ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी’ यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्याची विविध माध्यमांतून व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
प्रसिद्धीसाठी विविध विभागांना दिलेली जबाबदारी:
शिक्षण विभाग: जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये गुरु तेग बहादुर साहिब यांच्या जीवनावर आधारित निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करावे.
स्थानिक प्रशासन (GP/नगरपालिका): ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, ग्रामपंचायतींमध्ये लाऊडस्पीकरवरून कार्यक्रमाचे गीत वाजवून जनजागृती करावी.
प्रसार माध्यमे व चित्रपटगृहे: चित्रपटगृहांमधूनही गीताद्वारे कार्यक्रमाची प्रसिद्धी केली जाईल. प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याचे नियोजन आहे.
आरोग्य विभाग: शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, तहसिलदार सचिन चौधरी, रेवण लेंभे, संदीप थोरात, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी घनश्याम मेहता, शिक्षण विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी तर दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपस्थित होते.
‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिबीजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीबाबत सर्व विभागांनी नियोजन करुन, त्याची सुरुवात करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही पाटील यांनी सांगितले.