मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे.
शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी थेट पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्यात आला. “तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते, जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांना बनावट प्रकरणात अडकवता येईल,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सचिन वाझे प्रकरण हे केवळ एक पोलीस गैरप्रकार नसून, ते तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार, वसूली आणि गुन्हेगारी व्यवस्थेचे भयावह प्रतीक असल्याचे शेलार म्हणाले. “हे लोक भ्रष्टाचारी होतेच, तसेच कंत्राटदारांचे रखवालदार म्हणूनही काम करत होते,” असा घणाघात त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत शेलार म्हणाले की, “या सर्व प्रकरणातून उद्धव ठाकरे किती पाताळयंत्री, कपटी, कारस्थानी आणि धूर्त आहेत, हे स्पष्ट झाले आहे. खोटी, विघातक षड्यंत्र रचून राजकीय विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला.”
राजकीय सूडबुद्धीने यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप करत, शेलार यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. “अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. भोली सूरत, दिल के खोटे अशीच यांची खरी ओळख आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
या प्रकरणामुळे राज्यातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी नमूद केले. सचिन वाझे प्रकरणात सातत्याने नवनवे खुलासे होत असून, येत्या काळात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले.