Saturday, October 19, 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद

Share

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठीजनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी शुक्रवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे , शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री नामदेव कांबळे , कवी प्रवीण दवणे, कौशल इनामदार, गायिका वैशाली सामंत, नरेंद्र पाठक, अभिनेत्री मधुरा वेलणकर, आदित्य दवणे, निकिता भागवत, कवी दुर्गेश सोनार, बळीराम गायकवाड, कवी प्रवीण देशमुख, ग्रंथालीच्या प्रा. लतिका भानुशाली, अरुण जोशी या नामवंतांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे सांगितले की, आपण जे माझे स्वागत केले ते मी आपला एक प्रतिनिधी म्हणून स्विकारत आहे. सर्व मराठीजनांनी एकमेकांचे अभिनंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा विषय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत बहुप्रतिक्षीत असा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. शतकानुशतकं ज्या मराठी भाषेने प्रेरणा, विश्वास, शौर्य, करुणा आपणां सर्वांना दिली, अशा आपल्या मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्यानंतर आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मराठी भाषा प्रसार आणि प्रचारासाठी राज्य शासन म्हणून जी भूमिका घ्यायला हवी आणि काम करायला हवे ते आम्ही निश्चित करु अशी ग्वाही देवेंद फडणवीस यांनी दिली. मात्र त्याचवेळी मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहता, ती ज्ञान भाषा कशी होईल तसेच आजच्या युगात मराठी भाषेला ज्ञान भाषा म्हणून कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल याचा आपण विचार करून त्यादिशेने सर्वांनी प्रयत्न करुया असेही त्यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख