नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने केवळ ‘अ’ गटात अव्वल स्थानच पटकावले नाही, तर कोलंबोतील आगामी महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानवर मानसिक दडपणही निर्माण केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी नामिबियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत धावफलकावर २०९ धावा करत २१० धावांचे आव्हान उभे केले. डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर नामिबियाचा संघ ११६ धावांत आटोपला. भारताने हा सामना ९३ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला.
या विजयासह भारतीय संघाने आपल्या खात्यात ४ गुण जमा केले आहेत. मोठ्या फरकाने विजय मिळाल्यामुळे भारताचा नेट रनरेट (Net Run Rate) अत्यंत वरच्या स्तरावर पोहोचला आहे. यामुळे ‘अ’ गटात भारत आता अग्रस्थानी असून, कोलंबोमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘हायव्होल्टेज’ सामन्याआधी भारताने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.