Sunday, November 24, 2024

परभणीच्या दादा लाड कापूस तंत्रज्ञानाला हिरवा कंदील!

Share

परभणी : भारतातील कापूस (Cotton) शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे आश्वासन देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयात, परभणी (Parbhani) येथील प्रगतिशील शेतकरी दादा लाड (Farmer Dada Lad) यांनी कापूस पिकावर मागील अनेक वर्षे चिंतन व संशोधन करून दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानाच्या संशोधनाच्या शिफारशीस अकोला येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकरी दादा लाड मागील दोन दशकांपासून कापूस पिकावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या संशोधनातून कापूस पिकाचे दादा लाड कापूस तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते. यामध्ये कपाशी पिकाच्या उत्पादनात घट येण्याचे प्रमुख अडसर असणाऱ्या गळफांद्या चाळीस दिवसाला काढून अन्नरस फळ फांद्यांना उपलब्ध करणे, कपाशीची उंच शेंडे खुडून मर्यादित ठेवणे, ओलिताखाली ठिबक व पॉलीमल्च आच्छादनाचा वापर करणे. या तंत्राचा अवलंब करून कपाशीचे उत्पन्न 6 ते 8 क्विंटल प्रती हेक्टरी वरून प्रतिहेक्टरी 20 ते 25 क्विंटल आले आहे.

या प्रयोगाची दखल भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील तत्कालीन महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा यांनी घेतली होती. त्यांनी आयसीएआर चे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्. वाय.जी. प्रसाद, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. अशोक धवन, डॉक्. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास भाले आदींना सोबत घेऊन पाहणी केली होती.

अतिघनता लागवडीमध्ये संकरित बीटी कपाशीचे अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवण्यासाठी 90 बाय 30 अंतराने पॉलीमल्च 30 मायक्रोन आच्छादनावर लागवड करून लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी वाढ, गळफांदी कापणे व लागवडीनंतर 75 दिवसांनी शेंडा खुडण्याची शिफारस करण्यात आली आहे.

दादा लाड यांच्या तंत्रज्ञानाच्या मान्यतेचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या कापूस उद्योगावर दूरगामी परिणाम होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे, देशभरातील शेतकऱ्यांना आता या बदलणाऱ्या तंत्रांमुळे ते त्यांचे उत्पादन वाढवू शकतील, त्यांचे जीवनमान सुधारू शकतील आणि देशाच्या अन्नसुरक्षेत योगदान देऊ शकतील.

अन्य लेख

संबंधित लेख