पुणे, कराड, सोलापूर, संभाजीनगरसह नागपुरात बंधुता परिषद
बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेची समाजाला गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी पुण्यात व्यक्त केले. सामाजिक समरसता मंच आयोजित बंधुता परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात पेरूगेट भावे हायस्कूलमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकारी प्रशिक्षण वर्गाला भेट दिली होती. त्याच प्रशालेमध्ये सामाजिक समरसता मंचाच्या वतीने बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. किशोर मकवाना, आयडीबीआय आणि इंडियन बँकेचे माजी अध्यक्ष किशोर खरात, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, खा. बाळासाहेब साळुंके, सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंके, भंते बुधभूषण यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
किशोरजी मकवाना म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथील संघ शिबिराला भेट दिल्याचे माहिती होते. मात्र, आज प्रत्यक्ष या भेटीचा ऐतिहासिक संदर्भ मांडला गेला. डॉ. आंबेडकरांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली नाही. उलट संघाकडे ते आपलेपणाच्या भावनेने पाहत होते. डॉ. आंबेडकरांच्या बंधुतेचे स्मरण या परिषदेच्या निमित्ताने होत आहे.”
किशोर खरात यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात बंधुता गीताने झाली. रवी ननावरे यांनी सामाजिक समरसता मंचाची माहिती दिली. सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सांगता भंते बुधभूषण यांनी बुद्धवंदनेने केली.

‘‘बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल ”
महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. बंधुता परिषदांसारखा उपक्रम महत्त्वाचा असून त्यातून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे आयोजित बंधुता परिषदेत बोलताना व्यक्त केला.
कराड येथील भवानी मैदानात ‘बंधुता परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बंधुता परिषद आयोजित करण्यात आली होती.
बंधुता, समरसता आणि देशप्रेमाने प्रेरित समाज निर्माण व्हावा सोलापूर येथे शिवस्मारक मंडळ, समरसता गतिविधी आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित बंधुता परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती व्यक्त केलेल्या आपलेपणाच्या भावनेबाबत तसेच डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या एकसंघ भारताच्या संकल्पनेवर विचार मांडण्यात आले. बंधुता, समता व आपलेपणाचा संदेश देणारी ही बंधुता परिषद अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती.
परिषदेत गोरे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून समाजात विष पेरण्याचे काम काही घटकांकडून केले जाते. अशा अपप्रचारामुळे समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर झाली पाहिजे. बंधुता, समरसता आणि देशप्रेमाने प्रेरित समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी ॲड. प्रबोधन निकाळजे यांनी परम श्रध्येय डॉ. बाबासाहेबांनी मांडलेली बंधुता ही संकल्पना, संघाचा “समता आणू समरसतेतून” हा विचार, तसेच सामाजिक समरसतेसाठी संघाने चालवलेले विविध उपक्रम यावर सविस्तर भूमिका मांडली. जातिभेद, अस्पृश्यता व वैचारिक दुरावा दूर करून बंधुतेच्या माध्यमातून एकसंघ भारत उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बंधुता परिषदेत शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, संघाचे जिल्हा संघचालक सुनीलजी इंगळे, डॉ. धनंजय भिसे, डॉ. उदय वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी चव्हाण यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे बंधुता परिषद उत्साहात छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या वतीने आयोजित बंधुता परिषद उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.
बोधिसत्व डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत बंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी सुरु असलेल्या सर्वसमावेशक प्रयत्नांतूनच समरस समाजनिर्मिती शक्य असल्याचे मत बंधुता परिषदेच्या निमित्ताने व्यक्त झाले. बंधुता परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून महू भीम जन्मभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव राजेश वानखेडे उपस्थित होते. राजेश वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचा दाखला देत त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्यात योगदान दिलेल्या सर्व समाजघटकांच्या समावेशाकडे लक्ष वेधले. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बंधुत्वाची भावना समाजात रुजविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक आणि आंबेडकर पर्यटन संकल्पनेचे जनक डॉ. राजेश रगडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक बबनरावजी जगाडे आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सुरेश चौथाईवाले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. रविकिरण घोडे यांनी केले. दुष्यंत आठवले, मोहन गोजमगुंडे, संजय रणदिवे, संतोष नाडे आदींसह सहयोगी संस्थांनी संयोजन केले.
बंधुभाव निर्माण करण्याची गरज : डॉ. रमेश पांडव
समाजातील ताणतणाव दूर करून परस्पर बंधुभाव निर्माण करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असून, त्यासाठी दुखावलेली मने जवळ आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन समरसता गतिविधीचे अखिल भारतीय सेवावस्ती प्रमुख डॉ. रमेश पांडव यांनी नागपूर येथे केले.

सन्मित्र सभेतर्फे आयोजित बंधुता परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक अरुण रारोकर, सन्मित्र सभेचे अध्यक्ष राजन भूत तसेच परिषदेचे संयोजक डॉ. प्रा. सुधाकर इंगळे उपस्थित होते.
डॉ. पांडव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात सांगितले की, भूतकाळात काय घडले, कोण बरोबर किंवा चूक यावर अडकून राहण्यापेक्षा आज बंधुतेची गरज आहे हे स्पष्टपणे सांगणे अधिक महत्त्वाचे आहे. उभयपक्षांनी हे स्वीकारले पाहिजे की, समाजाच्या पुढील वाटचालीसाठी बंधुभाव अनिवार्य आहे. बंधुभावाशिवाय समाज पुढे सरकू शकत नाही.
कार्यक्रमात समाजकार्य, वैचारिक योगदान व सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी राजन भूत, अरुण रारोकर, डॉ. तुषार चौधरी तसेच डॉ. रमेश पांडव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. समाज भूषण व नागरी पुरस्काराने डॉ. प्रेमा लेकुरवाळे, शंकरराव वानखेडे, राजेंद्र करवाडे, नंदाताई भुरे, रमेश फुले, सुरेश पाटील तसेच मुकुंदाजी अडेकर यांना गौरविण्यात आले. राजन भूत यांनी प्रास्ताविक केले.