Thursday, January 8, 2026

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार

Share

जळगाव : “जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य रोड शो’ दरम्यान त्यांनी जनता आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बंधू-भगिनींना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जळगावकरांनी जेव्हा या शहराची जबाबदारी आमच्यावर सोपवली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. कमी कालावधीत देखील जळगाव शहरामध्ये अनेक प्रकल्प सुरू केले. येथे दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा योजना, पम्पिंग स्टेशन, मलनिस्सारण प्रकल्प, पीएम ई-बस सेवा, घनकचरा व्यवस्थापन, उद्यानांचे सुशोभीकरण आणि कॅन्सर रुग्णालय या सर्व कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जळगावमधील तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जळगाव जिल्ह्यात उद्योग आणायचे आहेत. त्यासाठीच या जिल्ह्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे. सबसिडी आणि प्रोत्साहन योजनांमुळे येत्या काळात येथे मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, जळगाव शहर महानगरपालिकेवरील अनेक वर्षांपासून असलेले ‘हुडको’चे कर्ज राज्य सरकारने फेडल्यामुळे महापालिकेला आर्थिक दिलासा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

आज जळगावला विकसित शहरांच्या श्रेणीत नेण्याची खरी संधी आहे. यासाठी आम्हाला पुन्हा एकदा जळगावकरांची साथ हवी आहे. यासाठी येत्या 15 तारखेला भाजपा-शिवसेना महायुतीची काळजी तुम्ही घ्या, पुढील 5 वर्षे जळगावची जबाबदारी आम्ही घेऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या भव्य रोड शोला मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल जावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख