Tuesday, December 3, 2024

वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती

Share

लोकशाहीमध्ये निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जनजागृती सुरू आहे. पण, सामान्य नागरिक आणि जागरुक पत्रकार म्हणून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, या उद्देशातून संदीप कुलकर्णी यांनी केलेल्या एका उपक्रमाविषयी…

विवाह हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. जोडीदाराबरोबर सुखी जीवनाचे चित्र रंगवत असतानाच लोकशाहीमध्ये महत्त्वाचा उत्सव असलेल्या निवडणुकीसाठी वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती घडविण्याचा अभिनव उपक्रम संदीप कुलकर्णी आणि अंजली सोनवणे या नवदाम्पत्याने राबविला. ‘आपले आशीर्वाद आणि मत अमूल्य आहे. आम्हाला आशीर्वाद द्या आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणुकीत मतदान करा. हाच आमच्यासाठी आहेर’, असे आवाहन या नवदाम्पत्याने केले आणि त्यांच्या या आवाहनाची चांगली चर्चा समाजात झाली.

संदीप कुलकर्णी हे नगरमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. एमबीए अभ्यासक्रम करत असताना त्यांची अंजली सोनवणे या युवतीशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या घरातून संमती मिळाल्यानंतर त्यांचा गुरुवारी (२ मे) विवाह झाला. त्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये आहेर आणण्याबद्दलचे कल्पक आणि समयोचित आवाहन करण्यात आले होते. वैयक्तिक जीवनातील आनंद सोहळा अनुभवत असताना देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी संदीप आणि अंजली यांनी विवाहस उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना आहेर देण्याचे केलेले आवाहन हा सर्वत्र कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

संदीप आणि अंजली हे मतदान करण्यासंदर्भात केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत. तर, त्यांच्या लग्नपत्रिकेमध्ये ‘क्यूआर कोड’ देण्यात आला होता. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर संबंघित व्यक्तीला आपले मतदार यादीतील नाव शोधणे सोपे झाले आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांसाठी पाच टप्प्यांत मतदान आहे. लग्नाला उपस्थित व्यक्ती राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, गावातील असली तरी त्या व्यक्तीला मतदार यादीतील आपले नाव शोधून त्यानुसार मतदान करणे सुलभ झाले आहे.

लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जनजागृती सुरू आहे. पण, सामान्य नागरिक आणि जागरुक पत्रकार म्हणून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, या उद्देशातून विवाह सोहळ्याचा लाभ घेण्याचा विचार अमलात आणला असल्याचे संदीप कुलकर्णी यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आम्ही लग्नपत्रिकेचा मतदान करण्यासंदर्भात प्रबोधनाचा मार्ग निवडला. माझ्या या निर्णयाला कुटुंबीयांसह अंजलीच्या कुटुंबीयांनी आनंदाने संमती दिली. त्यामुळे हे शक्य झाले.
आमचा प्रेमविवाह असला तरी पारंपरिक पद्धतीने आम्ही विवाबहद्ध झालो. आपल्या आयुष्यातील हा मंगल क्षण लोकशाहीच्या सशक्तीकरणाचा ठरावा, ही इच्छा सुफ‌ळ संपूर्ण झाल्याने सार्थकतेची भावना असल्याचे संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

जयश्री कुलकर्णी
(लेखिका सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख