मुंबई, २२ एप्रिल: पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी १९६५ साली माटुंग्यातील रामनारायण रूईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या वैचारिक संकल्पनांची ऐतिहासिक मांडणी केली होती. या ऐतिहासिक प्रसंगाच्या ६०व्या वर्षपूर्तीनिमित्त, त्याच स्थळी आणि त्याच दिवशी – आजपासून ‘पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ (Ekatma Manavdarshan Heerak Mahotsav) सुरू होत आहे.
या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, यावेळी तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्ण गोपाल, मनमोहन वैद्य, सुनील अंबेकर, बी. एल. संतोष आणि सुरेश सोनी उपस्थित राहणार आहेत.
काय आहे ‘एकात्म मानवदर्शन’?
पंडित उपाध्याय यांनी मांडलेले विचार केवळ तात्विक नव्हते, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या विकासाचा स्पष्ट आराखडाच होता. “पंडितजींच्या विचारांचा प्रभाव आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या कार्यपद्धतीत ठळकपणे दिसून येतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि नागरिक सुरक्षेसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या योजनांतून हे मूल्य आजही जपले जात आहे,” असं प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत केलं.
महोत्सवात काय पाहायला मिळेल?
२२ ते २५ एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात ‘भू-सांस्कृतिक राष्ट्रवाद’, ‘भारतीयत्वाची ओळख’, ‘जनमत परिवर्तन आणि समाज प्रबोधन’, ‘विकसनशील भारताचं मॉडेल’, तसेच पंडितजींच्या आर्थिक विचारांवर आधारित परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
लोढा यांनी नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, नोंदणीसाठी www.ekatmamanavdarshan.org या संकेतस्थळावर लॉग इन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.