Monday, March 31, 2025

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

Share

“मृत्यू लाही मात देईल

असा त्यांचा गनिमी कावा,

झुकले नाही डोळे त्यांचे

असा माझा शिवबाचा छावा”

‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य प्रेक्षकांच्या भावनांना खोलवर स्पर्श करत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी भरून येत आहेत, आणि भावनांच्या ओघात ते रडतच सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. 

मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास आपल्या विचारसरणीला पोषक ठरावा यासाठी काही असामाजिक घटक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते इतिहासातील काही गौण संदर्भांना आधार म्हणून पुढे करत आहेत.

इतिहासाचे विकृतीकरण करणे फारसे कठीण नाही. जर जनतेला स्वतःच्या पूर्वजांचा खरा इतिहास माहीत नसेल, तर त्यांच्यापर्यंत अपप्रचार पोहोचवणे आणखीनच सोपे होते. मात्र, याहून गंभीर बाब म्हणजे, ज्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थानुसार इतिहासाचे लेखन केले, त्यांच्याच रचलेल्या कथनाला आपणच आपल्या इतिहासाचा वास्तव म्हणून स्वीकारत असू, तर याहून मोठे दुर्दैव दुसरे कोणतेच नाही.

असे कोणते ठोस कारण आहे, ज्यामुळे इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर अनर्गल टीका करण्यात आली आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाला कलंकित करण्याचा प्रयत्न झाला?

मुघल दस्तावैजांमधील केलेला छत्रपति संभाजी महाराजांचा उल्लेख व त्याचे इंग्रजी भाषांतर 

फार्सी 

व चूं इफ्नाए आन मुश्रीक-ई-बदकिश-ई जहन्नम नसीब दर बराबर-ई वबाल व नकाले की अज़ क़त्ल व इसर-ई मुस्लमानान व नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम बर इबकाए  ऊ रुझान दाश्त। व ब-फ़तवाए अज़ बाब-ई शर व मिल्ल्त व सवाबदीद-ई असहाब-ई दीन व दौलत सफ़्क-ई दम-ई आन हर्बीए कती-उल तरीक लाज़िम आमद बाद-ई वसूल-ई-मौकीब-ई जफरंजोल बिस्त व यकम-ई जमादिलावल सना सी व दो ब-कोरागाँव मुसम्मा ब-फ़तहबाद बिस्त व नहम शहर-ई मजकूर ब-वसातत-ई तेग़-ई-काफिरकोश बा कब कलस की ता हमा जा हमराहश बुद ब-दरक-ई असफ़ल फ़रो रफ़्त

काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त          

~ मआसिर-ई-आलमगिरी , मूळ फार्सी पृ.३२४-३२५

  • मराठी भाषांतर 

इस्लामी शहरे लुटून (नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम)  व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून (क़त्ल व इसर-ई मुस्लमानान)  जे पाप या घाणेरड्या धर्माच्या (म्हणजे हिंदू धर्माच्या) आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने (म्हणजे संभाजी महाराज – या सर्व शिव्या मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या आहेत)  केले होते ते बघता, त्याला जिवंत  ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला. शरीयावर (इस्लामी कायदा) आधारित फतव्याप्रमाणे, राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला (काती उल तरीक) नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल- अव्वल जुलूस ३२ ला बादशाहा कोरेगावला (ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते ) आल्यावर, त्याला (म्हणजे संभाजी महाराजांना) कवी कलश याच्या समवेत, काफिरांना ठार मारणाऱ्या तलवारीच्या साह्याने  सर्वात खोल अशा नरकात धाडले.

त्याच्या मृत्यूची तारीख ‘काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त’ म्हणजे नरकनशिबी काफिराचा मुलगा नरकात गेला या कालश्लेषाच्या साहयाने लिहिली गेली. 

संदर्भ: सत्येन वेलणकर 

जदूनाथ सरकार यांनी ‘मासीर – ए – आलमगिरी’चे केलेले भाषांतर

‘मासिर-ए-आलमगिरी’चे इंग्रजीत भाषांतर जरी एका भारतीय इतिहासकाराने केले असले, तरी ते केवळ भाषांतर होते, इतिहास नाही — ही महत्त्वाची बाब अनेकांनी दुर्लक्षित केली. परिणामी, या मुघल नोंदीच्या भाषांतराला अनेकांनीच निःसंशय इतिहास समजण्याची चूक केली. याच चुकीच्या धारणेच्या परिणामस्वरूप, जाणते-अजाणतेपणी इतिहासाचे विकृतीकरण घडले. अर्थात, हे एकमेव उदाहरण नाही; अशी अनेक अन्य उदाहरणेही आढळतात, ज्यांपैकी काही पुढे नमूद केली आहेत.


शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ म्हणून वापरले जाणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे जेम्स लैन लिखित Shivaji. मात्र, हे पुस्तक केवळ विविध प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांचे संकलन आहे, इतिहासाचा निखळ सत्यदर्शी वृत्तांत नव्हे—ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.

या संदर्भात काही विसंगती स्पष्ट दिसून येतात. उदाहरणार्थ, एकीकडे लैन छत्रपती संभाजी महाराजांना पितृद्वेष्टा म्हणून रंगवतो, तर त्याच पुस्तकात तो असेही लिहितो की, ऐतिहासिक नोंदींनुसार छत्रपति शिवाजी महाराजांच्या कोणत्याही पत्नीप्रती विशेष प्रेमभावना आढळत नाहीत, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रणयरम्य बाजूही इतिहासात कुठेही दिसून येत नाही. त्याचवेळी सारख्याच संदर्भात लेखकला हे नमूद करणे महत्वाचे वाटले की, औरंगजेबाची बहीण जेबूनिस्सा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति आकर्षित होती आणि याच कारणाने तिने संपूर्ण आयुष्य विवाह न करण्याचा निर्णय घेतला होता.

अशा प्रकारचे संदर्भ अभ्यासताना, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची एक वेगळी प्रतिमा वाचकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, हे इतिहासाचे सत्य चित्रण नसून केवळ वेगवेगळ्या स्रोतांमधील माहितीचे संकलन आहे, याची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

Source: Shivaji (James W Laine)

इतिहासकार हे इतिहास आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतात. याच भानामुळे इतिहासकारांमध्ये दोन ठळक प्रवृत्ती निर्माण होतात. पहिली प्रवृत्ती म्हणजे जबाबदारीने, सखोल संशोधन करून इतिहास मांडणाऱ्या इतिहासकारांची, जे सत्य शोधण्यास प्राधान्य देतात. तर दुसरी प्रवृत्ती म्हणजे हेतुपुरस्सर विशिष्ट विचारसरणीला पोषक ठरेल अशा रीतीने इतिहासाची मांडणी करणाऱ्या इतिहासकारांची.

छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात, दुर्दैवाने दुसऱ्या प्रवृत्तीतील इतिहासकार अधिक प्रभावी ठरले. सत्याचा शोध घेणाऱ्या इतिहासकारांची उदासीनता वा दुर्बलता यामुळेच, या दुसऱ्या गटाने घडवलेले आणि प्रचारित केलेले कथानक दीर्घकाळ कोणालाही खोडून काढता आले नाही.

आधुनिक इतिहासकारांमध्ये मोठ्या संख्येने असे विद्वान आहेत, जे भारतीय इतिहासाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने ब्रिटिश स्रोतांवर अवलंबून राहतात. या एकाच चुकीमुळे केवळ छत्रपती संभाजी महाराज नव्हे, तर असंख्य धर्मवीर व स्वातंत्र्यासाठी झुंजणाऱ्या वीरांचा इतिहास अंधारातच राहिला. विशेषतः इंग्रजांनी इथल्या मातीतील नव्हे तर मुघलांच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा इतकी कलंकित करून ठेवली की, नंतरच्या अनेक इतिहासकारांनीही महाराजांचा उल्लेख ब्रिटिश दृष्टिकोनातूनच केला.

जदुनाथ सरकार हे आधुनिक इतिहासकारांमध्ये एक मोठे नाव आहे. आजही त्यांचे लेखन अभ्यासक महत्त्वपूर्ण मानतात. मात्र, त्यांच्या लेखनाचा लावला गेलेला चुकीचा अर्थ या विषयातील खूप मोठी चूक आहे. परिणामी, मुघल, ब्रिटिश आणि पाश्चात्य देशांनी आपल्या सोयीने मांडलेल्या संभाजी महाराजांच्या इतिहासाला ‘प्राथमिक स्रोत’ मानून पुढील पिढ्यांतील भारतीय इतिहासकारांनीही तोच कित्ता गिरवला. यातूनच संभाजी महाराजांच्या चारित्र्याला अनेक प्रकारचे विकृत ‘नॅरेटिव्ह’ लावले गेले.

कधी त्यांच्या नावाशी ब्राह्मण स्त्रीशी अनैतिक संबंधांची गोष्ट जोडून त्यांना चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न झाला, तर कधी त्यांच्यावर ब्राह्मणद्वेषाचा आरोप लावून मराठ्यांना त्यांच्या छत्रपतीविरोधात भडकवण्यात आले. ब्रिटिशांच्या Divide and Rule (फोडा आणि राज्य करा) या नीतीच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर लक्षात येते की, इंग्लंडहून आलेल्या या ‘पाहुण्यांनी’ भारतीय समाजाला खेळाचे प्यादे बनवले.

इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा सर्वांत मोठा आरोप डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांवर होत आला आहे आणि अनेक प्रमाणांत तो सिद्धही झाला आहे. मात्र, यातून घेतला पाहिजे तो महत्त्वाचा धडा असा की, इतिहासाच्या अभ्यासात पाश्चिमात्य चष्मा वापरण्याचे गंभीर परिणाम समाजावर होऊ शकतात. खऱ्या स्वराज्याचा पाया तेव्हाच घातला जाईल, जेव्हा इतिहासकारांची मानसिकता वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त होईल.

जोपर्यंत इतिहासकार पाश्चिमात्य दृष्टिकोनाचा मोह सोडून भारताच्या मूळ इतिहासात नव्याने डोकावून पाहत नाहीत, तोपर्यंत भारताच्या खऱ्या इतिहासाला न्याय मिळणे केवळ अशक्य आहे.

अन्य लेख

संबंधित लेख