशैलीत पशुधनाला अत्यंत महत्त्व होते, कारण त्यातून त्यांना दूध, मांस आणि लोकर मिळत असे. डोंगराळ भागात आणि नद्यांच्या खोऱ्यात ते पारंपारिक पद्धतीने शेती करत असत. गालिचा विणकाम (Carpet-weaving) ही कुर्दांची सर्वात महत्त्वाची पारंपारिक लोककला आणि व्यवसाय आहे. त्यांच्या गालिच्यांवरील नक्षीकाम आणि रंगकाम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. कुर्द लोक तांब्याच्या वस्तू बनवण्यासाठी (Copper-working) ओळखले जातात. तसेच चर्मकाम (Leather-working), भरतकाम (Embroidery) आणि दागिन्यांवरील नक्षीकाम हे देखील त्यांचे पारंपारिक जोडव्यवसाय होते.
अबला न कुर्दिश माता रे

कुर्दिश स्त्रिया त्यांच्या शौर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी विशेषतः सीरिया आणि इराकमध्ये आयएस (ISIS) विरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून आपल्या भूमीचे रक्षण केले आहे. कुर्दिश स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी ‘जिनॉलॉजी’ (Jineolojî) ही संकल्पना आहे, ज्याचा अर्थ ‘स्त्रीचे विज्ञान’ असा होतो. ही विचारधारा लैंगिक समानता आणि स्त्रियांच्या राजकीय सहभागावर भर देते.
कुर्दिश समाजात स्त्रिया केवळ घर सांभाळत नाहीत, तर त्या राजकारण आणि निर्णया प्रक्रियेतही सक्रिय असतात. अनेक कुर्दिश राजकीय पक्षांमध्ये ‘सह-अध्यक्ष’ (Co-chair) पद्धत असून त्यात एक पद स्त्रीसाठी राखीव असते.

कुर्दिश स्त्रियांचे कपडे अतिशय रंगीबेरंगी आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांच्या पोशाखात सहसा लांब झगे, कंबरेला बांधलेला कापडी पट्टा (Belt) आणि डोक्यावर विविध प्रकारचे स्कार्फ यांचा समावेश असतो.
पारंपारिक कुर्दिश गाण्यांमध्ये काळे डोळे (अतिशय गडद रंगाचे डोळे) आणि लांब सरळ केसांचे कौतुक केले जाते. आधुनिक काळात कुर्दिश महिला पाश्चात्य आणि आशियाई फॅशन ट्रेंडचाही अवलंब करताना दिसतात. कुर्दिश स्त्रिया संगीताच्या माध्यमातून विशेषतः ‘हेरान्स’ (Heyran) सारख्या लोकगीतांद्वारे आपला इतिहास आणि भावना जिवंत ठेवतात.
शूर आम्ही कुर्दिश आम्हाला काय कुणाची भिती

कुर्द लोक प्रामुख्याने दुर्गम आणि डोंगराळ भागात राहिल्यामुळे आणि सततची शारीरिक हालचाल व कठोर हवामानाचा सामना करावा लागल्यामुळे तसेच आहारात भाज्या, मांस मटण व दूध दुग्धजन्य पदार्थांचा भरपूर वापर करत असल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिकरित्या चपळता, चांगली शारीरिक क्षमता, काटकपणाआणि सहनशक्ती अधिक दिसून येते.

दोल्मा (Dolma) हा कुर्दिश संस्कृतीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय पदार्थ आहे. यात द्राक्षाची पाने (Grape leaves), कोहळा, वांगी किंवा शिमला मिरचीमध्ये तांदूळ, मांस आणि मसाल्यांचे मिश्रण भरून ते शिजवले जाते.
कुर्द – ‘राज्य नसलेले राष्ट्र’ (Stateless Nation)

कुर्दांची वस्ती असलेल्या तुर्कीए, इराक, इराण आणि सीरियाच्या डोंगराळ प्रदेशाला ते “कुर्दिस्तान” मानतात. आर्मेनियामध्ये कुर्द संख्येने अत्यंत अल्प राहत असले तरी आर्मेनियाचा काही भाग हा आपल्या कुर्दिस्तानात असल्याचे कुर्द जनता मानते. पहिल्या महायुद्धापासून कुर्द स्वतंत्र राष्ट्राची (कुर्दिस्तान) मागणी करत आहेत. मात्र अजूनही कुर्दिस्तानचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. त्यामुळे कुर्द हे जगातील सर्वात मोठे ‘राज्य नसलेले राष्ट्र’ (Stateless Nation) मानले जाते.
सद्दाम हुसेन यांच्या राजवटीविरुद्ध दशकांनुशका लढा दिल्यानंतर १९९१ च्या आखाती युद्धानंतर उत्तर इराकमध्ये कुर्दिश स्वायत्त प्रदेशाची निर्मिती झाली. पण संपूर्ण स्वातंत्र्य नाहीच.
संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष

कुर्द आणि तुर्कीए यांच्या संघर्षाचे मुख्य केंद्र म्हणजे PKK ही संघटना. या संघटनेची स्थापना १९७८ मध्ये अब्दुल्ला ओजालान (Abdullah Öcalan) यांनी केली होती. १९८४ मध्ये या संघटनेने तुर्कीए सरकारविरुद्ध सशस्त्र बंड सुरू केले. सुरूवातीला कुर्दांची मागणी तुर्कीएच्या काही भागांपासून वेगळे होऊन स्वतंत्र ‘कुर्दिस्तान’ स्थापन करण्याची होती. नंतर त्यांनी ही मागणी बदलून तुर्कीच्या चौकटीतच अधिक राजकीय आणि सांस्कृतिक स्वायत्तता मिळवण्यावर भर दिला.
ऐतिहासिकदृष्ट्या तुर्कीए सरकारने कुर्दांची स्वतंत्र ओळख नाकारली होती. त्यांना “माउंटन तुर्क” (Mountain Turks) असे संबोधले जायचे आणि कुर्दिश भाषा, पेहराव व संगीतावर सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली होती. गेल्या ४० वर्षांतील या सशस्त्र संघर्षात आतापर्यंत ४०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांचा समावेश आहे. गेल्या पाच-सहा दशकांचा इतिहास बघितला असता कुर्दांच्या नशिबी फक्त संघर्ष संघर्ष आणि संघर्षच लिहिलेला आहे.
यज्ञ ज्यांनी देऊनि निजशीर- पॅशमर्गा सेना

उत्तर इराक मधील या स्वायत्त कुर्दिश प्रदेशात पॅशमर्गा (Peshmerga) ही कुर्दांची लष्करी फौज असून वर उल्लेख केल्याप्रमाणे पॅशमर्गाची विशेषता म्हणजे या सैन्यात पुरुषांबरोबर महिलांच्या देखील फलटणी आहेत. पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून या महिला लढत असतात.
पॅशमर्गा या शब्दाचा कुर्दिश भाषेतील अर्थ “मृत्यूला सामोरा जाणारा” किंवा “मृत्यूशी झुंज देणारा” असा होत असल्यामुळे पॅशमर्गा सैनिक हे अत्यंत कडवे व लढवय्ये जवान मानले जातात. (शिवाय अस्तित्वाचाच प्रश्न असल्यामुळे मरता क्या न करता… या उक्तीनुसार ते निकराने लढतात).
अमेरिका आणि नाटो देश पॅशमर्गाला पैसा, आधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा, आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण, इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, दवाखाने (Clinics) उभारणे अशा सुविधा व सोयी सवलती पुरवत असतात आणि त्याचबरोबर आपल्या फायद्यासाठी (जसे की सद्दाम हुसेन किंवा ISIS विरुद्ध लढण्यासाठी) त्यांचा वापरही करून घेत असतात. मात्र तुर्किए, इराण आणि सीरिया हे देश कुर्दांना विशेषतः पॅशमर्गाला बंडखोरच मानतात.
आजपर्यंत वेगळे कुर्दिस्तान का होऊ शकले नाही?

“स्वतंत्र कुर्दिस्तान” अस्तित्वात न येण्यामागे भौगोलिक, ऐतिहासिक आणि राजकीय अशी अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत. पहिल्या महायुद्धानंतर १९२० च्या ‘सेव्ह्रेस करारात’ (Treaty of Sevres) कुर्दांना स्वतंत्र राष्ट्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १९२४ च्या ‘लोझान करारात’ (Treaty of Lausanne) हे आश्वासन रद्द करून कुर्द प्रदेशांचे विभाजन तुर्की, इराक, सीरिया आणि इराण या देशांमध्ये करण्यात आले.
पहिल्या महायुद्धानंतर तुर्कीएने अतातुर्क केमाल पाशा यांच्या नेतृत्वाखाली लष्करी यश मिळवले होते. अतातुर्क केमाल पाशाने कुर्दिस्तानच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असलेल्या ‘सेव्हर्सच्या करारातील’ (Treaty of Sèvres) अटी फेटाळून लावल्या. लोझान करार हा तुर्कीएच्या अटींवर झाला त्यामुळे स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी मागे पडली. कुर्दांचा हा ऐतिहासिक विश्वासघात होता. शिवाय ब्रिटनला मोसुल (आजचे इराक) भागातील तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण हवे होते. कुर्दिस्तानला स्वतंत्र करण्याऐवजी त्यांनी तो भाग आपल्या अधिपत्याखालील इराक आणि फ्रान्सच्या अधिपत्याखालील सीरियामध्ये विभागणे अधिक फायद्याचे मानले.
कुर्द लोकसंख्या ही प्रामुख्याने ४ वेगवेगळ्या देशांच्या (तुर्कीए, इराण, इराक आणि सीरिया) सीमेवर पसरलेली आहे. यापैकी कोणत्याही देशाला आपल्या भूभागाचा हिस्सा गमावून नवीन देश निर्माण होऊ द्यायचा नव्हता. तुर्कीए, इराण आणि सीरिया यांसारख्या देशांनी कुर्द फुटीरतावादी चळवळींना नेहमीच कठोरपणे दडपले आहे. त्यांना भीती वाटते की, एका देशात स्वतंत्र कुर्दिस्तान झाल्यास त्यांच्या स्वतःच्या देशातील कुर्द लोकही बंडाळी करतील. म्हणजे जागतिक “इस्लामी उम्मा” (Muslim Brotherhood) च्या चिंधड्या उडाल्याचे सुन्नी मुसलमान असलेले कुर्द हे सगळ्यात मोठे उदाहरण आहे.
अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या जागतिक शक्तींनी अनेकदा कुर्द गटांचा वापर आपल्या स्वार्थासाठी (उदा. ISIS विरुद्ध युद्ध किंवा सद्दाम हुसेन विरुद्ध) केला. मात्र जेव्हा स्वतंत्र राष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी आपल्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांना (उदा. तुर्की) नाराज करणे टाळले. कुर्द लोकांमध्ये राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत. उदाहरणार्थ, इराकमधील Kurdistan Democratic Party (KDP) आणि Kurdistan Workers’ Party (PKK) यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे कुर्दांची शक्ती विभागली गेली. एकूण सगळ्याची परिणीती स्वतंत्र कुर्दिस्तानच्या निर्मितीचे स्वप्न स्वप्न राहण्यातच झाली.
अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा…

२ मार्च २०२६ पासून, कुर्दिश सशस्त्र गटांनी (विशेषतः PJAK) पश्चिम इराणमधील मारिवानजवळील पर्वतीय भागात जमिनीवर लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. हे गट अमेरिकेच्या पाठिंब्याने इराणमधील सुरक्षा दलांवर हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) इराकी कुर्दिस्तानमधील कुर्द तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यात कुर्दिश पॅशमर्गा फायटर्स आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. इराणचा असा संशय आहे की, अमेरिका या कुर्द गटांना प्रशिक्षण देऊन त्यांना इराण विरोधातील युद्धात उतरवत आहे.
इराण-इराक सीमा भाग आणि पश्चिम इराणमधील कुर्द प्रांत सध्या युद्धाचे मुख्य केंद्र बनले असून इराकमधील हजारो कुर्द फायटर्स इराणमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्यामुळे या प्रदेशातील तणाव अधिक वाढला आहे. अमेरिका इस्त्राएलने इराणवर केलेले तुफानी हल्ले, त्यात इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाची झालेली वाताहात तिथल्या इस्लामी राजवटीबद्दल जनतेमध्ये विशेषतः महिलांमध्ये असलेला तीव्र संतोष, आखाती देशांवर प्रतिहल्ले करून इराणने ओढवून घेतलेला त्यांचा रोष या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणमधील कुर्दिश जनतेला आपल्या स्वातंत्र्याच्या आशेचा किरण दिसला नसता तरच नवल.
“अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा” म्हणत इराणवर तुटून पडलेल्या कुर्दिश लढवय्यांच्या मदतीने इराणमध्ये इस्लामिक राजवट उलथवून सत्तांतर घडवून आणण्यासाठी अमेरिका आज कुर्दांना सर्व प्रकारचे पाठबळ पुरवत आहे.
युद्ध समाप्तीनंतर कुर्दिश जनतेच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिका असेच सहकार्य करेल की परत एकदा कुर्दिश जनतेच्या तोंडाला पाने पुसली जातील हे येणारा काळच ठरवेल.