Friday, September 20, 2024

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Share

ठाणे : भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ मंचावर आणून याचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. मला याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल पुढे म्हणाले की, पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेले काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेले काम हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मनापासून एखादे काम करणे, ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो, तसे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत करताना दिसून येतात. २०४७ साली भारत हा महासत्ता बनणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे हे शासन ज्या प्रकारे काम करीत आहे त्यातून महाराष्ट्राचा विकास हा होणारच. मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे. त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहे, असे ते शेवटी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख