वारंवार होरायझन प्रणालीबद्दल अनेक शाखांमधील सहाय्यक पोस्ट मास्तर बरेच मुद्दे मांडून त्यांच्या अडचणी मांडत असताना सुद्धा; पोस्ट खाते कोणतीही तक्रार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सॉफ्टवेअर पूर्णतः दोषमुक्त असल्याचा पोस्ट खात्याचा विश्वास अनाठायी होता, अन्यायकारक होता, अर्थात खात्याला ते दिसतच नव्हते किंवा पहायचे नव्हते. परिणाम स्वरूप १००० पेक्षा अधिक पोस्ट कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.
२००० सालापासून होरायझन प्रणालीच्या माध्यमातून अनेक शाखांमध्ये दिसणारा तुटीचा आकडा सदोष होता. या प्रणालीचा वापर सुरू झाल्यापासून वर्षाच्या आतच दोन प्रकारच्या अडचणी सातत्याने निदर्शनास येत होत्या.
१) शाखेतील रोख रक्कम व स्टॉक वाढलेला दिसणे
२) व्यक्तिगत खात्यात वर्ग केलेल्या रक्कमेची नोंद न होणे व त्याचे कारण न कळणे. (अर्थातच ही रक्कम सस्पेन्स खात्यात जात असे व या व्यवहाराचा काहीही मागोवा घेता येत नसे) काही व्यवहारात ही रक्कम लक्षणीय असे.
या साऱ्यामध्ये दुरुस्तीचा एकच मार्ग होता, तो म्हणजे सर्व व्यवहारांच्या नोंदी पाहणे. पण या नोंदी पाहण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता किंवा अगदी मर्यादित संधी होती. ती अर्थात पुरेशी नव्हती. त्यामुळे मोठी तूट दिसण्यामध्ये पोस्ट मास्तरची काही चूक नाही हे सिद्ध करण्यासाठी तुटीचे कारण शोधता येत नव्हते. सर्व व्यवहारांच्या तपशीलवार नोंदी पाहून रकमेतील फरक दुरुस्त करता येत नसे. शिवाय लेखापरीक्षणाच्या संपूर्ण तपशीलवार नोंदीही पोस्ट खात्याकडून पुरविल्या जात नसत. झालेल्या चुकीचे किंवा संभाव्य चुकीचे कारण शोधण्याकरिता व दुरुस्ती करण्याकरिता नोंदी पुन्हा तपासणीची यंत्रणा उपलब्ध नव्हती.
सर्व व्यवहारांची अचूक नोंद करणे शिवाय रोख रक्कम व उपलब्ध स्टॉक व्यवस्थित मोजून प्रत्येक महिन्याला त्याची तपशीलवार नोंदी प्रणालीत करणे हे काम सहाय्यक पोस्ट मास्तर यांनी करणे अपेक्षित होते. होरायझन प्रणालीच्या माध्यमातूनही या साऱ्याचा हिशेब होऊन प्रत्येक शाखेत किती रोख रक्कम व स्टॉक असायला हवा याचा आकडा तयार होत असे.
एकदा प्रणालीमधून हे आकडे आले की, त्याच नोंदी अधिकारीक म्हणून स्वीकारणे सहाय्यक पोस्ट मास्तर यांना भाग पडे. अयोग्य पद्धतीने झालेला हिशोब व त्यामुळे दिसणारा फरक याबद्दल वेळोवेळी अहवाल देऊनही पोस्ट खाते काहीही मदत करत नसे. जरी पोस्ट मास्तरची चूक नसली तरी ते सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नव्हता.
जेंव्हा कागदावर नोंदी करण्याची पद्धत अस्तित्वात होती तेव्हा या सर्व नोंदींचा मागोवा घेऊन चूक शोधता येत असे. मात्र होरायझन प्रणालीचा वापर सुरू झाल्या नंतर कगदी नोंदी करणे बंद झाले. जरी पोस्ट मास्तरांनी कागदांवर नोंद केली तरी त्याला अधिकृत दर्जा राहिला नाही. प्रणालीचे आकडेच अधिकृत दर्जा प्राप्त होते.
रकमेची तूट भरून काढण्याचे दोनच उपाय होते, पैसे भरून देणे किंवा प्रति महिन्याला मिळणाऱ्या पैशातून ते कापून घ्यायला सांगणे. (अनेक पोस्ट मास्तर ब्रिटनमध्ये पगारी नोकर नसतात, ते फ्रँचायझी व्यवसाय चालवतात. हा स्वयंरोजगार या सदरात मोडतो) त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळत नाही. पोस्ट व्यवहारांवर आणि दिलेल्या सेवेवर कमिशन (अडत) मिळते. या सर्व गोष्टी त्यांच्या करारात नोंदविलेल्या असतात. शिवाय जर तूट आली तर त्याची जबाबदारी ही पोस्ट मास्तरची मानली जात असे.
पोस्ट मास्तरांनी हे मुद्दे सातत्याने उपस्थित केलेच होते, कारण त्यांना प्रणालीतील त्रुटींची जाणीव नक्कीच झाली होती. अर्थातच पोस्ट खात्याने कधीच त्यांचे म्हणणे मान्य केले नाही. प्रणालीबद्दल तक्रार सेवा केंद्र यांचेकडूनही काही मदतीची अपेक्षा करता येत नव्हती. शेवटी तुटीची जबाबदारी करारानुसार सहाय्यक पोस्ट मास्तरांवरच आली, त्यांनीच पैशाची चोरी व घोटाळा केला असेच भासवले गेले.
होरायझन प्रणालीच्या व्यवहारांच्या नोंदी पोस्ट मास्तरांना मिळत नसल्याने त्यांना आव्हान देणे शक्यच नव्हते. महत्वाच्या खरे म्हणजे सर्व व्यवहाराचे सविस्तर हिशेब फक्त फुजित्सु कंपनीकडे उपलब्ध होते. पोस्ट खात्याला देखील ते मिळण्याजोगे होते, पण त्यांनी ते कधीच पोस्ट मास्तरांना दाखविले नाहीत. हा सर्व डेटा (माहिती) त्यांनी दडपून ठेवला असे म्हणावे लागते. या विवादामध्ये परिस्थितीचा दंश ज्यांनी झेलला त्यांना या त्रुटीबद्दल आव्हान देण्याचा मार्ग कधीही उपलब्ध झाला नाही.
होरायझन प्रणालीतील काही उणिवांमुळे चुका घडत व ती प्रणाली अकल्पनीय व अनाकलनीय पद्धतीने काम करीत असे. तिचा वापर केल्यावर या त्रुटींचे संकेत मिळू लागले. (उदा. ग्राहकाला एखाद्या वस्तूवर मिळणाऱ्या सवलतीचा व्यवस्थित हिशेब न होणे किंवा त्याची चुकीची किंमत दर्शविली जाणे, यसारख्या त्रुटी याला सॉफ्टवेअरचे सदोष काम म्हणता येईल. या त्रुटी आढळून आल्यावर दुरुस्त होऊ शकतात. किंबहुना त्यासाठीच मर्यादित चाचणी केली जाते.)
पोस्ट खात्याने प्रणालीत उणीवा असल्याचे कधीही मान्य केले नाही. लेखा परीक्षण तपशिलासह पाहू दिले नाही, त्यामुळे खात्याची अप्रतिष्ठा झाली, त्यावरच्या विश्वासाला पण तडा गेला. यातून काही मुद्दे पुढे आले.
१) कदाचित अतिशय संवेदनशील आर्थिक माहिती हाताळताना या प्रणालीची परिपूर्ण वैधता पडताळून पाहिली नव्हती.
२) त्रुटी शोधून काढण्याची व्यवस्था यात नव्हती.
३) पोस्ट खात्याच्या व्यापक माहिती तंत्रज्ञान विभागात संवाद आणि उत्तरदायित्व यंत्रणा उपलब्ध नव्हती.
४) सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा होत रहावी म्हणून पुनरावलोकन करण्याची, अभिप्राय नोंदवण्याची सोय नव्हती.
असे करण्याने पोस्ट खाते आपली लौकिक व प्रतिष्ठा आणि आर्थिक भर वाचवू पाहत होते असे म्हणावे लागते. ब्रिटनच्या पोस्ट खात्याचा होरायझनवर असलेला हा विश्वास निश्चितच अस्थानी होता. सर्वमान्य निकषांनुसार ही प्रणाली मान्य होणारी नव्हती. त्रुटी मान्य करण्याऐवजी पोस्ट खात्याने वस्तुस्थिती नाकारणे पसंत केले. सत्य दडपण्यासाठी खात्याने सहाय्यक पोस्टमास्तर आणि अन्य संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा रस्ता धरला. त्यांच्यावर खटले भरले. अपुऱ्या पुराव्याच्या आधारावर निष्कर्ष काढून फसवणूक व चोरीसाठी साऱ्यांना जबाबदार धरले. खात्याने ही प्रणाली दोषमुक्त असल्याचे लावून धरले. जेंव्हा कोणी तक्रार करीत असे तेव्हा ग्राहक सेवा केंद्रातून उत्तर मिळे की फक्त त्या व्यक्तीलाच अडचण येते आहे, अन्य कोणाला नाही. (म्हणजे दोष तक्रारदाराचा आहे.)
अनेकांनी आपण दोषी असल्याचे मान्य केले कारण ते स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत नव्हते. अनेकांनी स्वतःच्या पैशाने तूट भरून काढायचा मार्ग स्वीकारला. पोस्ट मास्तरांच्या व्यथांना अंत नव्हता. या साऱ्याचा परिणाम अतिशय विनाशकारी आणि दुर्दैवी होता.
१३ जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, (त्यात ६ सहाय्यक पोस्टमास्तर आणि ७ अन्य कर्मचारी होते), ५९ जणांच्या मनात कधी ना कधी हा विचार डोकावून गेल्याचे दिसते, १० कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे असफल प्रयत्न केले. एका महिलेने सांगितले की, त्यावेळी ती गर्भवती होती, तसे नसते तर तिने नक्की जीव दिला असता. काहींनी सहन करण्यापलीकडचा ताण होता असे वर्णन केले, तर काहींचे मानसिक स्वास्थ्य पूर्ण ढासळले. काही व्यक्ती दारूच्या पूर्ण आहारी गेल्या, पूर्णतः नैराश्यात बुडाल्या. अनेकांना मानसिक आजाराने गाठले, त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. काही दिवाळखोर झाले, मोठी उधारी झाली किंवा समान व चीजवस्तू विकून टाकाव्या लागल्या, परिणामतः जगण्याचे साधन संपले. शरीर स्वास्थ्य हरपले, विवाह विच्छेद झाले. जुन्या ग्राहकांना भेटणे अवघड वाटू लागले, त्यांना तोंड दाखवता येईना. अशा सगळ्या केसेस आणि सामाजिक दुष्परिणाम दिसत असताना देखील पोस्ट खात्याने त्याकडे चक्क पाठ फिरवली. आश्चर्य असे की, या कशानेही पोस्ट खात्याला जाग आली नाही, ते आपले म्हणणेच रेटत होते.
२००९ साली कॉम्प्युटर विकलीने या साऱ्याला घोटाळ्याला तोंड फोडले आणि स्पष्टपणे सांगितले की दोष होरायझन प्रणालीमध्येच आहे. व्यक्तिगत पातळीवर केस लढणाऱ्या सगळ्यांनी पोस्ट खात्याशी लढण्यासाठी आपली एक संघटना बांधली. मात्र या लढ्याला गती मिळायला २ दशके लागली. पीडितांची संख्या जवळ जवळ १००० इतकी होती, ७०० जण दोषी ठरले व फक्त ५० ते ६० जणच सुटले. तुरुंगातून सुटल्यावर नोकऱ्या मिळेनात, कारण तुरुंगवासाचा शिक्का त्यांच्यावर बसला होता. त्यांचे करार तर रद्दच झाले होते. परिस्थितीने सर्वांना लाचार आणि अगतिक करून टाकले.
सर्वांनी जीव तोडून सांगितले की, तुटीचे कारण अज्ञात आहे. मुद्दा असाही होता की, जेंव्हा त्यांना माहीत होते की तुटीचे जबाबदारी त्यांचीच होती, तेंव्हा ते स्वतःचेच पैसे का चोरी करतील? पोस्ट खात्याने असमर्थनीय गोष्टीचा बचाव करण्याकरिता प्रचंड पैसे खर्च केला. तर्काला, विवेकाला जागाच ठेवली नव्हती.
हा घोटाळा उजेडात येऊ नये म्हणून सत्य दडपण्याचे कसे प्रयत्न झाले व लोकांनी त्यासाठी कसा प्रदीर्घ लढा दिला याबद्दल अधिक माहिती पुढच्या भागात.
- विद्या माधव देशपांडे