मुंबई : १८ डिसेंबर २०२५ आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली कंबर कसली आहे. दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यालयात भाजप आणि महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विशेष रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीत आगामी निवडणुकीत मुंबईतील प्रत्येक प्रभागात महायुतीची ताकद कशी वाढवता येईल आणि मतदारांपर्यंत विकासाचा मुद्दा कसा पोहोचवता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला.
या बैठकीला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी आशिष शेलार, विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, अतुल भातखळकर, आ. प्रकाश सुर्वे, आ. योगेश कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील प्रभागांचे सूक्ष्म नियोजन (मायक्रो-प्लॅनिंग) करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. तसेच दोन्ही पक्षांमधील समन्वय अधिक मजबूत करून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुती सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावरही यावेळी चर्चा झाली. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात मुंबईत महायुतीचे मोठे मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.