Friday, September 13, 2024

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम

Share

बीजारोपण ते वृक्षारोपण असा उपक्रम मिरज शहरात सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय झाले आहेत.

जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संरक्षण गतीविध, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमास शासन दरबारी देखील मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा महापालिकेचा उपक्रम झाला आहे. समाजातील शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था आणि नारीशक्तीचाही पाठिंबा या उपक्रमाला मिळू लागला आहे. या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नयना गोरे यांनी सर्व उपस्थित महिलांना गोडचिंच व एक एक कागदी कप दिला आणि प्रत्येकीने त्या चिंचोक्याचे रोप घरून करून आणावे, असे आवाहन केले.

आता ही चळवळ न रहाता बीजारोपण ते वृक्षारोपण ही लाईफ स्टाईल बनेल, असे डाॅ. ताटेसर यांनी या कार्यक्रमात सांगितले. वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा राखण्यातील प्रमुख अडसर म्हणजे आपलेपणाची कमतरता. ती या स्वतःच बीजारोपण करून वाढवलेल्या रोपांमुळे नाहीशी होईल आणि आपुलकीने स्वतःच्या कुटुंबातील सदस्य असल्या सारखे आपण रोपांची जपणूक करू, असा विश्वास सुधीर गोरे यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे मनात कसे बीजारोपण होते, निसर्गा बद्दलची ओढ कशी वाढते याचे स्वानुभव थिटे यांनी सांगितले.

नारीशक्तीचे पाठबळ आणि प्रत्यक्ष सक्रिय सहभाग कोणतेही कार्य तडीस नेण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आपण फक्त आपला विचार करत नाही तर घराचा, कुटुंबाचा विचार करण्याबरोबरच सभोवतालच्या परिसरासाठी काम करणे हे ज्ञान आपल्याला उपजतच असते. आपण सारे मिळून या कार्यात सक्रिय सहभागी झालो आहोत. आता पर्यावरण संरक्षण करण्यात आणि प्रदुषण रोखण्यात आपण यशस्वी होणारच, असा विश्वास उपायुक्त स्मृतीताई यांनी महिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. केळकर योग वर्गाच्या अंजली केळकर यांनी बीज संकलनाच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. पर्यावरण संरक्षण गतीविधी मिरजचे संयोजक केळुसकर, निसर्ग प्रेमी म्हणून ओळख असलेले श्री. जोशी आणि जीवन रक्षक संस्थेचे राकेश तामगावे या कार्यक्रमात उपस्थित होते. केळकर योग वर्गाच्या कार्यकर्त्यांच्या उस्फूर्त सहभागामुळे ५००पेक्षा अधिक बियांचे बीजारोपण पूर्ण झाले.

अन्य लेख

संबंधित लेख