मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेसचा एक ‘निष्ठावान’ चेहरा भाजपमध्ये
धर्मेश व्यास हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी मानले जात होते. विशेषतः काँग्रेसचे दिग्गज दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या अत्यंत जवळच्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. सांताक्रुज पूर्व येथील प्रभात कॉलनी आणि आनंद नगर (प्रभाग क्र. ८१) परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, २००७ ते २०१२ या काळात त्यांनी या प्रभागाचे नगरसेवक म्हणून नेतृत्व केले आहे. व्यवसायाने वकील असल्याने काँग्रेसमधील अनेक कायदेशीर बाबी हाताळण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
व्यास यांच्या भाजप प्रवेशावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, मधु चव्हाण, माजी नगरसेवक महेश पारकर यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर धर्मेश व्यास यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांनी त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करत आगामी काळात मुंबईच्या विकासासाठी सोबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
मुंबई निवडणुकीआधी भाजपची ताकद वाढली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असताना, धर्मेश व्यास यांच्यासारखा अनुभवी आणि कायदेतज्ज्ञ नेता पक्षात येणे, ही काँग्रेससाठी मोठी हानी तर भाजपसाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे. सांताक्रुज आणि परिसरात भाजपची पकड यामुळे अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.