Saturday, December 6, 2025

वीज बिलात कपात होणार! सौर कृषीपंप योजनेमुळे १ लाख तरुणांना रोजगार; ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा

Share

छत्रपती संभाजीनगर : देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतू, जनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना खूप चांगली असल्याने अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार ‘कुसुम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करुन आपण प्रतिक्षा कालावधी कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करु, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्या, वेंडर्स, कामगार, देखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे.

मराठवाड्याचा वाटा मोठा

मराठवाड्याचे कौतुक करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या अंमलबजावणीत मराठवाड्याने आघाडी घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ हजार पंप लावण्यात आले. शेतकऱ्यांना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेमार्फत अन्य लाभ, बाजाराची उपलब्धता देऊन शेती शाश्वत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. नदी जोड सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात,विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात नेऊन दुष्काळ मुक्ती करायची आहे. या सर्व उपाययोजनांमुळे शेती समृद्ध आणि शाश्वत होईल. आमचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती समर्पित सरकार असून शेती शाश्वत होईपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

महाराष्ट्र थांबणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी विक्रमाची घोषणा केली. प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एआयआयएम बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कार्ल सॅबेले म्हणाले की, विक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आले, हा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री अतुल सावे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून सौर कृषी पंप योजनेमुळे शेती क्षेत्रात आणि अर्थकारणात मोठे बदल होतील, असा विश्वास व्यक्त केला. या ठिकाणी लावलेल्या सौर ऊर्जा उत्पादनांच्या प्रदर्शनालाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली व पाहणी केली.

अन्य लेख

संबंधित लेख