बीड: बीड (Beed) जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीवरच फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शेततळ्याचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदार भरत नवनाथ खेडकर यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. २०१६ मध्ये धसे पिता-पुत्रांनी त्यांना शेततळ्याच्या दुरुस्तीचे टेंडर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून खेडकर यांनी त्यांना १३.५ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर ना टेंडर मिळाले, ना रक्कम परत मिळाली.
वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने खेडकर यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. खासदार यांच्याशी संबंधित व्यक्तीवरच गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.