पुण्याच्या विकासासाठी भाजपने काय केले, असे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील सभेत लक्ष्य केले. कात्रज येथील सभेत फडणवीस यांनी आक्रमक होत अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पुण्यात आयोजित सभेत फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादीतील संघर्षाला थेट हात घातला. अजित पवार यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, ‘‘ते दादा बोलत आहेत. हे दादा (चंद्रकांत पाटील). आण्णाही बोलत आहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावे की निवडणुकीची ही चर्चा जितकी मागे जाईल, तेवढे तुम्हाला अडचणीचे होईल. तुम्ही पुण्यासाठी काय केले हे तुम्हाला सांगावे लागेल. आम्ही उत्तर दिले नाही तर लोकांना वाटेल हे दुबळे आहेत. खरे तर माझा निवडणुकीचा पूर्ण फोकस विकासाच्या मुद्यावर आहे. पुण्यासाठी आम्ही काय करत आहोत, हे साऱ्या पुणेकरांना माहिती आहे.”
सभेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला. त्यामुळे टीका करणाऱ्या विरोधकांनी वस्तुस्थिती तपासावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने पुण्यासाठी भरीव विकास आराखडा तयार केला आहे. पुणे मेट्रोचे ११० किलोमीटर मार्ग नियोजित असून त्यातील ३१ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर २४ किलोमीटर मार्ग अंतिम टप्प्यात आहे. २४/७ पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाणी प्रक्रिया व ८८ किलोमीटर नदी सुधार प्रकल्पामुळे पूरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण होणार आहे. शहरासाठी ४४ हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.”
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किलोमीटरचे भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुण्याचा महापौर भाजपचाच
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षात पुणे मनपात भाजपने ठोस काम केले. त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. विविध निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे शहराचे विस्तारीकरण आगामी काळात होणार आहे. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे हे पालकमंत्री अजित पवार यांना कारभार सांभाळताना यापूर्वी लक्षात आले नाही का ? आता पुणेकर विरोधकांना सत्तेत येण्याची कोणती संधी देणार नाही. पुन्हा एकदा पुण्याचा महापौर भाजपचाच होईल कारण, जनतेचे आशीर्वाद भाजपसोबत आहे. केंद्रात पंतप्रधान आमचे, राज्यात मुख्यमंत्री आमचे तर पुण्याचा विकास देखील विरोधक नाही तर भाजपच करणार आहे.”
पुणे आणि पिंपरी महापालिका वर्षानुवर्षे अजित पवार यांच्याकडे होत्या. अनेक वर्षे ते पुण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी तुम्हाला पुण्याचा विकास का करता आला नाही, तुम्ही पुण्याचा भरीव विकास का केला नाही, असा प्रश्न चंद्रकांतदादा पाटील यांनी सभेत विचारला.