अयोध्येत भव्य असे राममंदिर निर्माण होत असताना हजारो हात त्या कामात गुंतलेले होते. अनेक यंत्रणा एकाचवेळी काम करत होत्या. या सर्वांची कामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन तर सुरू होतीच, पण प्रत्येकाच्या मनातील आस्थाही सातत्याने जाणवत होती. तसे अनुभव पदोपदी येत होते.
अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात अनेक व्यक्ती, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी या आणि अशा अनेकांबरोबर चर्चा झाली, संवाद झाला, बैठका झाल्या. त्यामुळे या सर्व चर्चा, बैठका, संवाद हे अनुभव आणि प्रत्यक्ष काम करतानाचे अनुभव अनोखे तर आहेतच, पण त्यातून श्रद्धा, भक्ती आणि आस्था यांचेही दर्शन वेळोवेळी होत गेले. या कार्याच्या निमित्ताने भेटलेल्या माणसांचे अनुभव तर मी कधीच विसरू शकणार नाही !!
मंदिर आणि परिसराची ही न्यासची जागा आहे त्या जमिनीभोवती दोन थरांमध्ये कडेकोट लोखंडी खांबांचे कंपाऊंड आहे. त्या बरोबरच जागेच्या बाहेर आणि आतमध्ये बंदूकधारी सीपीआरएफच्या जवानांचा पहारा असतो. अतिशय शिस्तबद्ध आणि कडक चेहऱ्याचे हे पहारा देणारे जवान. पण त्यांच्याशी कधी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधला जायचा तेव्हा त्यांचे मनोगत समजायचे. ते म्हणायचे, हमारी तो ड्युटी है, जिधर बतायें उधार सुरक्षा का कर्तव्य निभाना, लेकिन हमारी ये खुश किस्मती है कि हमे साक्षात प्रभू श्रीराम जी कि सुरक्षा करने का सौभाग्य मिला
कामगारांचे उत्तर…
अयोध्येतील या राममंदिर निर्माण कार्यात वेगवेगळ्या यंत्रणांचे अक्षरशः हजारो कामगार एकाच वेळी काम करत असतात. त्यात शासकीय प्रकल्पांवर काम करणारे असतात, तसेच ज्या ज्या खासगी कंपन्या तेथे काम करत आहेत, त्यांचेही कामगार असतात. हे सर्वजण तेथे खूप मेहनत घेत असतात. हे सर्व कामगार काम तर करत असतातच, पण ते किती आस्थेने काम करत असतील, हे अशाच काही प्रसंगामधून समजत गेले. अगदी सुरुवातीच्या काळातील ही आठवण आहे. सुरवातीच्या काळात उत्खनन करणारे आणि नंतर पाया भरणीचे concreting करणारे कामगार अनवाणी पायाने दुपारच्या ४५ अंश तापमानात काम करताना दिसायचे. तेव्हा उन्हाचा तडाखा किती असेल याची कल्पना आपण करू शकतो. त्यांना आमचे सुरक्षा अभियंता प्रत्यक्ष जागेवर काम करताना सेफ्टी शुज वापरणे कसे अनिवार्य आहे हे सांगायचे. ते जे काही सांगायचे ते ऐकून झाल्यावर ते कामगार भगवान के मंदिर का ये स्थान है, हम इधर जुते कैसे पहेन सकते है ? असं उत्तर ते द्यायचे !! कुठल्या पद्धतीने त्यांची समजूत काढायची ? अशा वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा. मग हळूहळू सगळ्यांना समजावून सांगितलं. बळजबरी किंवा सक्ती करण्यात काहीच अर्थ नव्हता. अर्थात नंतरही गर्भगृहाच्या आतील भागात काम करताना कोणीही पादत्राणे घालत नव्हते.
हमारी सुरक्षा तो वो ही देखेंगे
अनेक साधू, संत मंदिराचे काम सुरू असताना ते काम बघायला जेव्हा यायचे तेव्हा बरेचदा धोतर किंवा पंचा, उपरणे असे अंगावर घेऊन वरचा जिना चढायला सुरवात करायचे. सुरक्षेच्या दृष्टीने पंचा किंवा उपरणे अडकू शकते आणि व्यक्ती पडण्याची शक्यता असते.त्यांना असे काही सांगितले की पुरे सृष्टिका पालन और रक्षण करने वाले जो भगवान है हम उनके दर्शन करने आये है, हमारी सुरक्षा तो वो ही देखेंगे! असे उत्तर मिळायचे.
तेथील बृहत आराखडा तयार करताना वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी लागे. पाणी पुरवठा, विद्युत विभाग, अग्निशामन विभाग, नगर रचना विभाग वगैरे. तेव्हा तेथील मुख्य अधिकारी व्यक्तिशः कामाच्या जागेवर उपस्थित राहायचे. कशा पद्धतीने चांगली योजना करता येईल, ह्याविषयी त्यांची मते तर ते द्यायचेच पण त्याच बरोबर अजून काही मी करू शकत असेन तर अवश्य सांगा, कोणत्याही शासकीय मंजुरी प्रलंबित असतील तर ताबडतोब सांगा, आम्ही ते तातडीने पूर्ण करू असे आश्वासनही द्यायचे. कोणत्याही कारणाने ह्या निर्माण कार्यामध्ये विलंब व्हायला नको, असेही ते आवर्जून सांगायचे. प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असोत किंवा त्यांचे सहकारी असोत, सर्वांचीच कामातील अशी उत्स्फूर्तता, जे आवश्यक असेल ते साहाय्य तातडीने करण्याची तयारी सतत दिसत होती. मुख्य म्हणजे हे कार्य ज्या पद्धतीने ठरले आहे, त्या पद्धतीने पूर्ण व्हावे, यासाठी कोणतीही गोष्ट सांगा, आम्ही ती पूर्ण करून देऊ, अशी तयारी ते दाखवत असत. त्यांची ही सहकार्याची भावना सदैव लक्षात राहील.
या संपूर्ण राममंदिर निर्माण कार्यात जो जो सहभागी झाला होता, त्याची त्यामागची भावना समजली की खरोखरच थक्क व्हायला व्हायचे. ते काही अनुभव सांगते पुढील भागात.
अश्विनी कविश्वर
(लेखिका स्थापत्य अभियता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात.)