Saturday, May 25, 2024

भाग २ : स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार….

Share

बघता बघता शंभर वर्षे होतील या चवदार तळे सत्याग्रहाच्या घटनेला. १९ मार्च १९२७ चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण सर्वांनी मुळापासून अभ्यासले पाहिजे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन छोटे-मोठे “उद्योजक” बनलेल्यांची संख्या केवळ महाराष्ट्रात अंदाजे लाखावर जाईल. ही एक स्वागतार्ह, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे माझे मन मला सांगते.

पू.बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदूंना मार्गदर्शन

बाबासाहेब म्हणतात, हिंदू धर्माचा सिद्धांत, ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने समतेच्या तत्त्वाला पोषक आहे. माणसे ईश्वराची लेकरे आहेत एवढ्यावरच न थांबता, ती ईश्वराचीच रूपे आहेत असे मोठ्या निर्भीडपणे हिंदू धर्म सांगत आहे. जेथे सारीच ईश्वराची रूपे आहेत तेथे कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही, हे त्या धर्माचे एक महान ओजस्वी तत्व आहे, हे कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही. समानतेचे साम्राज्य स्थापन होण्यास यापेक्षा दुसरा मोठा आधार सापडणे कठीण दिसते. असे असताना जी सामाजिक समता ख्रिस्ती व महंम्मदी राष्ट्रातून दिसून येते, तिचा हिंदू समाजात कोठे मागमूसही नसावा, व ती प्रस्थापित होण्याचे पवित्र प्रयत्न चालू असताना हिंदू धर्मीय म्हणविणाऱ्या लोकांकडून अडथळा करण्यात यावा यावरून हिंदू धर्मीय लोकास खऱ्या हिंदू धर्माची किती थोडी ओळख आहे हे दिसून येते.

नुसती तत्त्वे काय कामाची आहेत ?

“या अशा अभिमानी लोकांनी, आचारधर्माला प्राधान्य देऊन वेदांत उर्फ तात्विक धर्म, व्यवहाराला उपयोगी नाही, असे म्हणणे हा निर्लज्जपणा नाही काय ? धर्माची वरील प्रमाणे दोन अंगे आहेत, असे जरी मान्य केले तरी कोणत्याही धर्माचा आचारात्मक भाग त्या धर्माच्या तत्त्वज्ञानांवरच आधारित असला पाहिजे, हे विसरता कामा नये. तसेच नसेल तर त्या धर्माला अंतिम ध्येय नाही, असेच म्हणावे लागेल. समाजाचा आचारात्मक धर्म जर त्या समाजाच्या विचारात्मक धर्माच्या नांगरास जखडलेला नसेल, तर तो समाज ‘होका’यंत्राशिवाय समुद्रात लोटून दिलेल्या, एखाद्या जहाजाप्रमाणे कुठे वाहत जाईल व कोणत्या खडकावर आढळेल याचा नेम नाही. या न्यायाने पाहता वेदांतात जर नीतीचे व धर्माचे सिद्धांत सांगितलेले आहेत, व व्यवहारात जर नीतीची व धर्माची आवश्यकता असेल तर वेदांत धर्म व्यवहारोपयोगी नाही असे म्हणण्याऐवजी तो व्यवहारोपयोगी करण्याचे धैर्य या दुबळ्या लोकांत नाही, असेच म्हटले पाहिजे. आम्ही असे म्हणत नाही की धर्मातील आचार व विचार यांचा नेहमीच मिलाप झालेला असतो, कधी कधी त्यांच्यात फारकत झालेली नजरेस येते. परंतु जेव्हा जेव्हा धर्माचे आचार त्या धर्माच्या विचाराशी “विरोधी” असतील तेव्हा तेव्हा धार्मिक आचारांमध्ये फेरबदल करून ते धार्मिक विचारांशी सुसंगत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. खुद्द टिळकांनीच एके ठिकाणी म्हटले आहे की, आचारात्मक हिंदू धर्माचे जे लक्षण वर दिले आहे, त्याखेरीज, “धारणात् धर्म इत्याहूः यतोs अभ्युदय निश्रेयस – सिद्धी: स धर्म:” अशी हिंदू धर्मशास्त्रकरांनी स्वीकारलेली धर्माची जी दुसरी तत्त्वे आहेत, तदनुकूल आचारात फेरफार करण्याचा हिंदू धर्मातील शिष्टास हिंदू धर्म शास्त्रकारांनी जो अधिकार दिलेला आहे, हा अधिकार शास्त्रोक्तरित्या बजावून स्वतःच्या उदाहरणाने परंपरागत आचारात श्रेष्ठ (लोक) जो कांही फरक करतात, तो लोकांस मान्य होऊन, पुढे तो परंपरागत धर्माचाच एक भाग होत असतों.”

“…परंतू हा नवा आचारधर्म कोणी घालून द्यावयाचा ? तो शिष्ट लोकांनी घालून द्यावयाचा आहे, असे आमचे मत आहे व ते टिळकांचेही होते, हे वर दिलेल्या उताऱ्यावरून उघड होत आहे. तेव्हा, या लोकांनी महाडच्या प्रसंगी काय केले, असा साहजिकच प्रश्न उद्भवतो. आम्हास असे वाटते की, तोंडाने मनुष्य ईश्वराचे रूप आहे असे म्हणायचे व मनाने मात्र तो अमुक एका जातीत जन्मल्यामुळे त्यास अपवित्र मानावयाचे, हा हिंदू धर्मावर येणारा दांभिकपणाचा आरोप नाहीसा करण्यास, या शिष्ट लोकांनी प्रयत्न करावयास पाहिजे होता.” (बहिष्कृत भारत, २२ एप्रिल १९२७)

यावर कांही अधिक भाष्य करणे आवश्यक वाटत नाही. प्रत्येक हिंदूवर ही अस्पृश्यतेची आणि अशा अनेक कुरूढी काढून टाकण्याची जबाबदारी येते. वर्णभेद, जातीभेद, उच्चनीचता, विषमता, अस्पृश्यता… हे अधर्म आहेतच आणि हे नष्ट करणे, हे आपले कर्तव्य आहे, असे मानले पाहिजे. ते कर्तव्य टाळता कामा नये. ते जुन्या काळात होते, आता काय त्याचे, असे म्हणून उपयोगी नाही. आजही या गोष्टी या ना त्या रूपाने रेंगाळताना दिसतात. दुर्दैवाचा भाग असा की, जाती निर्मूलनाच्या नावाखाली, जातीच्याच संघटना बांधताना आणि मजबूत होताना दिसतात. ही तर विटंबनाच नव्हे काय ?

त्याच अग्रलेखात बाबासाहेब पुढे म्हणतात की, “… खरे बल निश्चयात आहे समुच्चयात नाही. ज्या लोकांचा एक निश्चय झाला, मग ते अल्पसंख्यांक जरी असले तरी कोणत्याही प्रसंगी ते सहसा डगमगणार नाहीत. मुसलमानांचे बल तरी कशात आहे याची चौकशी केली असता हेच सिद्ध होत आहे की, त्यांचे बल समुच्चयात नसून ते निश्चयात आहे. हे म्हणणे जर यथार्थ असेल तर शुद्धीपेक्षा संघटनेचीच हिंदू समाजास विशेष जरुरी आहे हे निर्विवाद आहे. आता हिंदू जनतेचा एक निश्चय व्हावा असा जर संघटनेचा अंतिम हेतू असेल तर तालीम आखाडे इत्यादी बाह्योपचारांनी कार्यसिद्धी व्हावयाची नाही. ज्या जातीभेदामुळे व अस्पृशतेमुळे हिंदू समाजाची संघशक्ती क्षय पावली आहे, परस्पर विषयक आपलेपणा नष्ट झाला आहे, एका जातीचे हितसंबंध दुसऱ्या जातीच्या विरोधी झाले आहेत, तो जातीभेद व ती अस्पृश्यता नष्ट झाल्याखेरीज एकनिश्चयात्मक बलसंवर्धनाचे कार्य घडून येणार नाही…”

संघाचे हिंदूसमाज संघटन

एक विलक्षण योगायोग याच काळात आलेला दिसतो. परस्परांचा परिचय किंवा संपर्क झालेला उल्लेख अजून सापडत नाही. पण सुदैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इ.स.१९२५ या संस्थापना वर्षापासूनच कोणत्याही एका जातीचे संघटन न बांधता, हिंदूसमाजातील सर्व जातींचे संघटन सुरू केले आणि संघटनेला शंभर वर्षे होता होता तो सर्व जातींपर्यंत पोचला आहे. संघ औपचारिकरित्या १९२५ ला डाॅक्टर हेडगेवारांनी नागपुरात आपल्या घरी पंधरावीस जणांसमवेत सुरू केला खरा, पण संघाची पहिली शाखा १८ फेब्रुवारी १९२६ ला निघाली.

प्रत्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नामाभिधान घेऊन सुरु झाला तो एप्रिल १९२६ ला. तोही डाॅ. हेडगेवारांच्या घरी. संघातला पहिला प्रतिज्ञेचा कार्यक्रम झाला तोच मार्च १९२८. कार्यद्धती ठरायला तर पुढे बराच काळ जावा लागला. संघाविरूद्ध समाजवाद्यांची पत्रके निघायला सुरूवात झाल्यावरही संघाने पत्रके काढल्याचे दिसत नाही. डाॅक्टरांची विविध सभांमधली भाषणे एवढीच उत्तरे दिसतात. पत्रके आजही क्वचितंच बाहेर पडताना दिसतात. आणि समजा काही पत्रके पाठिंब्याची काढलीच असती तरी इतक्या छोट्या, नुकत्याच जन्मलेल्या आणि एका गल्लीतल्या संघटनेची दखल कोणी घेतली असती ? बाबासाहेबांना अपेक्षित व्यवहार संघ स्वयंसेवक करतांना दिसतात. पुढील काळातील बाबासाहेबांचेही संघाविरूद्धचे पत्रक दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि केशवराव हेडगेवार या दोघांची भेट १९३९ च्या संघाच्या अधिकारी शिक्षण वर्गात झाल्याचे, भोरचे खासदार आपल्या, “आमचं सायब” या आत्मचरित्रात नोंदवितात.

याच सत्याग्रहाचेच वेळी स्वा.सावरकरांनी मात्र महाड सत्याग्रहाची दखल घेऊन ” श्रद्धानंद ” मधून स्पष्टपणे पाठिंबा घोषित केला, असल्याचे धनंजय कीर नोंदवतात. स्वा.सावरकर लिहितात, ” आपल्या धर्म बांधवांना निष्कारण पशूहूनही अस्पृश्य लेखणे हा मनुष्य जातीचाच नव्हे तर आपल्या आत्म्याचाही घोर अपमान करणे होय. त्या अन्याय्य नि आत्मघातकी रूढीचे, आपद्धर्म म्हणून नव्हे तर धर्म म्हणून, लाभधारक म्हणून नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकारक म्हणून नव्हे तर माणुसकीची सेवा म्हणून, हिंदूंनी निर्दालन केले पाहिजे. आपल्या धर्माच्या नि रक्ताच्या हिंदू मनुष्याच्या स्पर्शाने पाणी बाटते आणि ते पशुचे मूत्र शिंपले की शुद्ध होते ही भावना अधिक तिरस्करणीय आहे.” कीर पुढे लिहितात, “आंबेडकरांचा झगडा न्यायाचा आहे असे घोषित करून त्यांनी त्याला मनःपूर्वक पाठिंबा दिला. “

पूजनीय बाबासाहेबांनी सत्यशोधक समाजाची घेतलेली दखल २२ एप्रिल १९२७ च्याच अग्रलेखात छापलेली पाहावयास मिळते. ती खालील प्रमाणे.

” सत्यशोधक समाजाचे पुढारी समतेची मोठ मोठी तत्वे बोलतात पण खेड्यापाड्यातून सत्यशोधकी मताचे वारे शिरल्याबरोबर तेथील वातावरण जाती द्वेषाने भरून जाते व ब्राह्मणांचे जीवित असह्य होते. सत्यशोधकी लेखकांच्या जिभेवर बुद्ध, ख्रिस्त, गांधी इत्यादी थोर व्यक्तींची नावे खेळत असतात. पण गावोगावी चाललेल्या द्वेषमूलक व अत्याचारी वृत्तीच्या सत्यशोधकांचा निषेध किंवा त्यांच्या दुष्कृत त्यास आळा घालण्याचा यत्किंचितही प्रयत्न हे पुढारी किंवा लेखक करीत नाहीत. त्यामुळे सत्यशोधक म्हणजे जातीद्वेष पसरवून अत्याचारी वृत्तीचा प्रसार करणारे असा अर्थ समाजात रूढ झाला आहे. खेडेगावातील सत्यशोधकांच्या उपद्रवासंबंधी दर आठवड्यास आमच्याकडे तक्रारी येत असतात. त्यात बहुतेक बाहेरून येणारा ब्राह्मणेतर शाळा मास्तर हा सर्व उपद्रवास प्रेरक झालेला असतो. हा शाळा मास्तर आल्यापासून एक दोन वर्षाचे आतच गावात असलेल्या शांततेचे व सलोख्याचे वातावरण बिघडवून टाकतो. समतेच्या उच्च तत्वाचे ऐवजी अत्याचारी जाती द्वेषाचे भूत गावात मनसोक्त थैमान करू लागते !”

तथापी, याचे तपशीलवार कारण, याच अग्रलेखात पुढे बाबासाहेब देतात, ते जिज्ञासूंनी मुळातूनच वाचावे. एकंदरीत असे दिसते की, या सत्याग्रहात जोशी, टिपणीस, अत्रे, सहस्रबुद्धे होते तरी बाबासाहेबांनी तळ्याचे पाणी पिल्यानंतर झालेल्या दंग्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या दोघांचाही विरोध करण्यासाठी सहभाग होता.

आढावा घेणे महत्त्वाचे

पूजनीय डॉ. बाबासाहेबांनी हाताळलेल्या विषयात आपण किती, काय करू शकलो, याचा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय स्तरांवरून आढावा घेत राहिले पाहिजे. त्यासाठी काही मुद्दे सांगता येतील. ते असे.

१) सेवा वस्त्या (झोपडपट्ट्या) आणि अन्य नागरी वस्त्या सरमिसळ निवास सुरू झाले का ?
२) आपल्या मनातून आपली आणि मित्राची जात गेली का ?
३) पाणवठे, स्मशानभूमी, मठ, मंदिरे, विहारे, गुरूद्वारात सगळ्यांचे सहज स्वागत, वावर होत आहे ना ?
४) संविधानाप्रमाणे आपण सर्वांना मनापासून उपासनेचे स्वातंत्र्य देतो ना ?
५) आंतर्जातीय विवाह सर्रास सुरू करतोय की नाही ?
६) भारत माझा देश आहे, सर्व नागरिकांवर द्वेष रहित प्रेम आपण करतो ना ? कुणाबद्दलही आकस ठेवीत नाही ना ?
७) सर्व महापुरूष मला माझे वाटतात ना ?
८) गरजूंच्या गरजा आधी भागाव्या असे मनापासून वाटते ना ?
९) पालावरचं, पहाडावरचं जिणं समजून घ्यायला वेळ काढतोय ना ?
१०) माझा देश बघायलाच कधीतरी मी प्रवास करतोय ना ?

एक ना दोन….. विविध समस्यांचे चिंतन करून आता दरवर्षी होणाऱ्या २० मार्चच्या महाड येथील कार्यक्रमात सर्व हिंदूंनी मोठ्या प्रमाणात या क्रांतीकारी मार्गदर्शक क्षणामध्ये सहभाग नोंदवून, परस्पर यत्किंचितही विरोधात न उभे राहता, पूजनीय डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे. एकच वर्ण हिंदू किंवा एकच जात हिंदू, या न्यायाने चालणे अपेक्षित आहे. यातच देशाचे उज्ज्वल भवितव्य आहे.

डाॅ. रमेश माधवराव पांडव
(लेखक रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख