Wednesday, December 4, 2024

भाजप नेते गिरीश महाजन यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट; युतीतील स्थिती स्पष्ट केली

Share

ठाणे – भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गिरीश महाजन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गेल्या पाच-सहा दिवसांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, तसेच इतर त्रासही होत आहेत. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होतो.” महाजन यांनी पुढे सांगितले की, त्यांनी तीन-चार दिवसांपूर्वी शिंदे यांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण ते गावी निघून गेले होते आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता.

महाजन यांनी युतीच्या स्थितीबाबतही स्पष्टीकरण दिले, “युतीमध्ये सर्व आलबेल आहे. सर्व व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत.” त्यांनी पुढे सांगितले की, शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केले आहे आणि म्हणून आपल्याला नवीन काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी पुढे सांगितले की, “आमची 5 तारखेची तयारी सुरु आहे.”

शिंदे यांच्या तब्येतीबाबत महाजन यांनी सांगितले की, “त्यांच्या हाताला अजूनही सलाईन लागलेली आहे.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की, शिंदे यांची तब्येत सुधारल्यानंतर ते लवकरच शासकीय बैठक घेणार आहेत. महाजन यांनी पुढे सांगितले की, “मला असं वाटतं की, त्यांची उद्या तब्येत सुधारल्यानंतर ते बैठक घेणार आहेत. ते शासकीय बैठक घेण्याची शक्यता आहे.”

गृहमंत्रीपदाबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर महाजन म्हणाले, “माझी गृहमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “कोणतं खातं कुणाला पाहिजे, याबाबत आमच्यात चर्चा झालेली नाही. मी फक्त एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.”

गिरीश महाजन यांनी शेवटी सांगितले की, “आजचा हा प्रॉब्लेम नव्हता. मी तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. मी एकनाथ शिंदे यांना 30 वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी रुसले आहेत, रागावले आहेत, चिडले आहेत, असं अजिबात होणार नाही.”

अन्य लेख

संबंधित लेख