अयोध्येतील यंदाची श्रीरामनवमी अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची असेल. श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर होत असलेल्या श्रीराम जन्मोत्सवाची तयारी अयोध्येत सुरू झाली असून १५ ते १७ एप्रिल दरम्यान प्रभू श्रीरामांचे मंदिर रोज वीस तास खुले ठेवण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची बैठक नुकतीच मणिराम दास छावणी येथे पार पडली. न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत श्रीराम जन्मोत्सवाच्या आयोजनाबाबत रुपरेषा ठरवण्यात आली. निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी चंपत राय हेही यावेळी उपस्थित होते.
श्रीरामजन्मभूमीची सजावट पन्नास क्विंटल फुलांचा वापर करून करण्यात येणार आहे. श्रीराम जन्मोत्सवाचे थेट प्रसारण प्रसार भारतीच्या माध्यमातून अयोध्या धामसह शहरातील बाजारपेठांमध्ये शंभर ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे केले जाणार आहे. कमी वेळेत सहज दर्शन व्हावे, यासाठी भाविकांनी मोबाईल बरोबर न आणता यावे तसेच अन्य साहित्यही जवळ ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीरामजन्मभूमी मार्गापासून परिसरापर्यंत पन्नास ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शनपथावर बसण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांसाठी जाजम अंथरण्यात येतील तसेच सावलीचीही व्यवस्था केली जाणार आहे. सर्व भाविकांना सहजरीतीने प्रसाद देता येईल, अशीही व्यवस्था केली जाईल.
श्रीरामभक्तांनी रामनवमीच्या दिवशी आपापल्या गावात, गावातील मंदिरांमध्ये श्रीरामनवमीचा उत्सव उत्साहाने साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.