पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक विधी पार पडले.
आयोजकांच्या मते, गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे या कुटुंबांनी धर्मांतर केले होते. मात्र आता त्यांनी स्वेच्छेने पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला आहे. २५१ कुटुंबांतील ६०० हून अधिक लोकांनी एकत्रितपणे ‘घरवापसी’ केल्याचे सांगण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे मंत्री मोहन सालेकर यांनी यावेळी सांगितले, “सकाळी चुकलेला जर संध्याकाळी परत आला, तर त्याला चुकलेला म्हणत नाहीत. हे आपल्या आदिवासी बंधू-भगिनी काही दबाव किंवा प्रलोभनामुळे इतर पूजा पद्धतीकडे वळले होते. आता त्यांनी ती पद्धत सोडून आपल्या मूळ, नैसर्गिक सनातन हिंदू पूजा पद्धतीकडे पुनरागमन केले आहे. आज येथे असे २५१ कुटुंब उपस्थित आहेत. हा संदेश आहे की, जे अनेक वर्षे भरकटले होते, त्यांची परत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, जगाला शांतीचा मार्ग दाखवणारी संस्कृती सनातन धर्मातच आहे.
पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने हा पहिलाच असा कार्यक्रम असून, पुढील काळात मोठ्या संख्येने आपली मूळ आस्था बदललेले आदिवासी पुन्हा परत येण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. सहमंत्री चंदन सिंह यांनी सांगितले की, “जे कुटुंब काही कारणांमुळे आपल्या मुळांपासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा सनातन धर्माशी जोडणे हे आमचे कर्तव्य आहे.”
या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे घरवापसी केलेल्या आदिवासी बंधू भगिनींच्या हातात हिंदू स्तंभ देऊन मंत्रोच्चारांच्या घोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने बोईसरच्या सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन समरसता यज्ञाचे आयोजन केले होते. जगदगुरु शंकराचार्य स्वामी अनंतानंद सरस्वती (काशी सुमेरू पीठाधीश्वर) आणि महामंडलेश्वर अखिलेश्वरानंद गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पालघर जिल्हा… वारली पेंटिंगचा ठेवा…

पालघर हा गडचिरोली आणि नंदुरबार प्रमाणेच महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आदिवासी (अनुसूचित जनजाती) जिल्हा मानला जातो. जिल्ह्यातील जव्हार, तलासरी आणि मोखाडा हे ३ तालुके १००% आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात. वसई विरार महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरित भागात आदिवासींचे प्रमाण ६२.२६% इतके आहे. साधारण जनसंख्या १० लाखांच्या आसपास आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केला तर जिल्ह्यात सुमारे ३७% पेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी जमातीची आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे ७९.४७% क्षेत्र आदिवासी उपाययोजना क्षेत्रात (Tribal Sub-Plan area) येते. जिल्ह्यात प्रामुख्याने आपल्या वारली, कातकरी, महादेव कोळी, कोकणा, ठाकूर/ठाकर या आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे.
अनादि काळापासून पिढ्यान पिढ्या हे आपले वनवासी बांधव जंगलांमध्ये निसर्गपूजा करत. आपापल्या जनजातीच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरिती, पारंपारिक धार्मिक श्रद्धा जपत जंगलातील निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेल्या संपत्तीवर आपला चरितार्थ चालवत आहेत. यापैकी वारली जनजातीय बांधवांची “वारली पेंटिंग्स” आपल्या आखीव रेखीव अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कलात्मकतेमुळे तर खूपच प्रसिद्ध आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाची परंपरागत पूजा पद्धती, लोकगीते, नृत्य, विवाह परंपरा, वेशभूषा सगळं काही ते हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचेच सांगतात.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडे गावातील ज्येष्ठ वारली आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा (वय ९२) यांना २०२६चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून आपल्याला वारली समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची खात्री पटते. पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू, विक्रमगड, पालघर आणि बोईसर हे ४ विधानसभा मतदारसंघ देखील आदिवासी बांधवांसाठी राखीव आहेत.
जनजातीय बांधवांचे सोल हार्वेस्टिंग – ख्रिस्ती मिशनऱ्यांचा उपद्व्याप

असा हा विविधतेने नटलेला आपल्या आदिवासी बांधवांची जात वस्ती असलेला पालघर जिल्हा धर्मांतरातून बायबलमधील उपदेशानुसार “सोल हार्वेस्टिंग” करणाऱ्या इव्हँजेलिकल ख्रिस्ती मिशनऱ्यांना धर्मांतरासाठी (Conversion/कन्वर्जनसाठी) सुपीक शेती वाटला नसता तरच नवल. नागरी गजबजाटापासून आपला वनवासी समाज दीर्घकाळ दूर जंगलांमध्ये पाड्यांवर राहत असल्यामुळे त्याचा उर्वरित हिंदू समाजाशी संपर्क खूप कमी झाला होता. त्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांना कन्वर्जन साठी अक्षरशः मोकळे रान मिळाले.
आमच्या आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा साधेभोळेपणाचा आणि दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवण्याच्या स्वभावाचा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या अडचणींचा गैरफायदा घेत आपला डाव साधायला सुरुवात केली. शाळा आणि इस्पितळे या सेवाकार्यांआडून पालघर जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कन्वर्जनची एक सुप्त मोहीम चालवली. वास्तविक जर एखादे सेवा कार्य कन्वर्जनसारख्या कुटील षड्यंत्रासाठी वापरले जात असेल तर त्याला सेवाकार्य म्हणता येईल का? हा पहिला प्रश्न उभा राहतो. सेवाकार्याचा हेतू हा निखळ सेवा हाच असला पाहिजे आणि सेवा ही कोणत्याही मोबदल्याशिवाय निर्हेतुक असेल तरच ती खऱ्या अर्थाने सेवा ठरते.
शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था यांच्या आड जर कन्वर्जन केले जात असेल तर तो एक Give & Take तत्त्वावरचा व्यवसाय किंवा व्यापार ठरतो. आम्ही तुम्हाला सेवा देतो त्या बदल्यात तुम्ही तुमचा धर्म आम्हाला द्या हा तर व्यापार झाला.
या माध्यमांतून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आदिवासी क्षेत्रात आपले जाळे विणले आणि कन्वर्जनला चांगल्यापैकी गती दिली. त्यात त्यांना मूक साथ मिळाली ती कम्युनिस्ट पक्षाची. कॉम्रेड गोदूताई परुळेकर यांनी या भागात वारली आदिवासींना वेठबिगारीतून मुक्त करण्यासाठी १९४५-४७ च्या दरम्यान त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यामुळे डहाणू तलासरी भागात कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा होता. धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या कम्युनिस्टांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कन्व्हर्जनबाबत मात्र कोणताच आक्षेप नव्हता.

याच अभद्र युतीतून १६ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात कल्पवृक्षगिरी महाराज (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे (३०) हे तिघे गुजरातकडे जात असताना चोर असल्याच्या अफवेवरून जमावाने त्यांची ठेचून निर्घृण हत्या केली होती.
पालघर जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या आपल्या आदिवासी बांधवांचा निश्चित अधिकृत सरकारी आकडा उपलब्ध नसला तरी तो चिंताजनक आहे एवढे मात्र निश्चित. आता सुरू असलेल्या २०२६/२७ च्या जनगणनेत हा आकडा उपलब्ध होईल अशी आशा आहे.
सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले…

सर्वप्रथम विश्व हिंदू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम या संस्थांनी पालघरच्या वनवासी बांधवांमध्ये सेवाकार्य सुरू करण्याचा चंग बांधला. तलासरी, विक्रमगड, पालघर, बोईसर अशा सगळ्या दुर्गम आदिवासी भागात विद्यार्थी वसतिगृहे, आरोग्य केंद्रे, आरोग्य रक्षक, कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्रे, आदिवासी बंधू भगिनींना हस्त कौशल्याने बनवलेल्या वस्तूंची विक्री केंद्रे अशा अनेक अनेक सेवाकार्यांबरोबरच संस्कृती संवर्धनासाठी देखील भरीव प्रयत्न होऊ लागले.
१९६७ साली सुरू झालेले तलासरीचे वसतिगृह हे या सेवा कार्यामध्ये सर्वात जुने व आदर्श मानले जाईल. या वसतिगृहातून शेकडो (३,०००) वनवासी विद्यार्थी शिकून बाहेर पडले. त्यातले अनेकजण पदवीधर झाले. त्यापैकी चिंतामणी वनगा हे वकील झाले व पुढे भारतीय जनता पक्षाचे खासदार देखील झाले तर विष्णू सावरा हे आमदार झाले. आज त्यांचे सुपुत्र डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे भारतीय जनता पक्षाचे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार आहेत. वसतीगृहासोबतच आरोग्य शिबिरे, मोबाईल डिस्पेंसरी आणि गोशाळा (१५० गाई) देखील चालवली जातात.
अशा प्रकारे आदिवासी समाजाच्या प्रत्येक लहान मोठ्या अडीअडचणीत, संकटात, विश्व हिंदू परिषद व वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते धाव घेऊ लागले. त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ लागले आणि यातून हळूहळू पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज जागृत होऊन सुसंघटित होऊ लागला. त्याचे उर्वरित हिंदू समाजाबरोबर ऋणानुबंध तयार होऊ लागले. विशेष म्हणजे जनजातीय समाजातीलच कार्यकर्ते उभे राहू लागले. विशेषतः नवीन पिढीतील सुशिक्षित वनवासी तरुण विश्व हिंदू परिषद बजरंग दल वनवासी कल्याण आश्रम यासारख्या संघटनांमध्ये सक्रियतेने व हिरीरीने काम करू लागले. परस्पर विश्वास वाढू लागला. यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या काळ्या धंद्यांना हळूहळू चाप बसू लागला.
जागृत हिंदू समाज आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांची पोलखोल

गेल्या काही वर्षात जस जसा हिंदू समाज जागृत होऊन सुसंघटित होऊ लागला तस तशी मिशनऱ्यांच्या कन्वर्जनच्या षडयंत्राची पोलखोल होऊ लागली.
बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील संस्कृती रक्षणासाठी कार्य करणारे नागरिक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि मिशनरी हालचालींमुळे बाधित गावातील रहिवासी एकत्र आले होते. त्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या ख्रिश्चन प्रार्थना स्थळांविरोधात आणि वाढत्या धर्मांतराच्या हालचालीं विरोधात कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी संस्कृती रक्षण समितीच्या वतीने केली. (यात मिशनरी हालचालींमुळे बाधित गावातील रहिवासी एकत्र आले होते. हे अतिशय महत्त्वाचे आहे.)
या शिष्टमंडळाच्या ठळक मागण्या अशा होत्या:
१) नावे व स्थान नमूद दिलेल्या १२९ अनधिकृत प्रार्थना स्थळांवर तातडीने बंदी घालावी व कारवाई करावी.
२) मिशनरी हालचाली तपासून त्यांचे आर्थिक स्रोत उघड करावेत.
३) राज्य शासनाने ‘धर्मांतर विरोधी कायदा’ लागू करावा.
४) संस्कृती आणि पारंपरिक श्रद्धा जपण्यासाठी स्थानिक पातळीवर समित्या स्थापन कराव्यात.
५) संविधानात प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, मात्र त्याचा वापर फसवणूक, अंधश्रद्धा आणि अनधिकृत मार्गाने केला जात असल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे मुख्यतः कष्टकरी शेतकरी, रोजंदारी मजूर यांचे वास्तव्य आहे. येथील पारंपरिक संस्कृती, रितीरिवाज आणि धार्मिक श्रद्धा हे स्थानिक जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक गावांमध्ये बुधवार, गुरुवार, रविवार तसेच इतर दिवशी येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना सभा अनधिकृतपणे घेतल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या सभांमध्ये “आजारी व्यक्ती बरे होतात”, “संमोहित करणे”, “तेलपाणी लावून पैसा जमा करणे” अशा प्रकारचा भ्रामक प्रचार व अंधश्रद्धा पसरविली जात असल्याचे आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. परिणामी, गावागावात पारंपरिक श्रद्धा व संस्कृती धोक्यात आली असून, गावदेवीचे उत्सव, पारंपरिक विधी, सामाजिक वर्गणी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे समाजामध्ये तणाव आणि वाद निर्माण होत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी समाजाबरोबर उर्वरित हिंदू समाजातील ही जागृती व सुसंघटितपणा निश्चितच आनंददायक व अभिनंदनीय आहे.
तो मैं एक ही रक्त

मात्र प्रलोभनांना अथवा खोट्या भूलथापांना बळी पडून कन्वर्जन करून ख्रिस्ती झालेल्या आपल्या आदिवासी बांधवांची हिंदू धर्मात पुन्हा “घरवापसी” हा कन्वर्जनच्या मुळावर घातलेला घाव ठरणार आहे.
पालघर जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम असला तरी त्याची गती आणि व्याप्ती येत्या काळात खूपच वाढलेली दिसेल. घरवापसी करून परत हिंदू धर्मात आलेले आपले जनजातीय बांधव या कामात उत्प्रेरकाचे (Catalyst) काम करतील हे निश्चित. आपल्या भोळेपणाचा तसेच अडीअडचणींचा फायदा घेऊन आपला उपासना पंथ बदलला गेला होता. खरंतर ज्याची काहीच आवश्यकता नव्हती. हे जेव्हा घरवापसी केलेले आदिवासी आपल्या धर्मांतरीत बांधवांना समजावतील तेव्हा घरवापसीच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळेल व येत्या काळात पालघर जिल्हा कन्वर्जन मुक्त होईल यात आम्हाला तरी शंका नाही.
घरवापसी हा काही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम यांनी अलीकडे सुरू केलेला उपक्रम नाही.
बजाजी नाईक निंबाळकर आणि नेतोजी पालकर (मोहम्मद कुली खान) यांची सन्मानाने “घरवापसी” करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणारा हा उपक्रम आहे.
काही अपरिहार्य कारणामुळे उपासना पंथ बदललेल्या हजारो हिंदूंची “घरवापसी” करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणाऱ्या स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजाचे २०व्या शतकात आर्य समाजाच्या या चळवळीला व्यापक रूप देणाऱ्या स्वामी श्रद्धांनंद यांचे बाकी राहिलेले कार्य पूर्ण करणारा हा उपक्रम आहे.
गोव्यामध्ये पोर्तुगीज काळात जबरदस्तीने बाटवलेल्या हजारो हिंदूंना २०व्या शतकात पोर्तुगीजांच्या राजसत्तेच्या नाकावर टिच्चून घरवापसी करून पुन्हा हिंदू धर्मात घेणाऱ्या विनायक महाराज मसूरकर यांचे उर्वरित कार्य पूर्ण करणारा हा उपक्रम आहे.
जनजातीय क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांचा असा अनुभव आहे की, “१०० ख्रिस्ती मिशनऱ्यांनी १०० वर्षे केलेले कन्वर्जनचे काम हिंदू धर्मातील एखाद्या साधुसंताने त्या कन्वर्टेड समाजाच्या नुसता पाठीवरून हात फिरवला तरी मातीमोल होते.” अनुभव लक्षात घेतला तर पालघरच्या घरवापसी कार्यक्रमाला जगदगुरु शंकराचार्य स्वामी अनंतानंद सरस्वती (काशी सुमेरू पीठाधीश्वर) आणि महामंडलेश्वर अखिलेश्वरानंद गिरी महाराज यांची उपस्थिती म्हणजे पालघर जिल्हा १००% कन्वर्जन मुक्त होण्याच्या दिशेने घेतलेली गरुड भरारीच आहे.