Friday, November 22, 2024

परळी वैजनाथला होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट देण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Share

मुंबई : कृषी विभागातर्फे 21 ते 25 ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांना या माध्यमातून आपापसातील विचारांची देवाण घेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्टया उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध करु शकतील.

शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा. तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून या प्रदर्शनात 400 पेक्षा जास्त दालने लावण्यात येणार आहेत. तसेच परिसंवाद, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, प्रक्रिया उद्योग यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पौष्टिक तृणधान्य महोत्सव, सेंद्रीय शेती दालन, खरेदीदार विक्रेता संमेलन, पशू प्रदर्शन, ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, रानभाजी महोस्तव,धान्य व इतर शेतीमाल प्रदर्शन व विक्री, शेती निगडित औजारे खरेदी विक्री दालन व कृषी उत्पादने, स्वयं सहाय्य महिला बचत गट निर्मित वस्तू /पदार्थ विक्री भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात पाच लाखांपेक्षा जास्त शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करुन रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी रान भाज्यांचे प्रदर्शन हा या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख