Saturday, May 25, 2024

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र

Share

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात ‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ हे शिवाजी महाराजांचे चरित्र एक लाख बालवाचकांच्या हाती देण्यात आले. पुणे पुस्तक महोत्सवात हा उपक्रम करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक मोहन शेटे यांचे त्यासंबंधीचे हे अनुभव कथन.

२०२४ हे वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष ! त्या युगप्रवर्तक घटनेचे साऱ्या देशात उत्सवाप्रमाणे स्वागत होणे अगदी स्वाभाविक होते.

भारतीय विचार साधना ही राष्ट्रभक्तीच्या विचारांचा प्रसार करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था! त्यांनी या निमित्ताने शिवछत्रपतींचे विविध पैलू मांडणारी ५ पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला. त्यासाठी श्री. विवेक जोशी यांनी पाच लेखकांना एकत्र करून त्यांना विविध विषय देण्यात आले. मला त्यामधे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक या विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवडेल अशा भाषेत पुस्तक लेखन करायचे होते. खरे तर विषय माझ्या आवडीचा होता. पण कामाच्या व्यापात माझ्या लेखनाची गाडी पुढे सरकतच नव्हती. इतर लेखकांची घोडदौड पाहून माझ्या मनावरचे दडपण वाढत होते. एकदा तर मी निराश होऊन हे काम माझ्याकडून होणार नाही असे विवेकजींना कळवलेही! पण त्यांनी मला आधार दिला. इतकेच नाही तर डॉ. अर्चना चव्हाण यांना लेखनिक म्हणून जोडून दिले मग काय, मी सांगत राहिलो आणि त्या लिहित राहिल्या, आता तो मजकूर इतका मोठा झाला, की त्याची दोन पुस्तके करायचे ठरले.

त्याच वेळी एक आनंद वार्ता आली. नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने जागतिक स्तरावरचा पुस्तक मेळा दरवर्षी दिल्लीत होतो. त्याला लाखो वाचक भेट देतात आणि कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते. त्यांनी यावर्षी प्रथमच पुणे शहरात असा पुस्तकमेळा घेण्याचे ठरवले आहे.

असा भव्य ग्रंथोत्सव ही कल्पना पुणेकरांना नवीन होती. मात्र संयोजक राजेश पांडे यांनी हे काम यशस्वी करून दाखवले. मात्र ही बातमी कळताच भाविसाने आमची शिवरायांवरील सहा पुस्तके याच ग्रंथमहोत्सवात प्रकाशित करण्याचे ठरवले. धावपळ सुरु झाली. चित्रकारांनी उत्तम चित्रे काढून पुस्तके आकर्षक बनवली. माझ्या “स्वराज्याचे शिवधनुष्य” या पुस्तकाचे प्रकाशन माझे आवडते लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले.

आणखी एक आनंदाची घटना म्हणजे एनबीटीने या महोत्सवास येणाऱ्या प्रत्येकाला एक पुस्तक मोफत भेट देण्याचे ठरवले आणि त्यासाठी माझ्या पुस्तकाची निवड झाली. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सहकार्याने या पुस्तकाच्या तब्बल एक लाख प्रती छापण्यात आल्या.

‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ या पुस्तकाचे प्रकाशन महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात करण्याचे ठरले. मी त्या दिवशी जळगावला बाल साहित्य संमेलनाला उपस्थित होतो. आणि त्याच वेळी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सरदार भगतसिंग यांचे चुलत पणतू सरदार योगेंद्रसिंग यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होत होते.

मी त्यानंतर वारंवार त्या ग्रंथमहोत्सवाला भेट देत होतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लिहिलेल्या पुस्तकाबरोबर आपलेही पुस्तक येणा-या प्रत्येकाला भेट दिले जाते आहे हे पाहून मन अभिमानाने भरून येत होते. शिवरायांच्या नावाचा स्पर्श झालेले ते पुस्तक भाग्यवान ठरले होते.

खरंतर मी केवळ निमित्तमात्र ! महाराष्ट्रातल्या एक लाख घरापर्यंत आणि संस्कारक्षम मनाच्या लहान मुलांच्या मनापर्यंत शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र पोचते आहे हा आनंद अवर्णनीय होता!

मोहन शेटे
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आणि इतिहास प्रेमी मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख