‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? मौलाना मदनींच्या ‘जिहाद’ आवाहनावरून भाजपचा विरोधकांवर हल्ला
मुंबई : मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमध्ये केलेल्या ‘जब जब जुल्म होगा, तब तब जिहाद होगा’ या विधानावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मदनी यांचे भाषण सामाजिक शांततेला थेट आव्हान देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘जिहाद’चे खुले आव्हान आणि राजकीय मौन
केशव उपाध्ये यांनी मदनींच्या विधानाला थेट राहुल गांधींच्या ‘व्होटचोरी’च्या आरोपांशी जोडले आहे. “राहुल गांधींच्या ‘व्होटचोरी’च्या आरोपांची नक्षलवादी पुनरावृत्ती होते आणि त्याच वेळी काही मुस्लिम धर्मगुरूंकडून ‘जिहाद’चे खुले आव्हान दिले जाते… हा योगायोग नाही, ही धोक्याची साखळी आहे.”
देवबंद मदरसा हा इजिप्तमधील अल अझहरनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मदरसा आहे. जमात ए उलेमा ए हिंद ही मुख्यतः देवबंद मदरशात शिकलेल्या धर्मगुरूंची राष्ट्रीय संघटना आहे, असे ते म्हणाले
उपाध्ये यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या इशाऱ्यावर आरडाओरडा करणारे विरोधक, जिहादच्या आवाहनावर मात्र गप्प बसतात. ‘मोहब्बत’ची दुकानं उघडणारे राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत—यांचे मौन हाच त्यांच्या दुटप्पीपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे.“
‘सबका साथ’ असूनही टीका का?
उपाध्ये यांनी गेल्या ११ वर्षांतील केंद्र सरकारच्या कामाचा संदर्भ दिला. “गेल्या ११ वर्षांत धर्माच्या आधारावर एकही मुस्लिम सरकारी योजनांपासून वंचित राहिलेला नाही. ‘सबका साथ, सबका विश्वास’ ही केवळ घोषणा नाही, ती अंमलात आणलेली भूमिका आहे.“
“हे मौन धोकादायक आहे. कारण समाज फोडण्याची हाक दुर्लक्षित केली, तर उद्या तिची किंमत देशाला मोजावी लागेल.“
देवबंद मदरसा आणि जमात ए उलेमा ए हिंद संघटनेचा संदर्भ देत, उपाध्ये यांनी मदनी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य स्पष्ट केले.