चंद्रपूर : “चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते.
महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन मोहिमेला प्रारंभ
मुख्यमंत्र्यांनी श्री माता महाकाली मंदिरात दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी श्रद्धेसोबतच शहराच्या विकासाचा अजेंडा मांडला. ते म्हणाले, “आम्ही केवळ घोषणा केल्या नाहीत, तर महाकाली मंदिर आणि दीक्षाभूमीच्या विकासाला प्रत्यक्ष मान्यता देऊन काम सुरू केले आहे. शहराचा झालेला कायापालट हा महायुतीच्या कामाची पावती आहे.”
विकासाचा ‘चंद्रपूर मॉडेल’
गेल्या काही वर्षांत चंद्रपुरात झालेल्या बदलांचा पाढा वाचताना मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या कामांचा उल्लेख केला:
पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि अत्याधुनिक भुयारी गटार व्यवस्था, दर्जेदार सिमेंट रस्ते, झगमगते पथदिवे आणि शहराचे सुशोभीकरण, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावून गरिबांना हक्काची घरे (PM आवास) उपलब्ध करून दिली.
“विकासाची जबाबदारी आमची!”
येत्या १५ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी चंद्रपूरकरांना आवाहन करताना फडणवीस म्हणाले, “१५ तारखेला भाजपा-शिवसेना महायुतीची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढची ५ वर्षे तुमच्या शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ.” या विधानाने त्यांनी चंद्रपूरच्या मतदारांना थेट विकासाची खात्री दिली आहे.
या विजय संकल्प यात्रेत राज्याचे मंत्री डॉ. अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.