Thursday, January 8, 2026

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा

Share

मुंबई : “बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने विरोधकांना फारच त्रास होतो आहे. मात्र इतिहास सांगतो की आतापर्यंत देशात ३४ खासदार आणि २९८ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?” असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. बिनविरोध निवडीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

काँग्रेस आणि ठाकरेंना इतिहासाची आठवण

काँग्रेसचा इतिहास: देशात आतापर्यंत ३४ खासदार आणि २९८ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सर्वाधिक संख्या काँग्रेसची आहे. त्यापैकी तब्बल १९४ एकट्या काँग्रेसचे आहेत. “मग तेव्हा काँग्रेसने किती कोटी रुपये वाटले होते? आणि किती यंत्रणांचा गैरवापर केला होता?” असा सवाल त्यांनी केला.

ठाणे महापालिकेचा संदर्भ: तब्बल ६८ वर्षांपूर्वी, १९५७ साली ठाणे महापालिकेत ३४ पैकी ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. ते सर्व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

उद्धव ठाकरेंवर निशाणा: दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे हे देखील बिनविरोध आमदार झाले होते, याकडे लक्ष वेधत उपाध्ये यांनी ठाकरेंच्या टीकेतील फोलपणा उघड केला.

“हा केवळ दुटप्पीपणाच”
विरोधी पक्षांवर टीका करताना उपाध्ये पुढे म्हणाले, “जेव्हा तुमचे लोक बिनविरोध निवडून येतात, तेव्हा ती लोकशाही असते. पण आज जेव्हा भाजप किंवा महायुतीचे लोक निवडून येतात, तेव्हा ती भीतीदायक वाटते? इतिहास सोयीचा नसतो म्हणून त्याला बदनाम करता येत नाही. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.” लोकशाही धोक्यात आल्याचा कांगावा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा इतिहास तपासावा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख