मुंबई : युथ मेडिकोस फॉर इंडिया (YMI), मेडिविजन आणि सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील बोरा बाजार, फोर्ट येथील आर्य समाज हॉलमध्ये बंधुता परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीही साजरी करण्यात आली. २ जानेवारी रोजी साजरी होणारी बंधुता परिषद यामागील संकल्पना, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान तसेच राष्ट्रनिर्मितीत विद्यार्थ्यांची भूमिका या विषयांवर मोकळ्या वातावरणात चर्चा करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
डॉ. आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मृतींना उजाळा
कार्यक्रमाची संकल्पना आणि सूत्रसंचालन डॉ. संगीता आंभोरे यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, “कितीही मतभेद असले तरी मनभेद असू नयेत, ही बाबासाहेबांची शिकवण होती. सर्व समाज एकता, न्याय आणि बंधुतेने एकत्र राहावा, हीच त्यांची दूरदृष्टी होती.”
नागेश धोंडगे यांनी जानेवारी १९४० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराड येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा वृत्तांत विद्यार्थ्यांसमोर मांडला. बाबासाहेबांनी “मी संघाकडे आत्मीयतेने पाहतो” असे सांगून संघ कार्याला शुभेच्छा दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. “मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमताही भारतीय” हा राष्ट्र प्रथमचा विचार संघ आणि बाबासाहेब यांच्या कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्त्री शिक्षण आणि संघटन शक्तीवर भाष्य
याप्रसंगी डॉ. स्मिता गालफाडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानावर सखोल प्रकाश टाकला. तर, डॉ. प्रदीप जोशी यांनी तरुण वैद्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटित होऊन काम केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही जटिल समस्येवर ठोस तोडगा काढता येतो.
कार्यक्रमाला दिनकर अमृतलाल पांडे, दीपकभाई खंडेलवाल आणि अजय सिंह यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपकभाई खंडेलवाल यांनी उपस्थित वैद्यकीय, दंतशास्त्र आणि आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. कैलास सोनमानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
भविष्यातील उपक्रम
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. संगीता आंभोरे आणि डॉ. प्रदीप जोशी यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या परिषदेने वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते.