नागपूर : “नागपूरने मला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, इथल्या जनतेशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. गेल्या १० वर्षांत आम्ही नागपूरचा चेहरामोहरा बदलला असून, आता या शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचे आमचे ध्येय आहे. १५ तारखेला कमळाचे बटण दाबून महायुतीला विजयी करा, नागपूरच्या प्रगतीची जबाबदारी मी घेतो,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्ती नगर येथे आयोजित ‘भव्य जाहीर सभांमध्ये’ ते बोलत होते. यावेळी जनसागराचा उदंड प्रतिसाद पाहून फडणवीस यांनी नागपूरकरांचे आभार मानले.
पायाभूत सुविधांचा ‘नागपूर मॉडेल’
नागपूरच्या विकासाचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अभूतपूर्व परिवर्तन झाले आहे.
नवोन्मेष: अशुद्ध पाण्यापासून गॅस आणि वीजनिर्मिती करणारी नागपूर ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली असून, आज अनेक शहरे या मॉडेलचा अभ्यास करत आहेत.
दळणवळण: देशातील सर्वात वेगवान मेट्रो आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहराचा प्रवास सुसह्य झाला आहे.
मालकी हक्काचे पट्टे: एकात्मता नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि तकिया भागातील रहिवाशांना सुप्रीम कोर्टाकडून आदेश आणून मालकी हक्काचे पट्टे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि रोजगाराचे केंद्र
“आता नागपूरच्या तरुणांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही,” असे सांगत फडणवीस यांनी शहरात आलेल्या AIIMS, IIM, आणि IIIT सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांचा उल्लेख केला. तसेच मिहान (MIHAN) आणि आयटी स्टार्टअप्सच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात भरारी
आरोग्य: मेडिकल कॉलेज आणि मेयो हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करून खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच शहरात अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल उभे राहणार आहे.
क्रीडा: माणकापूर येथे देशातील सर्वोत्तम क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यालय साकारत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जागतिक स्तरावर नागपूरची दखल
एका आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या अहवालाचा हवाला देत फडणवीस यांनी सांगितले की, येत्या १० वर्षांत वेगाने विकसित होणाऱ्या भारतातील पहिल्या १० शहरांच्या यादीत नागपूरचा समावेश आहे. तलावांचे पुनरुज्जीवन, सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती आणि शाश्वत पाणीपुरवठा यामुळे नागपूर हे भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखले जाईल.
या जाहीर सभांना, आमदार मोहन मते, आमदार कृष्णा खोपडे, नागपूर भाजप शहराध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांसह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.