नवी मुंबई (खारघर) : “आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गुरुपरंपरेच्या महान आदर्शांचे स्मरण करून राष्ट्र एकतेचा प्रबळ संदेश दिला.
आध्यात्मिक वारसा आणि राष्ट्र एकता
बाबा रामदेव पुढे म्हणाले की, “भारत ही संतांची आणि शूरांची भूमी आहे. गुरुंनी अन्यायाविरुद्ध लढताना कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. आपण सर्व त्या महान परंपरेचे वारसदार आहोत. आज देशाला पुन्हा एकदा गुरुंच्या शिकवणीची गरज असून, श्रद्धा आणि कृतज्ञतेने त्यांच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.”
या ऐतिहासिक सोहळ्याला शीख धर्मातील विविध पंथांचे जत्थेदार आणि संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग जी, बाबू सिंग महाराज, शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग जी, ज्ञानी गुरुदयाल जी, रघुवीर बाबा, ग्यानी हरमिंदर साहेब आणि प्रधान गुरुविंदर सिंग यांसारख्या आध्यात्मिक विभूतींची उपस्थिती होती.
तसेच, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील, ‘हिंद दी चादर’ राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक आणि शरदचंद्र ढोले आदींचा सहभाग होता.
राज्य सरकार आणि समागम समितीच्या वतीने आयोजित हा सोहळा नवी मुंबईतील ओवे मैदानावर अत्यंत भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. बाबा रामदेव यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली. गुरुवाणीच्या सुरावलींनी आणि संतांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.