Saturday, July 27, 2024

भारतीय स्थापत्य आणि खगोलीय ज्ञानाची प्रचिती: महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव

Share

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा साजरा होतो. सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघणारी देवीची मूर्ती पाहताना भाविक देहभान हरपून जातात. हा सोहळा केवळ विलोभनीय नाही तर भारतीय दृष्टिकोन, स्थापत्य आणि खगोलीय ज्ञान याची प्रचिती देणारा आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी अयोध्येतील श्रीरामांच्या विलोभनीय मूर्तीच्या मस्तकावर सूर्यकिरण पडतील आणि ते श्रीरामांचे मुखमंडल प्रकाशमान करतील. या निमित्ताने श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये होणाऱ्या किरणोत्सवाचे वर्णन करणारा लेख.

कोल्हापूरकरांना जानेवारी महिन्याच्या शेवटी किरणोत्सवाची आस लागते. त्यांची पावले आपोआप मंदिराकडे वळतात. संध्याकाळ झाली की अस्ताला जाणारा सूर्य बरोबर रंकाळा तलावाच्या वरती असतो. तिथून संपूर्ण शहरावर पडणारी मावळतीची किरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करतात. गरुड मंडपात ती येतात. तिथून आत मुख्य मंडपात प्रवेशतात. त्यानंतर त्यांचा गर्भगृहामध्ये सोनेरी प्रवेश होतो. पहिल्या दिवशी किरणांचा देवीला चरण स्पर्श होतो. दुसऱ्या दिवशी ही किरणे मूर्तीच्या कटीपर्यंत पोहोचतात. तिसऱ्या दिवशी सूर्य किरणे देवीचे मुखकमल उजळवतात.

या दिवशी सारा गाभारा सूर्यकिरणांनी भरून जातो. काळ्या पाषाणांवर पडणारी ती सोनेरी किरणे देवीचे विलोभनीय स्वरूप भक्तांना दाखवतात. या काळात शेकडो भाविक त्या परिसरात असतात. मात्र मंदिरात निरव शांतता असते. सूर्यकिरणांनी व्यापून गेलेला गाभारा आणि तेथील शांतता देवीच्या रूपाबरोबरच भाविकांना स्व-रूपाचा शोध घेण्यास प्रवृत्त करते. यावेळी देवीची कर्पूर आरती केली जाते. सूर्य जसा अस्ताला जाईल तशी किरणे पाठीमागे सरकू लागतात. अत्युच्च कोटीचा आनंद मनात साठवून भाविक आल्या येथून परतात.

शतकानुशतके हा सोहळा असाच सुरू आहे. काहीजण याकडे दैववादी दृष्टिकोनातून पाहतात. तर काहींना हा सोहळा अत्यंत कलात्मक वाटतो. चित्रकार हा सोहळा रंगरेषांनी टिपतात. तर छायाचित्रकार प्रकाशाचा खेळ कॅमेरातून दाखवतात. या साऱ्या गर्दीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मात्र किरणोत्सवाच्या तंत्राचा शोध घेत असतात. वेगवेगळ्या टप्प्यांवर सूर्यकिरणांची क्षमता यंत्राच्या साहाय्याने ते मोजतात. सूर्यकिरणांची गती, त्यांचा मार्ग, त्या काळात असणारी वातावरणाची स्थिती या सगळ्याची नोंदणी ते करतात. या टिपणातून येणारे निष्कर्ष आपल्याला पूर्वजांचे खगोलीय ज्ञान, विकसित स्थापत्यशास्त्र आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवतात.

विज्ञान आणि आध्यात्माची सांगड

किरणोत्सव ही तशी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्यकिरणे यथावकाश सर्वत्र पसरतात. आपल्या घरामध्येही एखादा कवडसा येतो. एरवी डोळ्यांना न दिसणारे धूलिकण त्या सूर्यकिरणांमध्ये अधिक आकर्षक दिसतात. मावळतीला आणि उगवतीला हा सृजनाचा खेळ घरोघरी सुरू असतो. पण मंदिरात होणारा किरणोत्सव हा सूर्जनात्मक तर आहेच पण त्याचबरोबर विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर हे प्राचीन आहे. भूतकाळातील याचा धांडोळा हा दहाव्या शतकापर्यंत पोहोचतो. हे मंदिर नागरशैलीत बांधले असून चालुक्यकाळात याची उभारणी झाल्याचे पुरातत्त्व अभ्यासक सांगतात. या मंदिराला दोन गर्भगृह असल्याने हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते. संपूर्ण मंदिर बेसाल्ट खडकात बांधलेले असून हा खडक याच परिसरात आढळतो. मुख्य मंडप, सभा मंडप आणि अंतराळ (गाभारा) असे मंदिराचे प्रमुख तीन भाग आहेत. मंदिरावर विविध देवीदेवता, योगिनी, ऋषी, गंधर्व यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराला प्रमुख चार दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाला महाद्वार असे संबोधले जाते. हा पश्चिमेचा दरवाजा आहे. त्याचबरोबर उत्तरेचा घाटी दरवाजा आहे. या द्वारावर मोठी घाट किंवा घंटा असून ती दिवसातून चार प्रहरात वाजवली जाते. म्हणून या दरवाज्याला घाटी दरवाजा असे नाव पडले. पूर्व आणि दक्षिण दरवाजेदेखील आहेत.

किरणोत्सव हा वर्षातून दोन वेळा होतो. एकदा सूर्याचे उत्तरायण सुरू होते त्यावेळी आणि दुसऱ्यांदा दक्षिणायन सुरू होताना किरणे मूर्तीवर येतात. मंदिराची स्थापत्य रचना इतकी अभ्यासपूर्ण केली आहे की त्यामध्ये पृथ्वीच्या परिवलनाचा अभ्यास देखील करण्यात आला आहे. म्हणजे उत्तरायणामध्ये मावळणारा सूर्य दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मंदिराच्या समोर कोणत्या स्थानी असेल हे पाहून मंदिर स्थापत्याची रचना केली आहे. तसेच दक्षिणायनामध्येदेखील सूर्य त्याच ठिकाणी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी येतो हे देखील पाहण्यात आले आहे. सूर्यकिरणे लक्स या परिमाणात मोजतात. किरणोत्सवातील सूर्यकिरणांची क्षमता मोजल्यानंतर असे लक्षात आले की मंदिर बांधताना सूर्यकिरणांची क्षमता कोणत्या प्रहरी किती असते हे देखील अभ्यासले आहे. त्यामुळे शतकानुशतके दक्षिणायन आणि उत्तरायन या काळामध्ये सूर्यकिरणे महाद्वारातून येऊन देवीच्या मूर्तीवर पडतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात, असा वर्षातून दोन वेळा हा सोहळा होतो. काळाच्या ओघात मंदिराच्या महाद्वारासमोर काही बांधकामे झाली. त्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा निर्माण झाला. पण महापालिकेने किरणोत्सवात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी तात्कालिक का होईना पण उपायोजना केल्या आहेत. त्यामुळे किरणोत्सवातील अडथळे काही प्रमाणात दूर झाले आहेत.

एरवी मंदिराची भव्यता कोरीव काम आणि स्थापत्य पाहिले की अश्रद्ध मनातही अद्भुत अशा भावना प्रकट होतात. मात्र किरणोत्सवामध्ये सूर्यकिरणांचा सोनेरी प्रवास पहिला की नास्तिक मनातही भारतीयत्वाचा अभिमान जागा होतो. रविकिरणांनी उजळून निघणारा देवीचा गाभारा पहिला की भोवताली दाटलेल्या नकारात्मकतेच्या तिमिरातून चैतन्याने भरलेल्या आपल्याच अंत:करणातील तेजाचे दर्शन घडते.

अन्य लेख

संबंधित लेख