Friday, March 6, 2026

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

Share

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला.

संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळ
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. संजू सॅमसनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारताना अवघ्या ४२ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. त्याला इशान किशन (३९ धावा) आणि शिवम दुबे (४३ धावा) यांनी मोलाची साथ दिली. अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्या (२७) आणि तिलक वर्मा (२१) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला.

इंग्लंडचा कडवा संघर्ष: बेथेलचे झुंजार शतक
२५४ धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही हार मानली नाही. जेकब बेथेलने स्पर्धेतील सर्वात स्फोटक खेळी करत अवघ्या ४८ चेंडूंत १०५ धावा (८ चौकार, ७ षटकार) कुटल्या आणि भारतीय गोटात घबराट निर्माण केली. विल जॅक्सने ३५ धावांचे योगदान दिले, तर सॅम करननेही विजयासाठी प्रयत्न केले. ४० षटकांच्या या खेळात दोन्ही संघांनी मिळून ४९९ धावा केल्या, जे टी-२० इतिहासातील एक दुर्मिळ दृश्य होते.

अखेरच्या षटकांत पांड्या-बुमराहची कमाल
सामना हातातून निसटत असताना हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी दोन बळी मिळवून भारताचे पुनरागमन करून दिले. जसप्रीत बुमराहने आपल्या ४ षटकांत १/३३ अशी नियंत्रित गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगने विल जॅक्सला बाद करून इंग्लंडचा वेग रोखला. वरुण चक्रवर्ती महागडा ठरला असला तरी त्याने घेतलेला एक महत्त्वपूर्ण बळी भारताला विजयाकडे घेऊन गेला. अखेर इंग्लंडला २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताने ७ धावांनी विजय मिळवला.

अन्य लेख

संबंधित लेख